विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या आरोग्य संशोधनाचा भर भविष्योन्मुख धोरणांद्वारे आण्विक आणि जनुकीय स्तरावर प्रतिबंधात्मक उपायांवर केंद्रित होत आहे: डॉ. जितेंद्र सिंह

Posted On: 22 NOV 2026 3:24PM by PIB Mumbai

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, भारत भविष्योन्मुख आरोग्यसेवेच्या दृष्टिकोनाकडे वाटचाल करत आहे. चयापचयाशी संबंधित विकार आणि जीवनशैलीशी निगडित आजार तरुणांमध्ये वाढत असताना, आरोग्य संशोधनाचा भर प्रतिबंधात्मक उपाय, लवकर निदान आणि आण्विक व जनुकीय स्तरावरील प्रगत संशोधनावर केंद्रित होत आहे. भारताच्या तरुण लोकसंख्येचे आरोग्य जपणे देशाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित करत त्यांनी सांगितले की, विकसित भारत 2047 च्या संकल्पनेनुसार आरोग्यसेवा पारंपरिक उपचार पद्धतींच्या पलीकडे जाऊन वैज्ञानिक हस्तक्षेप, प्रतिबंधात्मक धोरणे आणि अधिक अचूक रोग व्यवस्थापनाकडे विकसित होत आहे.

डॉ. जितेंद्र सिंह नवी दिल्ली येथे आयोजित ‘द वीक हेल्थ समिट 2026’ मध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी ‘केंद्र सरकारचे आरोग्यविषयक उपक्रम’ या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून भाषण केले आणि आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक, संशोधक आणि उद्योग प्रतिनिधींशी संवाद साधला.

चयापचयाशी संबंधित विकारांचे वाढते प्रमाण अधोरेखित करताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांचा प्रादुर्भाव तरुणांमध्ये वाढत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि लवकर निदान अत्यावश्यक झाले आहे. बदलत्या आहाराच्या सवयी, शारीरिक हालचालींमधील घट आणि शहरी तसेच ग्रामीण भारतात जीवनशैलीशी संबंधित आरोग्यविषयक जोखमींचा वाढता प्रसार यामुळे हे आव्हान अधिक व्यापक झाले आहे. प्रतिबंधात्मक उपायांची जबाबदारी केवळ वैद्यकीय व्यावसायिकांवर सोपवता येणार नाही, तर त्यासाठी समाजाच्या सामूहिक सहभागाची आणि अधिक जनजागृतीची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले.

मंत्री म्हणाले की, आण्विक आणि जनुकीय स्तरावरील संशोधनाच्या माध्यमातून भारत भविष्योन्मुख आरोग्य धोरणांच्या दिशेने प्रगती करत आहे. वैज्ञानिक संशोधन पारंपरिक उपचारांच्या पलीकडे जाऊन रोगांच्या सखोल प्रक्रियांचा आणि संभाव्य उपचार पद्धतींचा शोध घेत आहे. जैवतंत्रज्ञान, जनुकीय संशोधन आणि आण्विक विज्ञानातील प्रगतीमुळे जटिल आरोग्य समस्यांचा सामना करण्याची तसेच रोग व्यवस्थापनासाठी अधिक अचूक आणि प्रभावी दृष्टिकोन विकसित करण्याची भारताची क्षमता बळकट होत आहे.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, भारताच्या आरोग्यसेवा आणि वैज्ञानिक क्षमतांमध्ये मोठे परिवर्तन झाले असून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि लस विकास क्षेत्रात भारत महत्त्वपूर्ण जागतिक योगदान देणारा देश म्हणून उदयास येत आहे. कोविड-19 महामारीच्या काळात विकसित करण्यात आलेल्या भारताच्या स्वदेशी डीएनए लसीचा आणि त्यानंतर लस संशोधनात झालेल्या प्रगतीचा उल्लेख करत त्यांनी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या एचपीव्ही लसीकरण उपक्रमाची माहिती दिली. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत 50 लाखांहून अधिक किशोरवयीन मुलींना लसीकरण करण्यात आले आहे.

जनुकीय संशोधनातील भारताच्या प्रगतीवर प्रकाश टाकताना मंत्री म्हणाले की, 84 विविध लोकसंख्या समूहांमधील 10,000 भारतीय व्यक्तींचे जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले आहे. यातून देशातील वैशिष्ट्यपूर्ण जनुकीय विविधता अधोरेखित होते. विविध लोकसंख्या समूहांमध्ये 400 हून अधिक जनुकीय वैशिष्ट्ये आढळत असल्यामुळे रोगांची संवेदनशीलता, आरोग्यविषयक जोखीम आणि लक्ष्यित वैद्यकीय हस्तक्षेप विकसित करण्याच्या संशोधनासाठी भारताच्या जनुकीय विविधतेत मोठ्या संधी उपलब्ध आहेत.

प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, आण्विक आणि जनुकीय संशोधन, जीनोमिक्स, जैवतंत्रज्ञान आणि स्वदेशी वैद्यकीय नवोन्मेष या क्षेत्रांतील भारताच्या वाढत्या क्षमतांमुळे भविष्योन्मुख आणि अचूक उपचारांवर आधारित आरोग्यसेवा व्यवस्था विकसित होण्याचा मार्ग प्रशस्त होत आहे. उदयोन्मुख आरोग्यविषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी वैज्ञानिक प्रगती आणि तातडीने केलेला हस्तक्षेप यांची भूमिका अधिक महत्त्वपूर्ण ठरत आहे.

***

शैलेश पाटील/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2339952) अभ्यागत कक्ष : 3
Read this releasein: English