पंचायती राज मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 16 व्या वित्त आयोगातील शिफारशींच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पंचायत राज मंत्रालयाची पहिली प्रादेशिक कार्यशाळा पणजीमध्‍ये संपन्न

Posted On: 26 NOV 2026 6:49PM by PIB Mumbai

पणजी, 26 नोव्हेंबर 2026

सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने 26 नोव्हेंबर 2026 रोजी गोव्यातील पणजी येथे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येणाऱ्या अनुदानासंदर्भात 16 व्या वित्त आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी पहिल्या प्रादेशिक कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत गोवा, महाराष्ट्र,गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या पाच राज्यांतील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह सुमारे 60 प्रतिनिधी सहभागी झाले होते.

पंचायत राज मंत्रालयाच्या संयुक्त सचिव  मुक्ता शेखर यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यशाळा पार पडली. यावेळी सहभागी राज्यांतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये गुजरातचे अतिरिक्त विकास आयुक्त  योगेश निर्गुडे, राजस्थानच्या संचालक कल्पना अग्रवाल, गोव्याच्या पंचायत संचालनालयाचे संचालक शगुन वेळीप आणि महाराष्ट्राच्या पंचायत राज विभागाचे उपसचिव मनोज कुमार सेठे यांचा समावेश होता. या चर्चेत गोव्यातील पंचायत राज संस्थांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारीही सहभागी झाले होते.

ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना वित्त आयोगाच्या अनुदानाचे प्रभावी आणि वेळेवर वितरण व्हावे तसेच या निधीचा योग्य विनियोग व्हावा, या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 16 व्या वित्त आयोगाच्या शिफारशी, परिचालन मार्गदर्शक तत्त्वे आणि त्यासंबंधीच्या अनुपालनाच्या अटींबाबत सर्व संबंधितांमध्ये एकमत घडवून आणणे, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.

या चर्चेत 16 व्या वित्त आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीशी संबंधित विविध मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात आला. यामध्ये अनुदानाची रूपरेषा, अनुपालनाच्या अटी, संस्थात्मक सज्जता, नियोजन आणि पंचायतींकडून अनुदानाचा विनियोग या बाबींचा समावेश होता. या कार्यशाळेमुळे सहभागी राज्यांना आपले अनुभव मांडण्याची, अंमलबजावणीतील आव्हाने स्पष्ट करण्याची आणि अनुदानाचे वेळेवर हस्तांतरण आणि त्याचा प्रभावी वापर सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्याची संधी मिळाली.

पंचायतींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांचे आर्थिक स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी स्वतःचे उत्पन्न वाढवणे महत्त्वाचे असल्याने, या कार्यशाळेत या विषयावर विशेष भर देण्यात आला. पंचायत राज संस्थांकडून स्वतःचे उत्पन्न  वाढवण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न, त्यातील आव्हाने आणि अवलंबलेल्या सर्वोत्तम पद्धती यांवर सहभागींनी चर्चा केली. तसेच, राज्यांना ‘समर्थ पोर्टल’शी जोडण्याबाबत आणि पंचायतींचे उत्पन्न आणि  खर्च यांचे व्यवस्थापन, देखरेख आणि अहवाल तयार करण्याची प्रक्रिया अधिक सक्षम करण्यात या पोर्टलची संभाव्य भूमिका यावरही विचारविनिमय झाला.

16 व्या वित्त आयोगाच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यांना मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष मदत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रादेशिक कार्यशाळांची मालिका आयोजित करण्यात येत आहे. या मालिकेतील ही पहिली कार्यशाळा होती. 3 जुलै 2026 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे राज्यांच्या पंचायत राज मंत्र्यांची राष्ट्रीय कार्यशाळा झाली होती. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून या प्रादेशिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत ही व्यापक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ‘आत्मनिर्भर पंचायत’ आणि ‘विकसित पंचायत’ ही संकल्पना पुढे नेण्यावर या कार्यशाळेत भर देण्यात आला. त्यासाठी पंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम, कार्यक्षम आणि उत्तरदायी असणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. गोवा सरकारच्या पंचायत राज विभागाच्या सहकार्याने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.


पीआयबी मुंबई |  सुवर्णा बेडेकर/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2342167) अभ्यागत कक्ष : 13
Read this releasein: English