विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वायू प्रदूषणावरील उपाययोजनांच्या शक्यता तपासण्यासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या अखत्यारितील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने तज्ञाना आणले एकत्र



स्वच्छ हवेसाठी विज्ञाननिष्ठ उपाय, तंत्रज्ञान आणि समन्वित कृतीशी संबंधीत मुद्यांवर पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, जैवतंत्रज्ञान विभाग तसेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद संस्थांच्या तज्ञांनी केली चर्चा

Posted On: 21 NOV 2026 4:46PM by PIB Mumbai


वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या अखत्यारितील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (CSIR-NEERI - Council of Scientific and Industrial Research – National Environmental Engineering Research Institute) सिंधू गंगा मैदानी प्रदेशासाठी स्वच्छ हवा आणि हवामान लवचिकता (IGP-CACR - Clean Air and Climate Resilience for the Indo-Gangetic Plains) या विषयावर एका विचारमंथन कार्यशाळेचे आयोजन केले होते. संस्थेच्या नवी दिल्लीतील नारायणा इथल्या दिल्ली विभागीय केंद्रात ही कार्यशाळा पार पडली.

या कार्यशाळेच्या निमित्ताने दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि विस्तारीत सिंधू गंगा मैदानी प्रदेशातील वायू प्रदूषणावर व्यावहारिक आणि विज्ञानाधारित उपाययोजनांच्या शक्यता तपासण्यासाठी वैज्ञानिक, धोरणकर्ते आणि तंत्रज्ञनाच्या क्षेत्रातील तज्ञ एकत्र आले होते. या कार्यशाळेत झालेल्या चर्चांमधून वायुक्षेत्र व्यवस्थापन, प्रदूषणाचे स्रोत, आरोग्यावरील परिणाम, हवामान विषयक संवेदनशीलता, प्रदूषण नियंत्रण तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित निर्णय साहाय्य प्रणाली आणि संस्थात्मक भागीदारी अशा व्यापक मुद्यांचा अंतर्भाव  होता. व्यापक प्रमाणावर अंमलबजावणी करता येईल तसेच हवेच्या गुणवत्तेत मूल्यमापन करता येण्याजोगी सुधारणा घडवून आणू शकतील अशा स्वरुपांच्या उपाययोजनांवर या चर्चांमध्ये भर दिला गेला.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या अखत्यारितील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे संचालक डॉ. एस. वेंकट मोहन यांच्या नेतृत्वात ही कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेला विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे  वैज्ञानिक एफ डॉ. जी. व्ही. रघुनाथ रेड्डी, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे वैज्ञानिक ई डॉ. एन. सुब्रह्मण्यम आणि जैवतंत्रज्ञान विभागाचे वैज्ञानिक-डी डॉ. बलेंद्र सिंह उपस्थित होते. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या मुख्यालयातील वरिष्ठ प्रतिनिधीही या कार्यशाळेत सहभागी झाले होते. यात परिषदेच्या व्यवसाय विकास समूहाच्या  प्रख्यात वैज्ञानिक आणि प्रमुख डॉ. शैलजा दोनेमपुडी तसेच केंद्रीय नियोजन संचालनालयाचे वैज्ञानिक-जी आणि प्रमुख डॉ. अनिर्बन पाल यांचा समावेश होता.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या अखत्यारितील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या दिल्ली विभागीय केंद्राचे वैज्ञानिक-जी आणि अध्यक्ष डॉ. एस. के. गोयल यांनी दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि सिंधू-गंगा मैदानी प्रदेशातील वायू प्रदूषणाच्या प्रमुख आव्हानांची मांडणी केली. वैज्ञानिक निष्कर्षांचे व्यावहारिक आणि धोरणात्मक उपाययोजनांमध्ये रूपांतर करण्यासाठी समन्वित वायुक्षेत्र व्यवस्थापन, हवेच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवणारी अधिक भक्कम व्यवस्था तसेच संपूर्ण वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचा सहभाग असलेल्या अभियानाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.  

