गोवा, 24 नोव्हेंबर 2026
57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा एक भाग म्हणून आज गोव्यातल्या कला अकादमीत अभिनेते आणि अभिनय प्रशिक्षक सौरभ सचदेवा यांनी ‘तुम्हाला अभिनेता होण्यापासून काय रोखतंय?’ या विषयावर विशेष कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेत अभिनयाची आवड असलेल्या अनेक तरुणांनी भाग घेतला. अभिनेता होण्याची महत्त्वाकांक्षा असूनही अनेकदा ती पूर्ण करण्यापासून रोखणाऱ्या मानसिक, व्यावहारिक आणि वैयक्तिक अडथळ्यांचा या कार्यशाळेत वेध घेण्यात आला.
संवादात्मक चर्चा आणि प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून सचदेवा यांनी सहभागी तरुणांना केवळ अभिनेता होण्याची इच्छा बाळगण्यापलीकडे जाऊन, आपल्याला रोखून धरणारी भीती, सवयी आणि दृष्टिकोन यांचा विचार करायला प्रोत्साहित केले.
_20261124191247_a90479.jpeg)
ऑडिशनमध्ये असणारी अनिश्चितता आणि नकार यांविषयी बोलताना ते म्हणाले की, एखाद्या कलाकाराची निवड का झाली किंवा त्याला नकार का मिळाला, याचे कारण त्याला नेहमीच समजू शकते असे नाही. कारण कलाकारांच्या निवडप्रक्रियेत अनेक व्यक्तींचा सहभाग असतो. एखाद्या विशिष्ट ऑडिशनशी भावनिकदृष्ट्या अधिक जोडले जाऊ नका, असा सल्ला देताना ते म्हणाले, “तुम्हाला तुमची निवड का झाली नाही, हे कधीच कळणार नाही. तुम्ही फक्त त्यांना तुमचं काम कसं वाटलं, एवढंच विचारु शकता, बस्स.” ऑडिशनचा निकाल स्वीकारणे, पुढील ऑडिशन देत राहणे आणि उत्तराच्या प्रतीक्षेत अनिश्चित काळ थांबून न राहता पुढे जाणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एखादी गोष्ट आवडणे आणि तिची खरोखर निकड असणे यातला फरक हा या कार्यशाळेतला एक महत्त्वाचा विषय होता. सहभागी तरुणांना आपल्या बांधिलकीचा विचार करायला प्रवृत्त करत सचदेव यांनी विचारले, “तुम्हाला अभिनेता व्हायला आवडतं की तुम्हाला अभिनेता होण्याची खरोखर निकड आहे?” एखादी गोष्ट आवडणे हे केवळ रुची असण्यापुरते मर्यादित राहू शकते, मात्र तिच्याविषयी निकड असण्यासाठी जबाबदारीची जाणीव, लक्ष आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असतात, असे त्यांनी स्पष्ट केले. आपल्यापैकी बहुतेकांना स्वतःचे काम आवडते, पण आपण त्याची खरोखर काळजी घेत नाही, असे ते म्हणाले. आपल्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आवश्यक असलेली बांधिलकी आपल्या कृतीतून दिसते का, याचे आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन त्यांनी नवोदित कलाकारांना केले.
सामाजिक टीकेच्या भीतीविषयी बोलताना सौरभ सचदेव यांनी सामाजिक जोखीम हा कलाकारांच्या वाटचालीतील आणखी एक महत्त्वाचा अडथळा असल्याचे सांगितले. “सर्वांत मोठी समस्या ही सामाजिक जोखमीची आहे.” असे ते म्हणाले. अभिनय करताना कलाकारांना स्वतःला इतरांसमोर व्यक्त करावे लागते, लोकांशी संवाद साधावा लागतो आणि त्यांच्या मतांची किंवा दृष्टिकोनाची अवाजवी चिंता न करता लोकांपर्यंत पोहोचावे लागते, असे त्यांनी स्पष्ट केले. स्वतःचे विचार आणि भावना आत्मविश्वासाने व्यक्त करण्याची तसेच लोकांशी सहजपणे संवाद साधण्याची क्षमता कलाकारांनी विकसित केली पाहिजे, असेही त्यांनी अधोरेखित केले.
महत्त्वाकांक्षा आणि प्रत्यक्ष कृती यांचा मेळ घालण्याची गरज अधोरेखित करताना सचदेव यांनी सहभागी कलाकारांना आपल्या दैनंदिन दिनक्रमाचे आणि सवयींचे आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले. आपण ज्या यशाची अपेक्षा करतो, त्या पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या रोजच्या सवयी आणि प्रयत्न पुरेसे आहेत का, याचा विचार करायला हवा, असे त्यांनी सांगितले. महत्त्वाकांक्षेची पातळी जितकी मोठी असेल, तितकीच तयारी, शिस्त आणि समर्पणाचीही गरज असते. त्यासाठी प्रशिक्षण, शारीरिक तयारी, जीवनशैली आणि दैनंदिन सवयींमध्ये आवश्यक ते बदल करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ध्येय आणि त्यामागील प्रेरणेचे महत्त्व सांगताना सचदेव यांनी सहभागी कलाकारांना अभिनय क्षेत्रात येण्याची सुरुवातीची प्रेरणा पुन्हा आठवण्यास सांगितले. वैयक्तिक अनुभवांनुसार माणसाची प्रेरणा आणि ध्येय काळानुसार बदलू शकते, असे त्यांनी नमूद केले. स्वतःच्या प्रवासाविषयी सांगताना त्यांनी सुरुवातीच्या काळात स्वतःला व्यक्त करताना आलेल्या अडचणींनी आपल्या आयुष्याचे ध्येय कसे घडवले, हे स्पष्ट केले. “लोकांना अभिव्यक्त होण्यासाठी व्यासपीठ देणे आणि निर्मितीची ताकद देणे,” हे आपले ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. नवोदित कलाकारांनी अभिनय क्षेत्रात येण्यामागील आपली मूळ प्रेरणा कायम जपावी आणि केवळ ऑडिशन्स, निवड किंवा बाह्य मान्यता यांनाच यशाचे मापदंड न मानता आपल्या कलेतून स्वतःला व्यक्त करण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले.
आपल्याला या मास्टरक्लास मधून सहभागी कलाकारांना आत्मपरीक्षण करण्याची आणि अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी नेमके काय आवश्यक आहे, याचा नव्याने विचार करण्याची गरज असल्याचे सांगण्याची संधी मिळालीअसे ते म्हणाले. भीतीवर मात करणे, नकार स्वीकारणे, जोखीम पत्करणे, अभिनयातील मूलभूत कौशल्ये अधिक भक्कम करणे आणि महत्त्वाकांक्षेचे रूपांतर सातत्यपूर्ण कृतीत करणे, या गोष्टी केवळ उत्तम अभिनेता होण्यासाठीच नव्हे, तर अभिनय क्षेत्रातील अर्थपूर्ण आणि दीर्घकालीन प्रवासासाठीही अत्यावश्यक असल्याचे सचदेव यांनी आपल्या मार्गदर्शनातून अधोरेखित केले.
Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्पलकट्टी/निखिलेश चित्रे/वैभवी जोशी/दर्शना राणे