ग्रामीण विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नाबार्डकडून गोव्यात राज्य ग्रामीण विकास परिषदेचे आयोजन; ₹17,343 कोटींच्या पत क्षमतेचा अंदाज

Posted On: 24 NOV 2026 8:17PM by PIB Mumbai

पणजी, 24 नोव्हेंबर 2026

ग्रामीण उपजीविका आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी एक आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने (नाबार्ड) आज, 24 नोव्हेंबर रोजी गोव्यात राज्य ग्रामीण विकास परिषदेचे आयोजन केले होते.

मुख्य सचिव डॉ. व्ही. कांदावेलू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या परिषदेत राज्य सरकार, भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय), राज्यस्तरीय बँकर्स समिती (एसएलबीसी), आयसीएआर-सीसीएआरआय (ICAR-CCARI), विविध बँका आणि विकास संस्थांचे अधिकारी सहभागी झाले होते.

उत्तर गोवा, दक्षिण गोवा आणि कुशावती क्षेत्रासाठी तयार करण्यात आलेल्या संभाव्यत आधारित पत आराखड्यानुसार, नाबार्डने 2027-28 या आर्थिक वर्षासाठी गोव्याची एकूण पत क्षमता ₹17,343 कोटी इतकी अंदाजित केली आहे.

उपस्थितांना संबोधित करताना, डॉ.कांदावेलू यांनी सर्व भागधारकांना 'विकसित गोवा 2037' च्या दृष्टिकोनाशी आपले प्रयत्न सुसंगत करण्याचे आणि विकासाचे प्रत्यक्ष परिणाम साध्य करण्यासाठी संस्थात्मक आर्थिक कौशल्याचा पुरेपूर वापर करण्याचे आवाहन केले.

या एकदिवसीय परिषदेत काजू बागांचे पुनरुज्जीवन, फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, भूजल आणि सागरी मत्स्यव्यवसाय, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, जीआय-टॅग उत्पादने आणि ग्रामीण पर्यटन यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सर्वसमावेशक मूल्य साखळी विकसित करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
तसेच, उत्तम प्रशासन, खेळत्या भांडवलाची उपलब्धता आणि बाजारपेठेशी अधिक मजबूत जोडणी यांच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक संघटना, प्राथमिक कृषी पतसंस्था, स्वयंसहायता गट आणि सहकारी संस्थांचे सक्षमीकरण करण्याचे महत्त्वही उपस्थितांनी यावेळी अधोरेखित केले.

या चर्चेतून पुढे आलेल्या शिफारशी नाबार्डच्या आगामी 'फोकस पेपर 2027-28' साठी मार्गदर्शक आराखडा म्हणून काम करतील आणि राज्य सरकार व बँकिंग संस्थांच्या भविष्यातील धोरणनिर्मितीसाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वास नाबार्डने व्यक्त केला.


पीआयबी मुंबई | नितीन फुल्लुके/वैभवी जोशी/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai
 

 


(Release ID: 2340954) अभ्यागत कक्ष : 5
Read this releasein: English