Posted On:
21 NOV 2026 5:09PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बिहारमधील वैशाली येथे सुमारे 34,470 कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन, भूमिपूजन आणि राष्ट्रार्पण झाले. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधितही केले. नागरिकांची आस्था असलेल्या छठ महापर्वाचा उत्सव नुकताच संपन्न झाला. या उत्सवाच्या काळात माता आणि भगिनींनी आपल्या कुटुंबाच्या, समाजाच्या आणि जगाच्या कल्याणासाठी अत्यंत कठीण असे निर्जल व्रत केल्याचे त्यांनी नमूद केले. आता छठ मातेच्या आशीर्वादाने आपण इथे विकासाचा उत्सव साजरा करत आहोत, असे ते म्हणाले.
लोकशाहीच्या ताकदीला लोककल्याणाचे माध्यम बनवून सबका साथ, सबका विकास या मंत्राच्या आधारे बिहारच्या विकासाने पुढची दिशा गाठली असल्याचे त्यांनी सांगितले. इथल्या राज्य सरकारच्या सध्याच्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त, लोकशाहीची महान भूमी असलेल्या वैशालीची या कार्यक्रमासाठी झालेली निवड अत्यंत समर्पक असल्याचे ते म्हणाले. या निमित्ताने पंतप्रधानांनी वैशाली आणि बिहारच्या भूमीला वंदनही केले आणि या महत्त्वाच्या टप्प्यात सहभागी असलेल्या सर्वांचे अभिनंदन केले.
सुमारे तीन दशकांपूर्वी कशारितीने बिहारने आशा आणि विश्वासाचा नवा मार्ग निवडला, याचे स्मरण पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून करून दिले. आदरणीय नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या दीर्घ कार्यकाळात राज्याने सुशासनाबद्दलच्या नव्या विश्वासाच्या दिशेने वाटचाल सुरु केली होती आणि आता त्यांच्याच आशीर्वादाने सम्राट चौधरी हा वारसा पुढे नेत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी हजारो कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन झाल्याचाही विशेषत्वाने उल्लेख केला. यामध्ये गंगा नदीवरील आणि नितीश कुमार यांच्या सन्मानार्थ उभारलेल्या नितीश सेतू असे नामकरण केलेल्या सहा पदरी दर्गाह बिदुपूर केबल पुलाच्या राष्ट्रार्पणाचाही समावेश आहे.
या पुलामुळे पाटणा आणि वैशाली दरम्यानचे अंतर आणि प्रवासातील अडचणी कमी होणार असून प्रमुख बाजारपेठांपर्यंत पिके, फळे, भाजीपाला, दूध आणि दही यांची वाहतूक करणे सोपे होणार असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. या पुलाचे सामाजिक महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की यामुळे या भागातील तरुणांना शिक्षण आणि वृद्धांना आरोग्यसेवा अधिक सहजपणे उपलब्ध होईल.
संपूर्ण बिहारमध्ये आधुनिक रस्त्यांच्या जाळ्याच्या वेगाने होणाऱ्या विस्तारावर प्रकाश टाकत, पंतप्रधानांनी औरंगाबाद-चोरदाहा सहा पदरी महामार्गाच्या उद्घाटनासह इतर अनेक महामार्ग प्रकल्पांच्या पायाभरणीचा उल्लेख केला. “या प्रकल्पांवर शेकडो कोटी रुपये खर्च केले जातील,” असे पंतप्रधानांनी सांगितले.
रस्त्यांच्या जाळ्यासोबतच, बक्सर औष्णिक वीज प्रकल्पाचे बांधकाम, पीरपैंती औष्णिक वीज प्रकल्पाच्या पारेषण प्रणालीची पायाभरणी आणि फुलवारिया धरणावरील सौर ऊर्जा प्रकल्प यांसारख्या प्रमुख उपक्रमांमुळे बिहारचे ऊर्जा आणि शहरी विकासाचे चित्र वेगाने बदलत असल्याचे निरीक्षण नोंदवत पंतप्रधानांनी राज्याच्या भूतकाळाची वर्तमानाशी तुलना केली. “एक काळ असा होता की बिहारमधील हजारो गावांमध्ये वीज पोहोचली नव्हती; आज बिहार वीज निर्मितीचे एक प्रमुख केंद्र बनत आहे,” असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
शहरी वाहतूक सोयीस्कर करण्यासाठी आज 100 आधुनिक पीएम ई-बसेसना हिरवा झेंडा दाखवण्यात आला, तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत हजारो गरीब कुटुंबांना पक्क्या घरांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. पंतप्रधानांनी या प्रगतीचे स्वागत केले. “या सर्व विकासकामांबद्दल मी बिहारच्या जनतेचे अभिनंदन करतो,” असे पंतप्रधान म्हणाले.
