ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनटीपीसी मौदातर्फे बनावट भर्ती प्रस्तावांविरोधात जाहीर सावधानतेचा इशारा जारी

Posted On: 27 NOV 2026 5:13PM by PIB Mumbai

नागपूर, 27 नोव्हेंबर 2026

एनटीपीसी अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ (एनटीपीसी – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन)  मौदा यांनी संस्थेच्या नावाने प्रसारित होणाऱ्या बनावट भर्तीच्या जाहिराती आणि खोट्या नियुक्तीपत्रांबाबत नागरिकांना सावध करणारा जाहीर इशारा प्रसृत केला आहे. काही समाजकंटक नोकरीचे आमिष दाखवून उमेदवारांकडून पैशांची मागणी करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

एनटीपीसी मौदा यांनी स्पष्ट केले आहे की, संस्थेतील भर्ती प्रक्रिया केवळ अधिकृत आणि पारदर्शक पद्धतीनेच राबवली जाते. भर्ती किंवा नोकरीच्या संदर्भात उमेदवारांकडून पैसे मागण्याचा किंवा स्वीकारण्याचा अधिकार कोणत्याही व्यक्तीला, संस्थेला, सल्लागाराला किंवा मध्यस्थाला देण्यात आलेला नाही. भरतीसंदर्भातील सर्व अधिकृत अधिसूचना केवळ एनटीपीसीच्या करिअर्स पोर्टलवर, संकेतस्थळावरील करिअर्स विभागात किंवा संस्थेने अधिसूचित केलेल्या अन्य अधिकृत माध्यमांद्वारेच प्रसिद्ध केल्या जातात.

भर्तीसंदर्भातील सर्व पत्रव्यवहाराची सत्यता पडताळून पाहावी, वैयक्तिक, आर्थिक किंवा गोपनीय माहिती कोणाशीही शेअर करू नये आणि अशा फसव्या प्रकारांपासून सावध राहावे, असे आवाहन जनतेला करण्यात आले आहे. संशयास्पद नियुक्तीपत्र किंवा भरतीचा प्रस्ताव मिळाल्यास अथवा पैशांची मागणी केल्यास संबंधितांनी तातडीने मनुष्यबळ विकास विभाग, मौदा सुपर थर्मल पॉवर स्टेशन (MSTPS), प्रशासकीय इमारत, रामटेक रोड, मौदा, नागपूर, महाराष्ट्र – 441104 येथे संपर्क साधावा. तसेच, जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

अशा प्रकरणांच्या तपासात मदत होण्यासाठी संबंधित कागदपत्रे, पत्रव्यवहार, पैशांच्या व्यवहारांच्या नोंदी आणि संपर्क तपशील जतन करून ठेवावेत, असा सल्लाही नागरिकांना देण्यात आला आहे.

फसवणुकीच्या अशा प्रकारांमुळे होणाऱ्या कोणत्याही आर्थिक किंवा अन्य नुकसानीस एनटीपीसी मौदा जबाबदार राहणार नाही. नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि भरतीसंदर्भातील फसवणुकीला आळा घालणे, या व्यापक जनहिताच्या उद्देशाने हा सावधानतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.


पीआयबी मुंबई |सुवर्णा बेडेकर/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2342634) अभ्यागत कक्ष : 7
Read this releasein: English