गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

"NEVEREVER"-गेटवे ऑफ इंडिया येथे 26/11 स्मृतिसभा आणि शपथविधी सोहळा

Posted On: 25 NOV 2026 8:29PM by PIB Mumbai

मुंबई, 25 नोव्हेंबर 2026

राष्ट्रीय सुरक्षा रक्षक मुंबई विभाग, मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथे "NEVEREVER - पुन्हा कधीही नाही" या संकल्पनेअंतर्गत एक स्मृतिसभा आणि शपथविधी सोहळा आयोजित करणार आहे. याअंतर्गत 26/11 च्या मुंबई हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेल्या वीरांना आदरांजली, हल्ल्यातून बचावलेल्या व्यक्तींचा सन्मान आणि पीडित व्यक्तींचे स्मरण केले जाणार आहे. अशा प्रकारची दुर्दैवी घटना पुन्हा कधीही घडू नये या देशाच्या सामूहिक संकल्पाचा या माध्यमातून पुनरुच्चार केला जाणार आहे.

मुंबई स्मारक विभागाच्या वतीने या हल्ल्यात सर्वोच्च बलिदान दिलेल्यांची नावे आणि छायाचित्र मांडली जातील आणि त्यांना पुष्पांजली आणि मेणबत्त्या लावून आदरांजली वाहिली जाईल. मेणाच्या दिव्यांपासून साकारण्यात आलेले एक अनोखे “जिवंत  स्मारक” यावेळी सादर करण्यात येणार असून, भविष्यातील स्मृतिदिनांच्या कार्यक्रमांसाठी ते जतन करून ठेवण्यात येणार आहे. या सर्वांच्या स्मरणाची भावना सतत जागृत राहावी याकरिता मुंबईमधील 11 महाविद्यालये आणि 26  शाळांमध्ये "NEVEREVER - पुन्हा कधीही नाही" या संकल्पनेअंतर्गत शपथ ग्रहण सोहळा आयोजित केला जाईल. यामाध्यमातून  युवकांमध्ये शांतता, दक्षता आणि राष्ट्रीय सुरक्षेप्रती असलेल्या बांधिलकीची जाणीव निर्माण करता येईल. या कार्यक्रमाला 26/11 हल्ल्यातील शहिदांचे कुटुंबीय, मान्यवर व्यक्ती आणि नागरिक उपस्थित राहणार आहेत.

नागरिकांना हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करता यावी तसेच तसेच हल्ल्यातून बचावलेले नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती आत्मीयता आणि आदर भावना व्यक्त करता यावी यासाठी प्रतिज्ञा नोंदणी कक्ष आणि संदेश लेखन केंद्र उभारण्यात येणार आहे. या कार्यक्रमात हल्ल्यातून बचावलेल्यांचा आणि शहीदांच्या कुटुंबीयांचा सन्मान केला जाईल तसेच विशेष दृकश्राव्य सादरीकरण देखील केले जाणार आहे. रात्री  गेटवे ऑफ इंडियाचा परिसर राष्ट्रीय तिरंग्याच्या रंगाने उजळून निघेल आणि मुंबईची चिकाटी आणि देशाचे अदम्य साहस आणि दृढ निश्चयाचे प्रतीक म्हणून "NEVEREVER" हे शब्द दिव्यांनी रेखाटले जातील.

नितीन फुल्लुके/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2341577) अभ्यागत कक्ष : 11
Read this releasein: English