बिहारच्या परिवर्तनाच्या प्रदीर्घ प्रवासाचा आढावा घेताना पंतप्रधानांनी नमूद केले की आज राज्यात गुंतवणुकीची आकडेवारी, गुन्हेगारांविरुद्धची कारवाई आणि विकासासाठीची निरोगी स्पर्धा यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. “उत्तर बिहार असो, नालंदा-गयाजी असो, शहाबाद-कैमूर असो किंवा राजधानी पाटणा असो, प्रत्येक प्रदेशात विकासाची एक नवी गाथा लिहिली जात आहे,” असे ते म्हणाले.
बिहारच्या जलद प्रगतीचा पुरावा म्हणून सध्याच्या सरकारच्या काळातील गेल्या वर्षभरातील कामगिरीचा उल्लेख करत, पंतप्रधानांनी दोन लाख कोटी रुपयांहून अधिक मूल्याचे गुंतवणूक करार, गयाजी येथील 6,000 कोटी रुपयांच्या पोलाद प्रकल्पाच्या कामाची सुरुवात, मोतीहारीसह बंद पडलेले साखर कारखाने पुनरुज्जीवित करण्यासाठी नवीन ऊस प्रोत्साहन धोरण, प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी 11,000 नवीन बोअरवेल बसवण्याचा उपक्रम, सिंचनासाठी 12 तास वीजपुरवठा सुनिश्चित करणारा ऐतिहासिक निर्णय, एका वर्षात 200 हून अधिक नवीन पदवी महाविद्यालये सुरू करणे आणि मुलींसाठी 'मां सीता महिला विद्यापीठा'ला मंजुरी, या महत्त्वपूर्ण निर्णयांचा आणि उपक्रमांचा उल्लेख केला.
बिहारच्या विकासाचा आवाका मोठा असून, त्याची संपूर्ण माहिती कोणत्याही व्यासपीठावरून सांगणे शक्य नाही. बिहारमध्ये प्रत्यक्ष आल्यानंतरच येथील विकासाचा अनुभव घेता येईल, असे मोदी म्हणाले. स्पष्ट हेतू असेल, तर त्याचे परिणामही दिसून येतात, असे सांगताना, गेल्या 12 वर्षांत आपल्या सरकारने 50 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. हा सरकारच्या दृढ इच्छाशक्तीचा आणि गरीब कल्याणासाठी राबवलेल्या योजनांचा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले.
80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य, कोट्यवधी कुटुंबांना सुरक्षिततेची भावना देणारी पक्की घरे, महागड्या वैद्यकीय उपचारांचा आर्थिक भार कमी करणारे मोफत उपचार, तसेच शौचालये, वीज आणि पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत सरकारने सर्वसामान्यांचे जीवनमान सुलभ करण्याला प्राधान्य दिले आहे. या माध्यमातून भारत गरिबीविरुद्धची लढाई जिंकत असल्याचे मोदी यांनी सांगितले. या सुविधांमुळे गरीब कुटुंबांमध्येही आत्मविश्वास जागृत झाला असून, त्यांनी गरिबीवर मात करत प्रगतीच्या दिशेने वाटचाल केली आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
केंद्र सरकारच्या योजनांची राज्य सरकारने प्रभावी अंमलबजावणी करून त्या योजनांचा लाभ घराघरापर्यंत पोहोचवला. राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे गरिबीविरुद्धच्या लढाईत बिहारचे मोठे योगदान असल्याचे मोदी यांनी नमूद केले. बिहारमध्ये 43 लाख कुटुंबांना पक्की घरे देण्यात आली असून, ऑगस्ट महिन्यात आणखी 11 लाख घरांना मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या माध्यमातून जवळपास 75 लाख शेतकऱ्यांना हजारो कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. तसेच, बचत गटांना दिलेल्या पाठबळामुळे ग्रामीण भागातील 50 लाख महिलांना लखपती दीदी होण्यास मदत झाली आहे.
अशा प्रयत्नांमुळेच आज बिहारमधील कोट्यवधी नागरिक गरिबीतून बाहेर पडले असून देशानेही हे यश संपादन केले आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
बिहारच्या अभूतपूर्व विकासाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देताना पंतप्रधानांनी आघाडीतील सर्व घटकांना, विकासाचा हा वेग कायम ठेवण्याचे आवाहन केले. सक्षम, समृद्ध आणि आत्मनिर्भर बिहारच्या उभारणीसाठी आता थांबायचे नाही, थकायचे नाही, तर सर्वांनी एकत्रितपणे सातत्याने काम करायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.
***
माधुरी पांगे/तुषार पवार/श्रद्धा मुखेडकर/राज दळेकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai