Posted On:
22 NOV 2026 8:35PM by PIB Mumbai
प्रादेशिक केंद्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र (आरसीआयपीएमसी), नागपूर येथे 16 ते 20 नोव्हेंबर 2026 या कालावधीत आयोजित एकात्मिक कीड व्यवस्थापन (आयपीएम) विषयक 5 दिवसीय मनुष्यबळ विकास कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली. महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमधील एकूण 43 सहभागी या कार्यक्रमात उपस्थित होते.
विविध कृषी पिकांवर परिणाम करणारे कीटक आणि रोगांची ओळख, त्यांचे सर्वेक्षण आणि पर्यावरणपूरक व्यवस्थापन यासंदर्भात कृषी अधिकारी आणि इतर संबंधित घटकांचे तांत्रिक ज्ञान तसेच क्षेत्रीय स्तरावरील क्षमता बळकट करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
5 दिवसीय कार्यक्रमादरम्यान, व्याख्याने, संवादात्मक सत्रे आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या विविध पैलूंवर सहभागींचे तांत्रिक ज्ञान वाढवण्यात आले. यामध्ये कीटक आणि रोगांची ओळख, कीड सर्वेक्षण आणि निरीक्षण, आर्थिक नुकसान पातळी (ईटीएल), कीड व्यवस्थापनाच्या सांस्कृतिक, यांत्रिक, जैविक आणि गरजेनुसार रासायनिक पद्धती, जैव नियंत्रण घटकांचा वापर तसेच कीटकनाशकांचा सुरक्षित आणि योग्य वापर यांचा समावेश होता.
या कार्यक्रमातील तांत्रिक सत्रांमध्ये डॉ. डी. के. नागराजू, संयुक्त संचालक (कीटकशास्त्र), आरसीआयपीएमसी, नागपूर; ज्ञानेश्वर बांचोर, उपसंचालक (कीटकशास्त्र), सीआयपीएमसी, रायपूर; डॉ. रामन्ना कौळगी, सहायक संचालक (कीटकशास्त्र); प्रमोद कुमार मीना, सहायक संचालक (वनस्पती रोगशास्त्र); डॉ. राहुल वाडसकर, कीटकशास्त्रज्ञ आणि सहायक प्राध्यापक, कृषी महाविद्यालय, नागपूर; डॉ. विलास तांबे, कीटकशास्त्रज्ञ आणि प्राध्यापक, कृषी महाविद्यालय, नागपूर; डॉ. नरेश मेश्राम, कीटकशास्त्रज्ञ आणि प्रधान शास्त्रज्ञ, आयसीएआर-केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था (सीसीआरआय), नागपूर; डॉ. रचना पांडे, कीटकशास्त्रज्ञ आणि प्रधान शास्त्रज्ञ, आयसीएआर-केंद्रीय कापूस संशोधन संस्था (सीआयसीआर), नागपूर; डॉ. नीलकंठ हिरेमणी, वनस्पती रोगशास्त्रज्ञ आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ, आयसीएआर-केंद्रीय कापूस संशोधन संस्था (सीआयसीआर), नागपूर; तसेच मिथुन धुमाळ, एपीपीओ, एलसीआयपीएमसी, वडोदरा यांनी मार्गदर्शन केले.
तज्ज्ञांनी सहभागींसोबत आपले तांत्रिक ज्ञान आणि क्षेत्रीय अनुभव सामायिक केले.
राष्ट्रीय कीड सर्वेक्षण प्रणाली (एनपीएसएस) मोबाईल ॲप्लिकेशनचे महत्त्व आणि उपयोग याबाबतही सहभागींच्या जागरूकतेत वाढ करण्यात आली. विशेषतः कीड सर्वेक्षण, कीटक आणि रोगांच्या छायाचित्रांचे अपलोडिंग, क्षेत्रीय निरीक्षणांचे प्रमाणीकरण आणि वेळेवर कीड व्यवस्थापनविषयक सल्ल्यांचा प्रसार यामध्ये या ॲप्लिकेशनच्या उपयोगावर भर देण्यात आला.
समारोप समारंभाला नागपूर येथील विपणन आणि निरीक्षण संचालनालयाचे (डीएमआय) वरिष्ठ लेखाधिकारी मिलिंद रामटेके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. समारोप सत्रादरम्यान सहभागीनी कार्यक्रमाबाबत आपला अभिप्राय व्यक्त केला आणि कार्यक्रमात देण्यात आलेले तांत्रिक मार्गदर्शन, प्रत्यक्ष अनुभव तसेच संवादात्मक शिक्षणाच्या संधींचे कौतुक केले.
प्रमुख पाहुणे आणि इतर मान्यवरांनी वैज्ञानिक आणि पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करण्याच्या महत्त्वावर भर दिला. तसेच प्रशिक्षणादरम्यान मिळालेले ज्ञान शेतकरी आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवून एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतींची व्यापक अंमलबजावणी करण्यासाठी सहभागीना प्रोत्साहित केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रमुख पाहुणे, संसाधन व्यक्ती, सहभागी संस्थांमधील तज्ज्ञ, सहभागी आणि आरसीआयपीएमसी, नागपूर येथील कर्मचारी यांनी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.


***
शैलेश पाटील/गजेंद्र देवडा/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com