आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जैववैद्यकीय नवोन्मेष आणि संशोधनातील उत्कृष्टतेचा गौरव करत नागपूर येथील एम्स संस्थेत 7 व्या राष्ट्रीय विज्ञान परिषदेचे (एनबीआरसीओएम 2026) यशस्वी आयोजन

Posted On: 26 NOV 2026 4:48PM by PIB Mumbai

नागपूर, 26 नोव्हेंबर 2026

नागपूर येथील अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेने (एआयआयएमएस -एम्स), भारतीय युवा जैववैद्यकीय वैज्ञानिक संस्थेच्या (एसवायबीएस) सहकार्याने आयोजित केलेल्या 7 व्या राष्ट्रीय विज्ञान परिषदेचा (एनबीआरसीओएम 2026) यशस्वीरीत्या समारोप झाला. दिनांक 18 ते 22 नोव्हेंबर, 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात, वैज्ञानिक उत्कृष्टता, नवोन्मेष आणि संशोधन यांचा गौरव करण्यासाठी, देशभरातून प्रख्यात शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ तसेच तरुण संशोधक यांच्यासह 400 हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते.

दिग्गजांच्या उपस्थितीत झालेले उद्घाटन

नागपूर येथील एम्सचे कार्यकारी संचालक, मुख्य पॅट्रन प्रा.प्रशांत पी.जोशी यांच्या हस्ते झालेल्या भव्य उद्घाटनाने या पाच दिवसीय परिषदेची सुरुवात झाली. यावेळी प्रा.जोशी यांनी तरुण संशोधकांना उद्देशून नैतिक आणि अर्थपूर्ण संशोधनावर भर देणारे, प्रेरणादायी भाषण केले. या  कार्यक्रमात भारतीय सार्वजनिक आरोग्य आणि जैववैद्यकीय संशोधन क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित मान्यवरांची सन्माननीय उपस्थिती लाभली होती.भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळाच्या (आयसीएमआर) माजी महासंचालक तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) माजी मुख्य शास्त्रज्ञ, डॉ.सौम्या स्वामिनाथन यांनी प्रमुख अतिथी म्हणून दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आभासी उपस्थिती नोंदवली. नीती आयोगाचे सदस्य डॉ.एम.श्रीनिवास यांनी देखील याच प्रकारे आभासी उपस्थिती नोंदवली, तर केंद्र सरकारच्या जैववैद्यकीय तंत्रज्ञान विभागाचे माजी वैज्ञानिक सल्लागार डॉ.टी.एस.राव आणि आयसीएमआरमध्ये कार्यरत डॉ.शिंजीनी भटनागर देखील यावेळी उपस्थित होते.

वैज्ञानिक कार्यक्रम आणि स्पर्धा

एनबीआरसीओएम 2026 मध्ये कार्यक्रमांसाठी वैविध्यपूर्ण मिश्र स्वरूपाचा स्वीकार करण्यात आला होता. दिनांक 18 आणि 19 नोव्हेंबर रोजी आभासी संशोधन सादरीकरणे झाली, त्यानंतर 20 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत एम्स नागपूर परिसरात एका सखोल, ऑफलाईन वैज्ञानिक कार्यक्रमाचे प्रत्यक्ष आयोजन करण्यात आले. सहभागींनी यावेळी उच्चस्तरीय मौखिक तसेच पोस्टर सादरीकरणाच्या माध्यमातून, आरोग्य विज्ञान, जैवविज्ञान तसेच औषधनिर्माण या क्षेत्राशी संबंधित क्रांतिकारी संशोधने सादर केली. विविध स्पर्धांच्या आयोजनापलीकडे जात, या परिषदेत सादर झालेल्या सर्वसमावेशक कार्यक्रमांमध्ये सखोल शास्त्रीय चर्चा, बौद्धिक संपदाविषयक अधिकारांवर आधारित एक वैशिष्ट्यपूर्ण सत्र तसेच जैववैद्यकीय संशोधन आणि नवोन्मेष या क्षेत्रांतील उदयोन्मुख पद्धतींविषयी सहयोगात्मक चर्चा इत्यादी उपक्रमांचा समावेश होता.

पारितोषिके आणि समारोप

या कार्यक्रमाचा समारोप पारितोषिक वितरण समारंभाने झाला. तरुण संशोधकांची असामान्य संशोधन सादरीकरणे आणि शाखीय योगदान यांसाठी एकूण 30 लाख रुपयांच्या रोख बक्षिसांचे वितरण करण्यात आले. वैज्ञानिक नेतृत्व, मार्गदर्शन आणि जैववैद्यकीय नवोन्मेष यांमधील अतुलनीय उत्कृष्टतेचा गौरव करणाऱ्या प्रतिष्ठित आयएनडीओ-एनओव्हीए विज्ञान पुरस्काराचे डॉ.शिंजीनी भटनागर यांच्या हस्ते वितरण हा या परिषदेचा परमोच्च बिंदू ठरला.

आयोजन समितीच्या समर्पित प्रयत्नांसह,इतर सहाय्यक सदस्यांनी केलेल्या मदतीमुळे एनबीआरसीओएम 2026 मोठ्या प्रमाणात यशस्वी करणे शक्य झाले. एनबीआरसीओएम 2026च्या सुरळीत अंमलबजावणीमुळे, वैज्ञानिक उत्कृष्टतेला चालना देण्याप्रती, आंतरशाखीय सहयोगाला प्रोत्साहन देण्याप्रती, आणि तरुण संशोधकांना त्यांचे कार्य सादर करण्यासाठी आणि जैववैद्यकीय विज्ञानाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी प्रमुख राष्ट्रीय मंच उपलब्ध करून देण्याप्रती एम्स नागपूर या संस्थेच्या सशक्त कटिबद्धतेची पुष्टी झाली आहे.


पीआयबी नागपूर |निलीमा चितळे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2342091) अभ्यागत कक्ष : 19
Read this releasein: English