Posted On:
23 NOV 2026 7:09PM by PIB Mumbai
मुंबई, 23 नोव्हेंबर 2026
सायप्रस प्रजासत्ताकाच्या नौवहन उपमंत्री मरीना हाजीमानोलिस यांच्या भारताच्या अधिकृत दौऱ्याचा एक भाग म्हणून आज मुंबईत भारत–सायप्रस सागरी व्यवसाय मंचाचे आयोजन करण्यात आले. या मंचाला सायप्रसच्या नौवहन उपमंत्री हाजीमानोलिस आणि भारत सरकारच्या बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे सागरी प्रशासन महासंचालक श्याम जगन्नाथन यांनी संयुक्तपणे संबोधित केले. या मंचामध्ये भारत आणि सायप्रस सरकारचे वरिष्ठ प्रतिनिधी, सागरी प्राधिकरणे, वाणिज्य मंडळे तसेच दोन्ही देशांतील प्रमुख सागरी कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले. नौवहन, जहाज व्यवस्थापन, जहाज बांधणी आणि दुरुस्ती, नाविकांची भरती आणि प्रशिक्षण, सागरी सेवा, तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि हरित नौवहन या क्षेत्रांतील सहकार्याला चालना देणे हा या मंचाचा उद्देश होता.
जून 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायप्रसला दिलेली भेट, त्यानंतर मे 2026 मध्ये सायप्रस प्रजासत्ताकाच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताला दिलेली भेट आणि दोन्ही देशांमधील संबंधांना धोरणात्मक भागीदारीचा दर्जा देण्यात आला. भारत–सायप्रस संबंधांना मिळालेल्या गतीच्या पार्श्वभूमीवर या मंचाचे आयोजन करण्यात आले होते. नौवहन, जहाज बांधणी, बंदरे, लॉजिस्टिक्स, गुंतवणूक आणि संपर्कव्यवस्था या क्षेत्रांतील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या पंतप्रधानांच्या संदेशासह, दोन्ही देशांच्या नेतृत्वाने सागरी आणि व्यावसायिक संबंध अधिक बळकट करण्यासाठी दिलेले महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.
उद्घाटनपर भाषणात श्याम जगन्नाथन यांनी भारतातील बदलत्या सागरी क्षेत्राचा आढावा घेत आंतरराष्ट्रीय भागीदारीच्या संधींवर प्रकाश टाकला. जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्ती क्षमतांचा विस्तार, जागतिक स्तरावरील भारतीय नाविकांचे प्रमाण वाढवणे, शाश्वत जहाज पुनर्वापर व्यवस्था बळकट करणे, डिजिटलायझेशनला गती देणे आणि हरित नौवहनाकडे संक्रमणाला प्रोत्साहन देणे यावर भारताचा भर असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताच्या सागरी विकास आराखड्यात जहाज बांधणी क्षेत्रासाठी ₹69,725 कोटींच्या पॅकेजचा समावेश आहे. यामध्ये जहाज बांधणीसाठी आर्थिक सहाय्य, सागरी वित्तपुरवठा, क्षमता विकास तसेच पूरक धोरणात्मक आणि प्रक्रियात्मक सुधारणांचा समावेश आहे. सागरी व्यवसायांसाठी एक व्यासपीठ म्हणून गिफ्ट सिटीचे वाढते महत्त्वही भारतीय प्रतिनिधींनी अधोरेखित केले.
मुख्य भाषणात मरीना हाजीमानोलिस यांनी भारत–सायप्रस संबंधांच्या वाढत्या महत्त्वावर प्रकाश टाकला. व्यापारी नौवहनासंदर्भातील विद्यमान द्विपक्षीय चौकट ही पुढील सहकार्यासाठी भक्कम आधार असल्याचे त्यांनी नमूद केले. जहाजांची मालकी आणि व्यवस्थापन, कायदेशीर व वित्तीय सेवा, विमा, तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि इतर व्यावसायिक सेवांचा समावेश असलेली व्यापक सागरी परिसंस्था आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सागरी केंद्र म्हणून सायप्रसचे स्थान त्यांनी अधोरेखित केले. युरोपीय संघाचे सदस्यत्व आणि युरोप, आशिया, आफ्रिका व मध्यपूर्वेच्या संगमावर असलेले धोरणात्मक स्थान यामुळे भारतीय सागरी व्यवसायांना युरोपीय आणि प्रादेशिक बाजारपेठांमध्ये विस्तार करण्यासाठी सायप्रस प्रवेशद्वार ठरू शकते, असेही त्यांनी नमूद केले.
मंचाला संबोधित करताना सायप्रस चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष स्टॅव्ह्रोस स्टॅव्ह्रो यांनी दोन्ही देशांच्या सागरी परिसंस्थांमधील पूरक क्षमतांवर भर दिला. भारतातील सागरी क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ, औद्योगिक क्षमता आणि वाढत्या महत्त्वाकांक्षा तसेच जहाज व्यवस्थापन, सागरी सेवा आणि युरोपीय बाजारपेठांपर्यंत पोहोचण्याबाबत सायप्रसचे प्रस्थापित कौशल्य त्यांनी अधोरेखित केले.
या मंचादरम्यान सायप्रस चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि भारतातील युरोपीय संघाच्या वाणिज्य मंडळांची परिषद (The Council of EU Chambers of Commerce in India) यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे दोन्ही देशांतील व्यावसायिक समुदायांमधील अधिक निकटच्या सहकार्यासाठी संस्थात्मक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
भारत–सायप्रस सागरी व्यवसाय मंचाने दोन्ही देशांमधील वाढत्या राजनैतिक आणि संस्थात्मक संबंधांचे प्रत्यक्ष सागरी भागीदारीत आणि ठोस व्यावसायिक परिणामांमध्ये रूपांतर करण्याचा सामायिक संकल्प अधोरेखित केला. मुंबई येथे झालेल्या चर्चेदरम्यान निश्चित करण्यात आलेल्या संधी पुढे नेण्यासाठी सरकार, उद्योग क्षेत्र आणि वाणिज्य मंडळांमधील सातत्यपूर्ण सहभागावर दोन्ही बाजूंनी भर देण्यात आला.


_20261123191756_2805b2.jpeg)
_20261123191807_2cf57e.jpeg)

जयदेवी पुजारी स्वामी / नेहा कुलकर्णी /प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai