गोवा, 24 नोव्हेंबर 2026
57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) एक भाग असलेल्या आणि पणजीतील कला अकादमी येथे पार पडलेल्या ‘पेज से पीच तक’ या पहिल्याच पटकथा लेखन उपक्रमातील विजेत्यांची नावे प्रसार भारतीने आज जाहीर केली. प्रसार भारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी यांची ही संकल्पना होती. उदयोन्मुख लेखकांना आपल्या कथा सादर करण्यासाठी दरवर्षी एक राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये चित्रपट, माहितीपट व लघुपट या श्रेणींमध्ये दहा भारतीय भाषांमधील मूळ कथा सादर करण्यात आल्या.
_20261124160240_59c463.jpeg)
या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि घोषणा झाल्यानंतर केवळ दहा दिवसांमध्ये सुमारे 1,000 कथा प्राप्त झाल्या. देशातील युवा लेखकांमध्ये कथेलेखनाचे प्रचंड कौशल्य असून सर्जनशीलतेची आकांक्षा असल्याचेच यातून दिसून आले.
अविनाश झा यांना ‘मिर्ची केक’ या कथेसाठी ₹5 लाखांचे पहिले पारितोषिक मिळाले. सत्य व्यास यांना ‘संहार’ साठी ₹3 लाखांचे द्वितीय पारितोषिक तर जितेश ठाकूर यांना ‘शरद पूर्णिमा’ या कथेसाठी ₹2 लाखांचा तृतीय पुरस्कार मिळाला.
पुरस्कार वितरण समारंभाला माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव प्रिथुल कुमार आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे (एनएफडीसी) व्यवस्थापकीय संचालक धीरज सिंग उपस्थित होते.
उदयोन्मुख लेखकांची प्रतिभा ओळखून तिला प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे प्रिथुल कुमार यावेळी म्हणाले. युवा भारताची सर्जक क्षमता ओळखणे आणि देशातील युवकांना कोणत्या कथा सांगण्याची इच्छा आहे याचा शोध घेणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. चित्रपट निर्मितीमधील पटकथा लेखनाचे महत्त्व अधोरेखित करुन ते म्हणाले की, पटकथा हे चित्रपट निर्मितीतील पहिले पाऊल आणि नियोजन ही मूलभूत गरज आहे, असे सांगून, प्रभावी पटकथा आणि दमदार कथानक हे यशस्वी चित्रपटनिर्मितीचे भक्कम आधार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

दूरदर्शनच्या महासंचालिका रीना सोनोवाल कौली यांनी स्वागतपर भाषण केले. भारतातील भाषिक आणि सर्जनशील विविधता राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित करण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचं महत्त्व त्यांनी विशद केले. उदयोन्मुख लेखकांना त्यांच्या स्वतःच्या मूळ कल्पना राष्ट्रीय व्यासपीठावर सादर करण्याची संधी उपलब्ध करून देणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
पटकथा सादरीकरणाच्या सत्रात अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या दहा स्पर्धकांनी परीक्षक मंडळासमोर आपल्या मूळ पटकथा सादर केल्या गेल्या. या परीक्षक मंडळात अभिनेते आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त मनोज जोशी, भारतीय इतिहास, संस्कृती विषयाचे लेखक, संपादक आणि स्वतंत्र संशोधक संदीप बालकृष्ण, टॉयलेट : एक प्रेम कथा’ आणि ‘बत्ती गुल मीटर चालू’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक आणि संकलक, नारायण सिंह तसेच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारप्राप्त पत्रकार, लेखक आणि चित्रपट समीक्षक आणि पुणे येथील भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था अर्थात एफटीआयआयच्या नियामक परिषदेचे उपाध्यक्ष अनंत विजय यांचा समावेश होता.
अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या स्पर्धकांमधून चौथा, पाचवा आणि सहावा क्रमांक मिळवणाऱ्या लेखकांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे विशेष पुरस्कार देण्यात आले. सातवा, आठवा, नववा आणि दहावा क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकांना प्रशस्तिपत्रं, तर अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या सर्वोत्तम 30 लेखकांना सहभाग प्रमाणपत्रं प्रदान करण्यात आली.

21 ते 23 नोव्हेंबर 2026 या कालावधीत आयोजित पेज से पिच तक या उपक्रमाचा उद्देश, नवोदित लेखक आणि चित्रपटसृष्टी यांच्यातील दरी कमी करणे, तसेच त्यांच्या मूळ कल्पनांना चित्रपटाच्या पडद्यावर साकारण्याची संधी उपलब्ध करून देणे हा आहे. दरवर्षी आयोजित करण्याचा मानस असलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून आशादायी कथालेखकांना चित्रपटसृष्टीतील व्यावसायिकांशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यांच्या पटकथांचे पूर्ण लांबीचे चित्रपट, माहितीपट आणि लघुपटांमध्ये रूपांतर होण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे, हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे.
Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | राधिका अघोर/सुरेखा जोशी/राज दळेकर/दर्शना राणे