गोवा, 21 नोव्हेंबर 2026
देशाच्या दक्षिणेकडच्या टोकाकडील प्रदेशांपासून ते ईशान्य भारतापर्यंत, भारतीय सिनेमाला आपल्या कथा, संस्कृती आणि सर्जनशील अभिव्यक्तींच्या विलक्षण वैविध्यातून बळ मिळत आले आहे. असे असले तरी, प्रादेशिक ओळख आणि चित्रपट शैलींच्या पलीकडे पाहीले तर, परस्पर सामायिक मानवी भावनांच्या माध्यमातूनच या कथा देशभरातील प्रेक्षकांशी जोडल्या जात असतात. चित्रपटकर्मी मधुर भांडारकर यांच्या अध्यक्षतेखालील इंडियन पॅनोरमा 2026 या विभागातील कथात्मक चित्रपटांच्या निवड समितीने आज मांडलेल्या अनुभवांमधूनही याच वैविध्याचे प्रतिबिंब उमटले. गोव्यात सुरू असलेल्या 57 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीअंतर्गत (IFFI - International Film Festival of India) आयोजित पत्रकार परिषदेत या निवड समितीने 404 प्रवेशिकांमधून 25 चित्रपटांची निवड करण्याच्या प्रक्रियेतला आपला अनुभव आज सर्वांसमोर मांडला.

यावेळी मधुर भांडारकर यांनी निवड प्रक्रियेविषयीची माहिती दिली. निवड समितीसमोर विविध शैलींमधील अनेक प्रकारांचे चित्रपट आले आणि समितीने सर्वसहमतीनेच सर्व निर्णय घेतल्याचे भांडारकर यांनी सांगितले. चित्रपट महोत्सवातून शिकण्याची आणि नवे दृष्टिकोन आत्मसात करण्याची संधी मिळत असते, आणि तशाच प्रकारे हा देखील समृद्ध करणारा अनुभव होता अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या प्रक्रियेअंतर्गत झालेल्या अंतिम निवडीबद्दल त्यांनी विश्वास व्यक्त केला. या विभागात निवड झालेल्या चित्रपटांबद्दल समिती समाधानी असल्याचे ते म्हणाले. समितीवर विशेष छाप पाडलेल्या काही मराठी, लडाखी आणि मल्याळम चित्रपटांचा त्यांनी आवर्जून उल्लेखही केला. हे सर्व चित्रपट मंत्रमुग्ध करणारे असल्याचे ते म्हणाले.
_20261121152524_cb8583.jpeg)
ज्येष्ठ स्तंभलेखिका आणि या निवड समितीच्या एक सदस्य असलेल्या भारती प्रधान यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. या प्रक्रियेत असल्लता आणि प्रतिनिधित्वाला महत्त्व दिल्याची बाब त्यांनी संवादातून अधोरेखित केली. आपल्या मूळ कल्पना कायम राखणाऱ्या आणि त्याच वेळी देशभरातील विविध दृष्टिकोन एकत्र आणणाऱ्या चित्रपटांचा शोध घेण्याचा प्रयत्न समितीने केल्याचे त्यांनी सांगितले. या विभागासाठी निवड झालेल्या चित्रपटांमधून संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व होईल हे उद्दिष्ट साध्य झाले असल्याबद्दल समाधान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केले. मुख्य प्रवाहातील सिनेमा विभागातील चित्रपटांची निवड करण्याचे निकष हे इंडियन पॅनोरमा मधील कथात्मक चित्रपट विभागाच्या निकषांपेक्षा वेगळे होते, ही बाबही त्यांनी नमूद केली.
_20261121152423_00e022.jpeg)
अभिनेत्री आणि निवड समितीच्या सदस्या बिंदू चंद्रमौली यांनीही आपले अनुभव मांडले. देशाच्या विविध भागांतील चित्रपट पाहण्याचा हा अनुभव आंतरराष्ट्रीय सिनेमांचा अनुभव घेण्यासारखे होते, असे त्या म्हणाल्या. निवडीसाठी आलेल्या चित्रपटांमध्ये भाषा, शैली आणि प्रकारांच्या बाबतीत भिन्नता होती, मात्र तरीदेखील अंतर्मनातील भावनांचा एक समान धागा या सर्व चित्रपटांना परस्परांशी जोडत होता असे त्या म्हणाल्या. प्रेक्षकांनी आपल्या भाषिक प्राधान्यांच्या पलीकडे जाऊन सिनेमाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तेलुगू प्रेक्षकांनी विविध भाषांमधील चित्रपटांसाठीही खुलेपणा दाखवायला हवा आणि कथात्मक मांडणीच्या वैविध्यपूर्ण शैलींची प्रशंसा करायला हवी असे आवाहन त्यांनी केले.
छायाचित्रकार आणि ज्युरी सदस्य एम. एस. प्रभू यांनी या अनुभवाचे वर्णन भारताच्या विविधेतील एकतेचे दर्शन घडवणारे आभासी भारतभ्रमण, असे केले. विविध प्रदेशांतील चित्रपट पाहताना, त्यांच्या कथा आणि भावनांमधील समान धागे अधिकाधिक स्पष्ट होत गेले, असे त्यांनी सांगितले. त्यांनी नवोदित दिग्दर्शकांच्या कामाचे कौतुकही केले. चित्रपट निवडीची प्रक्रिया एक मौल्यवान शिकण्याचा अनुभव होता, असे त्यांनी नमूद केले.
_20261121152455_9f2ea5.jpeg)
निवड झालेल्या चित्रपटांबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना, छायाचित्रकार आणि ज्युरी सदस्य के. एस. शिवरामन म्हणाले की, काही कथांमधून व्यक्त होणाऱ्या भावना इतक्या प्रभावी होत्या की, त्यापैकी काही चित्रपट दक्षिण भारतीय प्रेक्षकांसाठी रूपांतरित करण्याची कल्पना त्यांच्या मनात आली. ज्युरी सदस्य सोहम पी. शहा यांनी चित्रपट निवड प्रक्रियेत चित्रपटाने दिलेला संदेश हा एक महत्त्वाचा निकष असल्याचे अधोरेखित केले.
मुख्य प्रवाहातील सिनेमा विभागातील पाच चित्रपटांच्या निवडीवरही ज्युरी सदस्यांनी चर्चा केली. हा निर्णय सामूहिक स्वरूपाचा असून चित्रपटांमधील क्षमता संकल्पना आणि विचार यांच्या आधारे तो घेण्यात आल्याचे भांडारकर यांनी स्पष्ट केले. रजित चंद्रन यांनी या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन केले.

