कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा आणि त्याचा योग्य वापर सुनिश्चित करा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी


ॲग्रोव्हिजनच्या पुढील आवृत्तीपूर्वी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान किमान 5 हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे गडकरी यांनी केले आवाहन

Posted On: 27 NOV 2026 8:00PM by PIB Mumbai

नागपूर, 27 नोव्हेंबर 2026

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री तसेच ॲग्रोव्हिजनचे प्रमुख प्रवर्तक नितीन गडकरी यांनी आज जलसंधारणासाठी सर्वंकष दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन केले. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवला पाहिजे, तसेच त्याचा योग्य आणि कार्यक्षम वापर केला पाहिजे, हे त्यांनी अधोरेखित केले.

“प्रत्येक घरातील पाणी त्याच परिसरात साठवले गेले पाहिजे, प्रत्येक शेतातील पाणी शेतातच अडवले गेले पाहिजे आणि प्रत्येक गावात पडणाऱ्या पावसाचे पाणी गावातच साठवले गेले पाहिजे. पाण्याचा एकही थेंब वाया जाता कामा नये.पाण्याची साठवण क्षमता वाढवण्यासाठी प्रत्येक थेंबाचा उपयोग झाला पाहिजे,” असे ते म्हणाले.

नागपूर येथील अमरावती मार्गावरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन असलेल्या ‘ॲग्रोव्हिजन 2026’ च्या उद्घाटन समारंभात आणि त्याअंतर्गत आयोजित जल परिषदेत ते बोलत होते.

यंदाच्या ॲग्रोव्हिजनचा मुख्य विषय ‘दुष्काळावर मात : जलव्यवस्थापन आणि पीक नियोजन’ हा आहे. महाराष्ट्राचे मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते जल परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचेही औपचारिक उद्घाटनही करण्यात आले.

या कार्यक्रमाला कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्था (ICRISAT) चे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि महाराष्ट्र पशू, मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, ॲग्रोव्हिजन सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मये, तसेच आयोजन सचिव रवी बोरटकर आणि रमेश मानकर उपस्थित होते.

सुमारे 17 वर्षांपूर्वी झालेल्या ॲग्रोव्हिजन उपक्रमाच्या स्थापनेचे स्मरण करुन गडकरी म्हणाले की अपुऱ्या सिंचन सुविधा, कापूस उत्पादनाच्या वाढत्या किंमती आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन हा उपक्रम सुरु करण्यात आला होता. आता शेतकऱ्यांचे अन्न उत्पादकापासून ते ऊर्जा उत्पादक, इंधन पुरवठादार आणि हायड्रोजन उत्पादक म्हणून टप्प्याटप्प्याने होणारे रूपांतर पाहून मोठे समाधान वाटते, असे त्यांनी सांगितले.

तंत्रज्ञानाधारित कृषीपद्धतीचे महत्त्व विशद करुन त्यांनी सांगितले की उत्पादनाचा खर्च कमी करुन त्याचवेळी कृषीउत्पादकता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. ॲग्रोव्हिजन च्या पुढील आवृत्तीपूर्वी किमान 5,000 शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेशी जोडण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांना प्रशिक्षण, आवश्यक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान प्रदान करुन त्यांचा आत्मविश्वास वाढवणे, हे ॲग्रोव्हिजनचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण करणे आणि कोणताही शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कधीही उचलणार नाही यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला.

या उद्घाटन समारंभात नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘ऊस: लागवड आणि प्रक्रियेवरील सर्वसमावेशक तांत्रिक माहिती’ या  पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.

कृषी प्रदर्शन अभ्यागतांसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत खुले आहे.

ॲग्रोव्हिजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शन 27 ते 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत, दररोज सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत अभ्यागतांसाठी खुले राहील.

याशिवाय शेतकऱ्यांसाठी दररोज दुपारी 12 ते  5 या वेळेत कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनात कृषी तंत्रज्ञान, प्रगत कृषी उपकरणे, संशोधन विकास, नाविन्यपूर्ण शेती पद्धती आणि संबंधित कृषी उपक्रम यांचे सादरीकरण आहे.


पीआयबी मुंबई | माधुरी पांगे/श्रद्धा मुखेडकर/भक्‍ती सोनटक्‍के/प्रिती मालंडकर 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2342797) अभ्यागत कक्ष : 10
Read this releasein: English