दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नागपूर जीपीओ येथे ‘युवा भारत फिलाटेली क्विझ 2026’ चे मोठ्या उत्साहात आयोजन


विदर्भातील 20 संघांचा उत्स्फूर्त सहभाग; नागपेक्स 2026 च्या पार्श्वभूमीवर टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारताचा इतिहास, संस्कृती आणि टपाल सेवांबाबत जनजागृती करण्याचा उपक्रमाचा उद्देश

Posted On: 23 NOV 2026 5:37PM by PIB Mumbai

नागपूर, 23 नोव्हेंबर 2026

युवा वर्गामध्ये टपाल तिकीट संग्रहाची (फिलाटेली) आवड निर्माण करण्याच्या आणि भारताचा समृद्ध इतिहास, सांस्कृतिक वारसा व विविध क्षेत्रांतील कामगिरीबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने भारतीय टपाल विभागाच्या नागपूर क्षेत्राच्या वतीने 23 नोव्हेंबर 2026 रोजी नागपूर मुख्य टपाल कार्यालयात विभागीय स्तरावरील ‘युवा भारत फिला क्विझ 2026’ चे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विदर्भभरातील एकूण 20 संघ मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. 

नागपूर क्षेत्राचे टपाल सेवा संचालक (DPS) सुधीर जाखेरे या कार्यक्रमाला उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी युवा स्पर्धकांना अशा शैक्षणिक आणि ज्ञानवर्धक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले.

विकास और विरासत’ (विकास आणि वारसा) या संकल्पनेवर आधारित या प्रश्नमंजुषेत भारताच्या स्वातंत्र्यानंतर टपाल विभागाने प्रसिद्ध केलेल्या स्मृती टपाल तिकिटांशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले होते. यामध्ये भारताचा इतिहास, थोर स्वातंत्र्यसैनिक, कला, संस्कृती, विज्ञान, अंतराळ संशोधन, संरक्षण, क्रीडा, वन्यजीव आणि महत्त्वपूर्ण राष्ट्रीय घटना या विषयांचा समावेश होता. 

स्पर्धेची सुरुवात 40 वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या 25 मिनिटांच्या प्राथमिक लेखी चाचणीने झाली. यातील कामगिरीच्या आधारे अव्वल चार संघ त्याच दिवशी आयोजित केलेल्या थेट विभागीय स्तरावरील प्रश्नमंजुषेसाठी पात्र ठरले. कामगिरीच्या आधारे विजेत्या संघाची निवड करण्यात आली. सर्व सहभागींना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली, तर विजेत्या संघाचा सुधीर जाखेरे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

सहभागी झालेल्या युवा विद्यार्थ्यांना  या प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून  केवळ टपाल तिकिटांचे महत्त्वच नव्हे, तर टपाल विभागाचे कार्य, त्याच्या विविध सेवा, आर्थिक आणि  इतर जनहितकारी योजना तसेच भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासातील टपाल विभागाचे योगदान याविषयीही मौल्यवान माहिती मिळाली. हा उपक्रम तरुणांसाठी ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण अनुभव ठरला.

विजयी संघ 3 डिसेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या परिमंडळस्तरीय स्पर्धेत नागपूर क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यानंतर 11 डिसेंबर 2026 रोजी विभागीय स्तरावरील स्पर्धा पार पडणार असून, या स्पर्धेचा अंतिम टप्पा 22 डिसेंबर 2026  रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील अंतिम स्पर्धेने संपन्न होणार आहे.

NAGPEX 2026 च्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल

विशेष म्हणजे, 26 ते 28 नोव्हेंबर 2026 या कालावधीत नागपूर येथील व्हीएनआयटीच्या मॅक हॉलमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य प्रादेशिक टपाल तिकीट संग्रह प्रदर्शन ‘NAGPEX 2026’ च्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून लोकसंपर्क उपक्रमांच्या मालिकेंतर्गत या प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रदर्शनांमधून सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, युवावर्ग आणि टपाल तिकिटे संग्रहित करण्याची आवड असलेल्या हौशी संग्राहकांना टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारताचा समृद्ध इतिहास, वारसा, कला, संस्कृती तसेच विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरी जाणून घेण्याची एक उत्तम संधी उपलब्ध होणार आहे.

‘युवा भारत फिला क्विझ–2026 , NAGPEX 2026  साठी एक महत्त्वाची पूर्वतयारी ठरले. यामुळे तरुणांमध्ये टपाल तिकीट संग्रहाबद्दल  आणि आगामी प्रदर्शनाबद्दल जागरूकता निर्माण झाली तसेच  उत्साह वाढला.

या कार्यक्रमाला मिळालेला  उदंड उत्साह पाहता नागपूर क्षेत्रीय टपाल विभागाने विद्यार्थी, युवावर्ग, नागरिक आणि टपाल तिकीट संग्रहाची आवड असणाऱ्यांना NAGPEX 2026 मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आणि यातून मिळणाऱ्या ज्ञानसंपन्न अनुभवाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

नागपूर विभाग, टपाल सेवा संचालक, सुधीर जाखेरे; नागपूर विभाग, सहायक संचालक,  जयंत डाऊ, नागपूर शहर विभाग, टपाल कार्यालयांचे वरिष्ठ अधीक्षक शारदकुमार हामिलपूर आणि नागपूर जीपीओचे वरिष्ठ पोस्टमास्टर, सुजित लांडगे यांच्या मान्यवर उपस्थितीत, उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.

 
पीआयबी मुंबई | निलीमा चितळे/शैलेश पाटील/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2340447) अभ्यागत कक्ष : 43
Read this releasein: English