Posted On:
25 NOV 2026 7:37PM by PIB Mumbai
मुंबई, 25 नोव्हेंबर 2026
भारतीय अन्नसुरक्षा आणि प्रमाणन प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) पश्चिम विभाग कार्यालयाने काल 24 नोव्हेंबर 2026 रोजी, बुलढाणा जिल्ह्यात शेगाव येथे संत श्री गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात (एसएसजीएमसीई), सेवा सप्ताह 2026 अंतर्गत खाद्यपदार्थ पथविक्रेत्यांसाठी भव्य प्रशिक्षण आणि जागरुकता कार्यक्रमाचे (मेगा स्ट्रीट फूड व्हेंडर्स ट्रेनिंग अँड अवेअरनेस प्रोग्रॅम)आयोजन केले. या कार्यक्रमाला रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणारे, महिला उद्योजक, स्थानिक नागरिक तसेच इतर भागधारकांसह 1,500 पेक्षा जास्त जणांनी उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव उपस्थित होते. एफएसएसएआयच्या पश्चिम विभागाच्या क्षेत्रीय संचालक प्रीती चौधरी, एसएसजीएमसीईचे प्राचार्य डॉ.एस.बी.सोमाणी यांच्यासह जिल्हा कार्यालयाचे ज्येष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अन्न सुरक्षा ही सामायिक जबाबदारी आहे यावर अधिक भर देत खाद्यपदार्थ तयार करताना स्वच्छता, आरोग्यपूर्ण वातावरण तसेच गुणवत्ता राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले. रस्त्यांवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांना पदार्थांच्या सुरक्षित हाताळणी पद्धती स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करून, अधिक आरोग्यपूर्ण भारताच्या संकल्पनेत योगदान देण्याचे आवाहन केंद्रीय मंत्र्यांनी या विक्रेत्यांना केले.

एफएसएसएआयच्या पश्चिम विभागाच्या क्षेत्रीय संचालक प्रीती चौधरी यांनी मुलभूत स्तरावर अन्नसुरक्षा बळकट करण्यासाठी एफएसएसएआयने सुरु केलेले उपक्रम अधोरेखित केले. रस्त्यांवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांना त्यांनी आरोग्यपूर्ण पद्धतींचा स्वीकार करण्यासाठी, आवश्यक एफएसएसएआय नोंदणी करून घेण्यासाठी तसेच अन्न सुरक्षेला त्यांच्या व्यवसायाच्या दैनंदिन कामकाजाचा भाग बनवण्यासाठी प्रोत्साहित केले.

सुमारे 1,500 हून अधिक लोकांचा या उपक्रमातील प्रचंड सहभाग, अन्न सुरक्षा विषयक जागरुकतेच्या तसेच क्षमता निर्मिती उपक्रमांच्या बाबतीत समाजाचा सशक्त प्रतिसाद दर्शवतो. खाद्यपदार्थ पथविक्रेते आणि महिला उद्योजक यांना ग्राहकांसाठी निर्धोक आणि आरोग्यपूर्ण खाद्यपदार्थ पुरवण्याची सुनिश्चिती करण्याच्या उद्देशाने व्यावहारिक ज्ञान आणि कौशल्यांसह सक्षम करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

नितीन फुल्लुके/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai