गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय सुरक्षा रक्षक मुंबई विभागाकडून 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील वीरांना आदरांजली, हल्ल्यातून बचावलेल्या व्यक्तींचा सन्मान, दहशतवादाविरुद्धचा राष्ट्राचा अढळ निर्धार पुन्हा एकदा अधोरेखित


मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथे ‘NEVEREVER’ या संकल्पनेअंतर्गत स्मृतिसभा आणि शपथविधी कार्यक्रम

Posted On: 27 NOV 2026 5:13PM by PIB Mumbai

मुंबई, 27 नोव्हेंबर 2026

26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या जखमा देशाच्या सामूहिक जाणीवेत खोलवर कोरलेल्या असून दहशतवादाची भीषणता आणि असामान्य धैर्य, साहस आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीत केलेले सर्वोच्च बलिदान या सर्वांच्या त्या एकत्रित प्रतीक ठरल्या आहेत. दहशतवादाविरुद्धचा राष्ट्राचा अढळ निर्धार पुन्हा एकदा अधोरेखित करत राष्ट्रीय सुरक्षा रक्षक मुंबई विभागाकडून 26 नोव्हेंबर 2026 रोजी मुंबईत ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया येथे NEVEREVER - या संकल्पनेअंतर्गत स्मृतिसभा आणि शपथविधी कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम मुंबई दहशतवादी हल्ल्यात सर्वोच्च बलिदान देणाऱ्यांना आदरांजली वाहण्यासाठी, हल्ल्यातून बचावलेल्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी आणि या भ्याड हल्ल्यात प्राण गमावलेल्या प्रत्येक निष्पाप जीवाच्या स्मरणार्थ समर्पित होता.

खास तयार केलेल्या एका स्मारक परिसरात राष्ट्राच्या सेवेत  सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरवीरांचे छायाचित्र आणि नावे मांडून त्यांना  पुष्पांजली आणि मेणबत्त्या लावून आदरांजली वाहण्यात आली.

राष्ट्रसेवेसाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या शूरवीरांचे फोटो आणि नावे, तसेच पुष्पहार आणि मेणबत्त्या प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी प्रज्वलित करण्यात आलेल्या मेणबत्त्यांच्या मेणापासून साकारण्यात आलेले स्मृतिशिल्प हे दिवंगत वीरांच्या स्मृती आणि त्यांच्याप्रती असलेल्या आदराचे चिरंतन प्रतीक म्हणून उभे आहे. नागरिकांकडून या वीरांच्या सन्मानार्थ आणि स्मरणार्थ सातत्याने मेणबत्त्या प्रज्वलित करून श्रद्धांजली अर्पण केली.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या स्मारकाला भेट दिली आणि 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शूरवीरांना आदरांजली वाहिली. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या अभियानाला स्मारक स्थळाच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी देखील उदंड प्रतिसाद मिळाला. मुंबईमधील 11 महाविद्यालये आणि 26  शाळांमधील विद्यार्थ्यांनी यात मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. 60,000 पेक्षा अधिक नागरिकांनी शपथ घेऊन शांतता, दक्षता, नागरी कर्तव्य आणि एकजुटीने राष्ट्राचे सरंक्षण करण्याची वचनबद्धता दर्शवली.

या कार्यक्रमाला नागरिकांनी एकजुटीने सहभागी होत एकात्मता आणि सहवेदनेची भावना व्यक्त केली. यावेळी उपस्थितांनी प्रतिज्ञा ग्रहण समारंभात सहभाग घेतला तसेच हुतात्मे आणि या दुर्घटनेतून बचावलेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ आपल्या मनातील भावना आणि श्रद्धांजली संदेशांची नोंद केली.

रात्रीच्या वेळी गेटवे ऑफ इंडियाचा परिसर राष्ट्रीय तिरंग्याच्या रंगाने उजळून निघाला आणि त्यावर NEVEREVER हे शब्द दिव्यांनी रेखाटण्यात आले. या उपक्रमातून मुंबईचे प्रचंड धाडस आणि दहशतवादाचा सामना करुन त्याचा बिमोड करण्याचा देशाचा दृढनिश्चय पुन्हा एकदा दिसून आला.


 

सुवर्णा बेडेकर/भक्‍ती सोनटक्के/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2342627) अभ्यागत कक्ष : 15
Read this releasein: English