गोवा, 24 नोव्हेंबर 2026
अरबी भाषेतील ‘द ब्लॅक सी’ या कथापटाच्या निर्मात्यांनी आज गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान पत्रसूचना कार्यालयाच्या माध्यम केंद्रात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या चित्रपटाद्वारे पदार्पण करणारे दिग्दर्शक अलादीन मोस्तफा, निर्माते हम्दी सामेह आणि चित्रपटाचे संकलक तसेच कार्यकारी निर्माते मोताझ नाशी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना चित्रपटाची निर्मितीप्रक्रिया, त्याची वैश्विक प्रासंगिकता आणि संकलनाच्या प्रक्रियेत जाणीवपूर्वक केलेल्या कलात्मक निवडी यांविषयी माहिती दिली.
_20261124131658_3331de.jpeg)
‘द ब्लॅक सी’ या चित्रपटामागच्या प्रेरणा आणि पहिल्याच कथापटासाठी या विषयाची निवड करण्याविषयी बोलताना दिग्दर्शक अलादीन मोस्तफा यांनी इफ्फीमध्ये आपला चित्रपट सादर करण्याची आणि अरब संस्कृतीतील एक कथा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आणण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. माणसे आपली उद्दिष्टे कोणत्याही परिस्थितीत साध्य करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांच्या अनिर्बंध इच्छा कशा अनियंत्रित स्वरूप धारण करू शकतात, याचा वेध या चित्रपटात घेण्यात आला आहे, असे चित्रपटाच्या आशयाविषयी बोलताना त्यांनी सांगितले. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी माणसे टोकाची पावले उचलतात, तेव्हा ती किती टोकाला जाऊ शकतात, हा प्रश्नही चित्रपटातून उपस्थित करण्यात आला आहे, असे ते यावेळी म्हणाले.

इफ्फीमध्ये भारतीय आणि जागतिक प्रेक्षकांसमोर इजिप्शियन चित्रपट सादर करण्याविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना निर्माते हम्दी सामेह यांनी या कथेचे विविध संस्कृतींना जोडणारे स्वरूप अधोरेखित केले. ते म्हणाले की, ‘द ब्लॅक सी’ हा अरबी भाषेतील इजिप्शियन चित्रपट असला, तरी तो कोणत्याही विशिष्ट संस्कृतीपुरता किंवा भौगोलिक प्रदेशापुरता मर्यादित नाही, हे त्यांनी अधोरेखित केले. हा चित्रपट जगभरातल्या लोकांच्या अनुभवांशी जोडलेल्या एका समान मानवी भावनेविषयी बोलतो. जगाच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या माणसांच्या मूलभूत इच्छा सारख्याच असतात. त्यामुळेच हा चित्रपट भारतातल्या आणि जगभरातल्या प्रेक्षकांशी सहजपणे जोडला जाऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.
एका कुटुंबातील पात्रांभोवती गुंफलेल्या आणि एका मानसिक संघर्षाचे चित्रण करणाऱ्या या चित्रपटाच्या तांत्रिक व कथनात्मक दृष्टीकोनाविषयी बोलताना; चित्रपटाचे संपादक व कार्यकारी निर्माते मोताझ नॅशी यांनी कथेतील तणाव व घुसमटलेपण दर्शविण्यासाठी लय आणि गती यांचा वापर केल्याचे सांगितले. चित्रपटाच्या कथेत खोलवर दडलेला आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हे खरे आव्हान होते, असे ते म्हणाले. जलदगतीने संकलनाचे काम करण्याऐवजी आम्ही एक सावकाश, थोडी संथ लय मुद्दाम निवडली कारण; चित्रपटातील पात्रांचा अनुभव प्रेक्षकांना आपलाच वाटावा आणि चित्रपटकर्त्यांचा मूळ हेतू त्यांच्यापर्यंत पोहोचावा हा आमचा उद्देश होता.

पत्रकार परिषदेचा समारोप करताना निर्मात्यांनी इफ्फीच्या आयोजकांचे तसेच भारतीय प्रेक्षकांनी दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले. वातावरणातले चैतन्य आणि विचार प्रवर्तक आशय याद्वारे मानवाबाबतचे वैश्विक सत्य व प्रादेशिक कथाकथन यांचा मेळ साधणाऱ्या द ब्लॅक सी या चित्रपटाने इफ्फी 57 मधील प्रेक्षकांना भवतालाचा विसर पाडला. या पत्रकार परिषदेचे संचालन सृष्टी सुरेश कुलये यांनी केले.

इजिप्शियन संस्कृतीचा गाभा असलेला तरीही सगळ्याच ठिकाणच्या समाजाला लागू असलेली संकल्पना मांडणारा द ब्लॅक सी चित्रपट इफ्फी 2026 च्या ‘सीमांचे बंधन नसलेल्या कथा’ या संकल्पनेचा आत्मा आहे. भाषा व सांस्कृतिक सीमा ओलांडून, समान मानवी भावभावनांद्वारे चित्रपट कशाप्रकारे लोकांना एकत्र आणू शकतो; हे मानवी लालसेचे वैश्विक रुप दर्शविणाऱ्या आणि कथा सांगण्याचा वेगळा दृष्टीकोन असलेल्या या चित्रपटाने दाखवून दिले आहे.
Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | राधिका अघोर/निखिलेश चित्रे/सुरेखा जोशी/दर्शना राणे