या कार्यशाळेत झालेल्या चर्चेत पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे डॉ. एन. सुब्रह्मण्यम यांनीही आपली मते व्यक्त केली. देशात कृती करण्यासंदर्भातील प्राधान्य क्षेत्रे निश्चित करण्याकरता आणि सभोवतालच्या हवेची गुणवत्तेवर सातत्यपूर्ण देखरेख ठेवण्याची व्यवस्था उभारण्याच्या दृष्टीने, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन विकसित करण्याकरता सिंधू गंगा मैदानी प्रदेशासाठी एक तांत्रिक समिती स्थापन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. जैवतंत्रज्ञान विभागाचे डॉ. बलेंद्र सिंह यांनीही या चर्चेत सहभाग घेतला. योग्य  पोषण आणि मानवी सूक्ष्मजीवसमूह या क्षेत्रातील उदयोन्मुख संशोधनाच्या संधी, विशेषतः वायू प्रदूषणामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांशी असलेला त्यांचा संबंध त्यांनी आपल्या मांडणीतून अधोरेखित केला. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे डॉ. जी. व्ही. रघुनाथ रेड्डी यांनीही आपली मते मांडली. प्रात्यक्षिकाच्या पातळीवरील प्रकल्पांना साहाय्य पुरवण्यासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने संभाव्य उपाययोजनांची सूची तयार करावी, आणि अशा उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी योग्य असलेली ठिकाणे आणि अंमलबजावणीची व्याप्ती निश्चित करावी अशी सूचना त्यांनी केली.

सीएसआयआर मुख्यालयाच्या शैलजा डोनेमपुडी यांनी सीएसआयआरच्या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याची गरज अधोरेखित केली. विशेषतः तंत्रज्ञान सज्जता स्तर (टीआरएल) 6 किंवा त्यावरील स्तर गाठलेल्या तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष क्षेत्रीय प्रात्यक्षिके आणि व्यापक अंमलबजावणीच्या माध्यमातून सिंधू-गंगा नदीच्या मैदानी प्रदेशात व्यापक उपयोजनाद्वारे, अधिक वापर करण्याच्या गरजेवर भर दिला. सीएसआयआर मुख्यालयाचे डॉ. अनिर्बन पाल यांनी प्रदूषणाच्या विशिष्ट स्रोतांवर उपाययोजना करणारे तंत्रज्ञान विकसित करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच त्यासाठी निश्चित अंमलबजावणी आराखडे, संस्थांची स्पष्ट जबाबदारी आणि मोजता येण्यासारखे परिणाम निश्चित करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि हैदराबाद येथील सीएसआयआर-नीरीच्या चार प्रादेशिक केंद्रांमधील तसेच इतर सीएसआयआर प्रयोगशाळा आणि विभागातील शास्त्रज्ञ आणि तज्ञांनी या कार्यशाळेत सक्रियपणे सहभाग घेतला. यामध्ये सीएसआयआर-आयआयपी, सीएसआयआर-सीडीआरआय, सीएसआयआर-आयएचबीटी, सीएसआयआर-आयएमटीईसीएच, सीएसआयआर-सीआरआरआय, सीएसआयआर-सीबीआरआय, सीएसआयआर-सीएमईआरआय, सीएसआयआर-एनआयएससीपीआर आणि सीएसआयआर-एनआयडीएसए, तसेच सीएसआयआरचे पारंपरिक ज्ञान डिजिटल ग्रंथालय (टीकेडीएल) आणि तंत्रज्ञान व्यवस्थापन संचालनालय यांचा समावेश होता. तांत्रिक सत्रांचे समन्वय सीएसआयआर-नीरी, दिल्ली प्रादेशिक केंद्राचे वैज्ञानिक-ई डॉ. अंकित गुप्ता आणि वैज्ञानिक-डी डॉ. सुनील गुलिया यांनी केले.

पुढील वाटचालीवर प्रकाश टाकत, सीएसआयआर-नीरी’चे संचालक डॉ. एस. व्यंकट मोहन यांनी सांगितले की, या कार्यशाळेतील वैज्ञानिक आणि संस्थात्मक शिफारसींना एकत्र करून संस्थेकडून एक धोरण-स्तरीय संक्षिप्त अहवाल तयार केला जाईल. या अहवालात प्राधान्यक्रमाने राबवायच्या उपाययोजना, तंत्रज्ञान सज्जता, संभाव्य प्रात्यक्षिक प्रकल्प आणि सहकार्याच्या संधी समाविष्ट केल्या  जातील. यामुळे दिल्ली-एनसीआर आणि सिंधू-गंगेच्या मैदानी प्रदेशात हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि हवामान बदलांना तोंड देण्याची क्षमता मजबूत करण्यासाठी विज्ञान-आधारित निर्णय आणि समन्वित कृतीला पाठिंबा देण्यास मदत होईल.

या कार्यशाळेत, वारंवार उद्भवणाऱ्या वायूप्रदूषणाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि संपूर्ण प्रदेशात हवामान बदलांना तोंड देण्याची क्षमता वाढण्यासाठी स्वतंत्र आणि तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी समन्वित, विज्ञान-आधारित आणि कृती-केंद्रित दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

***

सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2339635) अभ्यागत कक्ष : 17
Read this releasein: English