Posted On:
21 NOV 2026 6:45PM by PIB Mumbai
मुंबई येथील राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था (एनएसटीआय) आणि राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था (महिला), मुंबई यांच्या वतीने आज, 21 नोव्हेंबर 2026 रोजी संस्थेच्या परिसरात पाचव्या कौशल्य दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या प्रशिक्षण महासंचालनालयांतर्गत या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
देशभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेत आयोजित करण्यात येणाऱ्या देशव्यापी दीक्षांत समारंभांचा हा एक भाग होता.

लखनऊ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील कौशल्य दीक्षांत समारंभाच्या अनुषंगाने देशभरात हे समारंभ आयोजित करण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींच्या यशाचा गौरव करणे, व्यावसायिक शिक्षणाचा सन्मान वाढवणे आणि कुशल व आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी योगदान देण्याची प्रेरणा युवकांना देणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
मुंबईतील नौदल गोदीच्या डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूलचे उपमहाव्यवस्थापक कॅप्टन आलोक लांगे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासमवेत याच संस्थेचे सहाय्यक अधिकारी डॉ. अजय कुमार तिवारी उपस्थित होते. राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, मुंबईचे प्राचार्य जी. व्यंकटेश आणि राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था (महिला), मुंबईचे प्राचार्य डॉ. नरेश चव्हाण यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताने, त्यानंतर जन गण मन या राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन आणि सरस्वती वंदना करण्यात आली. या माध्यमातून ज्ञान, बुद्धिमत्ता आणि उत्कृष्टतेचे ध्येय दिसून आले.
या समारंभात 2025-26 या प्रशिक्षण सत्रातील विविध व्यवसायांच्या 54 गुणवंत प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. कारागीर प्रशिक्षण योजना आणि प्रशिक्षण निदेशक प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या या प्रशिक्षणार्थींना प्रमुख पाहुणे आणि दोन्ही संस्थांच्या प्राचार्यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली. त्यांच्या शैक्षणिक आणि प्रशिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा यावेळी गौरव करण्यात आला.
एनएसटीआय मुंबई आणि एनएसटीआय (महिला), मुंबई यांची उल्लेखनीय कामगिरीही या समारंभात अधोरेखित करण्यात आली. संगणक सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स (सीएसए) आणि इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या व्यवसायांतील सीआयटीएसच्या 2 प्रशिक्षणार्थींनी अखिल भारतीय सीआयटीएस परीक्षा – 2026 मध्ये पश्चिम विभागात अव्वल स्थान मिळवले. या उत्कृष्ट प्रशिक्षणार्थींना नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील समारंभात पंतप्रधानांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यामुळे या संस्थांच्या गौरवात भर पडली.
एनएसटीआय मुंबई आणि एनएसटीआय (महिला), मुंबई यांची कामगिरी, प्रशिक्षणाचे परिणाम आणि विविध उपक्रमांचा आढावा घेणारा संस्थात्मक अहवाल सादर करण्यात आला. प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणार्थी योजना, रोजगार मेळावे, नोकरीच्या संधी, पदोन्नतीच्या संधी आणि सातत्यपूर्ण कौशल्य विकासाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या नवीन करिअर संधींबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

दीक्षांत समारंभातील आपल्या संबोधनात प्रमुख पाहुण्यांनी पदवीप्राप्त प्रशिक्षणार्थींचे त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले. त्यांनी प्रशिक्षणार्थींना, सातत्याने आपली कौशल्ये अद्ययावत करण्यासाठी, बदलत्या औद्योगिक गरजांनुसार स्वतःला अनुकूल बनवण्यासाठी आणि आत्मविश्वास व समर्पणाने व्यावसायिक उत्कृष्टतेचा ध्यास घेण्यासाठी प्रोत्साहित केले. यशस्वी करिअर घडवण्यासाठी तांत्रिक क्षमता, शिस्त आणि आयुष्यभर शिकत राहण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
औपचारिक कार्यक्रमानंतर प्रशिक्षणार्थींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यातून त्यांची सर्जनशीलता, प्रतिभा आणि उत्साह दिसून आला. प्रमुख पाहुणे, मान्यवर, संस्थेचे प्राध्यापक आणि गुणवंत प्रशिक्षणार्थी यांचे अधिकृत समूह छायाचित्रही यावेळी घेण्यात आले.

सायंकाळी 5:00 वाजल्यापासून लखनऊ येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यामुळे प्रशिक्षणार्थी, प्राध्यापक आणि मान्यवरांना कौशल्य विकासाच्या देशव्यापी उत्सवात आभासी माध्यमातून सहभागी होता आले.
पाचवा कौशल दीक्षांत समारंभ – 2026 हा एनएसटीआय मुंबई आणि एनएसटीआय (महिला), मुंबई यांच्या व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य विकासातील उत्कृष्टतेप्रती असलेल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार करणारा ठरला. या कार्यक्रमाने पदवीप्राप्त प्रशिक्षणार्थींना आयुष्यभर शिकत राहण्यासाठी, उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यासाठी आणि आपली कौशल्ये व व्यावसायिक क्षमतांच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीत अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी प्रेरित केले.

***
माधुरी पांगे/राज दळेकर/गजेंद्र देवडा/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai