Posted On:
27 NOV 2026 3:00PM by PIB Mumbai
पणजी, 27 नोव्हेंबर 2026
अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, गोवा आणि भारतीय मानक ब्युरो (BIS) आयुर्वेद विभाग, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या संकुलात 27 नोव्हेंबर 2026 रोजी राष्ट्रीय स्तरावरील आयुष मानकीकरणावरील राष्ट्रीय परिषद - मानक राष्ट्रीय कृती योजना (SNAP) 2027–32 आयोजित करण्यात आली होती. उद्घाटन सत्राला नवी दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे (एआयआयए) संचालक प्रा. पी. के. प्रजापती, गोवा येथील एआयआयए च्या अधिष्ठाता प्रा. सुजाता कदम आणि सहयोगी अधिष्ठाता प्रा. मोहन जोशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी अधिष्ठाता प्रा. सुजाता कदम यांनी गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचा आजवरचा संस्थात्मक प्रवास, संस्थेची वाटचाल आणि विकास यावर प्रकाश टाकला.

भारतीय मानक ब्युरोच्या आयुर्वेद विभागाच्या संचालक सृष्टी दीक्षित यांनी स्वागतपर भाषण केले. यावेळी त्यांनी ब्युरोच्या कार्याचा आढावा घेतला तसेच आयुष क्षेत्रातील मानकीकरणासाठी संस्थेने हाती घेतलेल्या महत्त्वपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. याशिवाय, SNAP 2027–32 या उपक्रमाची उद्दिष्टे आणि त्यामागील संकल्पना यांचीही माहिती दिली. योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, सोवा-रिग्पा आणि होमिओपॅथी यांसारख्या आयुषच्या विविध शाखांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संबंधितांशी यावेळी विचारविनिमय करण्यात आला.

गुणवत्ता सुनिश्चित करण्यासह भविष्यातील प्राधान्यक्रम ठरवण्याच्या उद्देशाने या सर्व प्रणालींमध्ये मानकीकरण प्रक्रियेच्या आवश्यकतेवर यावेळी भर देण्यात आला. सर्व संबंधित घटकांच्या समन्वयातून या पारंपरिक आरोग्यसेवा पद्धतींना एकत्रित मानकीकरण प्रयत्नांद्वारे गुणवत्तेची हमी प्रदान करण्यासह, सुरक्षितता, एकसमानता आणि व्यापक मान्यता मिळावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. पारंपरिक आरोग्यसेवेची गुणवत्ता अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणकीकरण उपक्रमाशी संलग्न असल्याचा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या गोवा शाखेला विशेष अभिमान आहे.
_20261127140358_e4c159.jpeg)
पीआयबी मुंबई |नितीन फुल्लुके /भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai