माहितीपट निर्मिती म्हणजे केवळ वास्तवाचे चित्रण करणे नव्हे, तर लोकांचा विश्वास संपादन करणे, त्यांचे अनुभव समजून घेणे आणि त्यांचे जीवन पडद्यावर दाखवताना जबाबदारी स्वीकारणेही आहे. माहितीपटांमुळे प्रेक्षकांना अनेकदा दुर्लक्षित राहिलेल्या वास्तवाची आणि लोकांच्या आवाजाची ओळख होते. मात्र, वास्तविक जीवनाचे चित्रण करताना कलात्मक स्वातंत्र्य, व्यक्तींची खासगी माहिती आणि नैतिक जबाबदारी यांसारखे महत्त्वाचे प्रश्नही निर्माण होतात, असे प्रतिपादन फ्रान्सच्या प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या आणि पटकथालेखिका ज्युली बर्तुचेली यांनी केले. गोवा येथे सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने पणजीतील कला अकादमीमध्ये साक्षीदार ते परिवर्तन : माहितीपटांची सामाजिक जबाबदारी या विषयावर विशेष संवाद झाला. या संवादात ज्युली बर्तुचेली यांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते भारतीय चित्रपट निर्माते हाओबाम पबन कुमार यांच्याशी चर्चा केली, आणि आपली मते व्यक्त केली.
माहितीपट निर्मिती ही एक आत्मीय प्रक्रिया असल्याचे सांगताना बर्तुचेली म्हणाल्या की चित्रपटांचा त्यातील व्यक्तींच्या जीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो. काही वेळा त्यामुळे त्या व्यक्तींची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. म्हणूनच त्यांचा विश्वास संपादन करणे, त्यांच्यासोबत वेळ घालवणे आणि कॅमेऱ्याच्या उपस्थितीची त्यांना सवय होऊ देणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांचे त्यांच्या दैनंदिन जीवनातील निरीक्षण केल्यामुळे ते स्वतःकडे कसे पाहतात आणि समाजाने आपल्याकडे कसे पाहावे, अशी त्यांची अपेक्षा आहे, हे चित्रपट निर्मात्यांना समजण्यास मदत होते, असेही त्या म्हणाल्या.
_20261121194349_fcb2a4.jpeg)
चित्रपटांमधून सामाजिक बदल घडवण्याच्या शक्यतेविषयी बोलताना बर्तुचेली म्हणाल्या की चित्रपटांमुळे एका रात्रीत समाज बदलत नाही, मात्र ते व्यक्तींच्या विचारांवर परिणाम करू शकतात आणि बदल घडवण्यास प्रोत्साहन देऊ शकतात. काही लोकांच्या मनात बदलाचे एखादे छोटेसे बीज पेरता आले, तरी ती मोठी गोष्ट आहे, असे त्या म्हणाल्या. आशा निर्माण करणारे आणि सकारात्मक उदाहरणे दाखवणारे चित्रपट आपल्याला अधिक आवडतात. अशा चित्रपटांमुळे बदल शक्य आहे, असा विश्वास लोकांमध्ये निर्माण होतो, असेही त्यांनी नमूद केले.
आपल्या सर्जनशील प्रक्रियेविषयी बोलताना बर्तुचेली यांनी सांगितले की माहितीपटांच्या कल्पना अनेकदा अनपेक्षित भेटी, ठिकाणे किंवा कुतूहल निर्माण करणाऱ्या विषयांमधून उदयास येतात. ‘स्कूल ऑफ बाबेल’ आणि ‘सिन्स ओतार लेफ्ट’ या चित्रपटांचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की वास्तविक जीवनातील अनुभव अनेकदा त्यांच्या चित्रपटांच्या निर्मितीचा प्रारंभबिंदू ठरतात. निधी मिळवण्यासाठी पटकथा आणि प्रस्ताव आवश्यक असतात, मात्र प्रत्यक्ष चित्रपट निर्मितीची प्रक्रिया वास्तविक जीवनातील अनिश्चिततेसाठी खुली असते.
आपल्या व्यावसायिक प्रवासाची आठवण सांगताना त्यांनी ख्यातनाम दिग्दर्शक क्रिस्तोफ किझलोव्स्की, रिथी पान आणि बर्त्राँ ताव्हर्निए यांच्यासोबत सहाय्यक म्हणून जवळपास 15 वर्षे काम केल्याचे सांगितले. या कामामुळे त्यांना रशिया, जॉर्जिया आणि कंबोडिया यांसारख्या देशांमध्ये जाण्याची संधी मिळाली आणि विविध सांस्कृतिक तसेच चित्रपट निर्मितीच्या वातावरणातील अनुभव प्राप्त झाले.

आपल्या गावातील अस्पृश्यता आणि पुरुषप्रधानता यांसारख्या संवेदनशील सामाजिक विषयांवर माहितीपट तयार करू इच्छिणाऱ्या एका युवा चित्रपट निर्मात्याला मार्गदर्शन करताना बर्तुचेली यांनी विश्वास आणि सातत्यपूर्ण संवादाचे महत्त्व अधोरेखित केले. चित्रपट निर्मात्यांनी ज्या समुदायाचे चित्रण करायचे आहे, त्यांच्याबद्दल प्रामाणिक आस्था दाखवली पाहिजे आणि आपल्या कामाचा उद्देश स्पष्टपणे सांगितला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
माहितीपट निर्मितीविषयी आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन मांडताना बर्तुचेली यांनी फ्रान्समध्ये या चित्रपट प्रकाराला मिळणाऱ्या संस्थात्मक पाठबळाविषयी चर्चा केली. यामध्ये चित्रपटगृहांच्या तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या महसुलाचा चित्रपट निर्मितीसाठी होणारा उपयोग आणि चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी संरक्षित कालावधीची भूमिका यांचा समावेश आहे. आगामी वर्षांमध्ये पॅरिसमध्ये भारतीय माहितीपटांचा पूर्वावलोकन महोत्सव आयोजित करण्याची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. भारताच्या समृद्ध माहितीपट निर्मिती परंपरेचे त्यांनी कौतुक केले.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वाढत्या वापराबद्दल चिंता व्यक्त करताना बर्तुचेली यांनी सर्जनशीलता, कॉपीराइट आणि पर्यावरणीय परिणामांविषयीच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. विशेषतः पाण्याचा आणि विजेचा वापर याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. एआयवर अतिप्रमाणात अवलंबून राहिल्याने मानवी स्मरणशक्ती, स्वतंत्र विचार आणि सर्जनशीलतेतील अस्सलपणा यांवर परिणाम होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
माहितीपट चित्रपटांच्या वैशिष्ट्यपूर्ण मूल्यावर भर देताना त्यांनी सांगितले की वास्तविक मानवी संवादातील उत्स्फूर्त भावना, शांतता, हावभाव आणि अपूर्णता यांचे चित्रण माहितीपट करतात, जे कृत्रिम बुद्धिमत्ता पुनरुत्पादित करू शकत नाही.
या सत्रातून माहितीपट निर्मिती ही विश्वास, नैतिक जबाबदारी आणि मानवी समज यांवर आधारित प्रक्रिया असल्याचे महत्त्वपूर्ण विचार समोर आले. तसेच दुर्लक्षित वास्तव समाजाच्या जाणिवेत आणून अर्थपूर्ण परिवर्तन घडवून आणण्याची चित्रपटांची कायमस्वरूपी क्षमता अधोरेखित झाली.

***
माधुरी पांगे/राज डाळेकर/गजेंद्र देवडा/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com