Posted On:
22 NOV 2026 7:37PM by PIB Mumbai
नागपूरच्या वायुसेना नगर इथे तीन दिवसीय एअर फेस्ट 2026 या हवाई दलाच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाअंतर्गत भारतीय हवाई दलाच्या देखभाल कमांड मुख्यालयाच्या वतीने एका चित्तवेधक हवाई कसरतींच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम अनुभवण्यासाठी 16,000 पेक्षा जास्त प्रेक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमात हवाई कसरती, विशेष दलांची प्रात्यक्षिके, विशिष्ट परिस्थितीतील कवायती आणि सांगीतिक सादरीकरणे पार पडली. या माध्यमातून भारतीय हवाई दलाची परिचालन क्षमता, व्यावसायिक कुशलता आणि परंपरांचे दर्शन घडले.
या महोत्सवावाच्या समारोपाच्या दिवशी म्हणजेच रविवारी, 22 नोव्हेंबर 2026 रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. देखभाल कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ एअर मार्शल यल्ला उमेश (विशिष्ट सेवा पदक, पीएचडी) यांनी त्यांचे स्वागत केले.
सूर्य किरण या एरोबॅटिक पथकाने आपल्या चित्तवेधक हवाई कसरती आणि सूत्रबद्धरित्या रचलेल्या मानवी रचनांद्वारे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सारंग या हेलिकॉप्टर प्रात्यक्षिक पथकाने देखील नेत्रदीपक हवाई रचना सादर केल्या. स्वदेशी बनावटीची ध्रुव ही प्रगत हलकी हेलिकॉप्टर्स उडवणाऱ्या या पथकाने हेलिकॉप्टर्सची चपळाई आणि नियंत्रण कौशल्याचे दर्शन घडवले. आकाश गंगा या स्कायडायव्हिंग पथकाने फ्री फॉल आणि पॅराशूट प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली. तीन सुखोई 30 लढाऊ विमानांनी देखील विजयाचा संदेश साकारत केलेले हवाई संचलन आणि पॅरामोटारचे प्रभावी सादरीकरण हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले.
गरुड विशेष दलाच्या पथकाने दोरीच्या साहाय्याने खाली उतरण्याचे प्रात्यक्षिक सादर करून आपले विशेष कौशल्य आणि परिचालन सज्जता दाखवून दिली. एअर वॉरियर ड्रिल पथकाने शिस्तबद्ध आणि समन्वयपूर्ण कवायतींचे प्रभावी सादरीकरण केले. हवाई दलाच्या पाचव्या क्रमांकाच्या बँडने लष्करी धून आणि देशभक्तिपर गीतांच्या सादरीकरणातून सोहळ्याची रंगत वाढवली. यावेळी भारतीय हवाई दलाच्या विविध विमान आणि हवाई साधनसामग्रीचे प्रदर्शनही मांडण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपस्थितांना हवाई दलाची विविध विमाने आणि त्यांची कार्यक्षमता जाणून घेण्याची संधी मिळाली.
तीन दिवस चाललेल्या एअर फेस्टला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महोत्सवाला 16 हजारांहून अधिक प्रेक्षकांनी भेट दिली. विशेषतः राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) छात्र, शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या कार्यक्रमातून भारतीय हवाई दलाची व्यावसायिकता, समर्पण आणि क्षमता प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी तरुणांना मिळाली. देशाच्या हवाई सामर्थ्याला बळकटी देण्यासाठी सांघिक कार्य, शिस्त, तंत्रज्ञान प्रगती आणि स्वदेशी क्षमतांचे महत्त्वही या प्रदर्शनांमधून अधोरेखित करण्यात आले.
एअर फेस्ट 2026 हा भारतीय हवाई दल आणि नागरिक यांच्यातील नाते अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेला जनसंपर्क उपक्रम म्हणूनही उपयुक्त ठरला. तरुण पिढीला भारतीय हवाई दलात करिअर करण्यासाठी प्रेरित करणे, देशभक्तीची भावना वृद्धिंगत करणे तसेच देशाच्या संरक्षणासाठी भारतीय हवाई दल बजावत असलेल्या भूमिका आणि योगदानाबाबत जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता.
एअर फेस्ट 2026 चे यशस्वी आयोजन हे जनसंपर्क आणि युवकांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्याप्रती मुख्यालय देखभाल कमांडच्या वचनबद्धतेचे प्रतीक ठरले. तसेच, भारतीय हवाई दलाची क्षमता आणि परंपरा प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी या कार्यक्रमाने नागरिकांना उपलब्ध करून दिली.

_20261122193935_50f74f.jpeg)
_20261122193829_bdd8c4.jpeg)
_20261122194040_121dbc.jpeg)

***
शैलेश पाटील/सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com