निवड झालेल्या कथा आधारित चित्रपटांच्या संचात इंडियन पॅनोरमा कथात्मक चित्रपट विभागातील 20 चित्रपट आणि मुख्य प्रवाह चित्रपट विभागातील पाच चित्रपटांचा समावेश आहे. आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या हिंदी चित्रपटाची इंडियन पॅनोरमा 2026 चा उद्घाटन चित्रपट म्हणून निवड झाली आहे. इंडियन पॅनोरमाच्या व्यापक निवडीमध्ये 20 कथाबाह्य चित्रपटांचाही समावेश आहे.
परीक्षक मंडळाच्या सदस्यांनी दिलेल्या अभिप्रायांमधून भारतीय चित्रपटनिर्मितीची विविधता अधोरेखित झाली. प्रादेशिक अस्मिता आणि चित्रपट निर्मितीच्या विविध शैली वेगवेगळ्या असल्या तरी प्रेक्षकांच्या मनाला भिडणाऱ्या कथांमधून त्या एकत्र येतात हे यातून स्पष्ट झाले. इफ्फी मधील इंडियन पॅनोरमा विभाग समकालीन भारतीय चित्रपटांना विविध भाषा आणि संस्कृतींमधील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच त्यांना अनुभवण्याची आणि त्यांचे कौतुक करण्याची संधी देणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे.

Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | सुषमा काणे/तुषार पवार/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे