पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शांघाय सहकार्य परिषदेच्या पहिल्या नागरी संस्कृती विषयक संवाद मंचाचे उद्घाटन


साम्राज्यांनी जगाचे नकाशे कदाचित नव्याने आखले असतील, पण नागरी संस्कृती विषयक संवादांनी वैश्विक विचारात परिवर्तन घडवून समृद्ध केले ; म्हणून एससीओ नागरी संस्कृती विषयक परिषद हा केवळ एक उत्सवी मंच नव्हे; तर जगाला दिशा देणारे व्यासपीठ होऊ शकतो: पंतप्रधान

21 व्या शतकातील तंत्रज्ञानाने जगभरात सांस्कृतिक जोडणीसाठी नव्या संधी निर्माण केल्या; आपले पूर्वज कधीकाळी ज्या मार्गांवरून महिनोंमहिने प्रवास करत होते त्याच मार्गांवरील देशांचे नागरिक आता केवळ काही सेकंदांमध्ये एकमेकांशी जोडले जातात : पंतप्रधान

डिजिटल मंचांनी ज्ञानाचे सामायीकीकरण, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि आंतरराष्ट्रीय सहयोग या बाबी कमालीच्या सहज-सोप्या करून टाकल्या आहेत; एससीओ देशांनी या नव्या संधींचा पुरेपूर लाभ घेण्‍याची गरज : पंतप्रधान

आपल्या देशांतील वस्तुसंग्रहालये, ग्रंथसंग्रहालये आणि पुराभिलेखगारांमध्ये हजारो वर्षांचा अमूल्य वारसा जतन करून ठेवलेला आहे; प्राचीन हस्तलिखिते, दुर्मिळ मजकूर, ऐतिहासिक दस्तावेज आणि कलाकृती आपल्या खोलवर रुजलेल्या संबंधांचे अनेक पैलू उजळून टाकतात; हा वारसा तरुण पिढीकडे हस्तांतरित करण्यासाठी आज तंत्रज्ञानाद्वारे प्रचंड संधी उपलब्ध : पंतप्रधान

आपण डिजिटलीकरण आणि प्राचीन मजकुरांचे भाषांतर यासाठी एकमेकांना सहकार्य करू शकतो, आणि संयुक्त संशोधन प्रकल्पांच्या माध्यमातून, आपल्या सामायिक इतिहासाचे नवे आयाम उलगडू शकतो; यामुळे जगाच्या कोणत्याही भागात असलेल्या तरुणाला दुसऱ्या देशाचा सांस्कृतिक वारसा सखोलपणे समजून घेणे शक्य होईल: पंतप्रधान

आपल्या संस्कृतीने आपल्याला ‘वसुधैव कुटुंबकम’ची म्हणजेच संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे अशी शिकवण दिली आहे; म्हणून, येथे आपल्या स्वतःच्या कल्याणाची इच्छा जागतिक कल्याणाच्या भावनेत दृढपणे गुंफलेली आहे; आपण परस्पर सुसंवादाला जागतिक कल्याणाचा आधार मानतो: पंतप्रधान

Posted On: 20 NOV 2026 11:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील पुराना किल्ला येथे पहिल्या ‘शांघाय सहकार्य संघटना’  नागरी संस्कृती विषयक  संवाद मंचाचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करण्याआधी,  त्यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांतील मान्यवर, मंत्री, राजदूत, उच्चायुक्त, विद्वान, कलाकार आणि इतर पाहुण्यांचे स्वागत केले. सध्या जागतिक स्तरावरील चर्चांमध्ये युद्ध आणि अशांततेच्या मुद्द्यांना अधिक महत्त्व दिले जात असताना, विविध देशांमधील नागरी संस्कृती विषयक  संबंधांवर संवाद घडवून आणणे महत्त्वाचे असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.  सांस्कृतिक संबंध हे जागतिक शांततेचा सर्वात भक्कम आधार आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) 25 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सुरक्षा, अर्थव्यवस्था आणि संपर्कव्यवस्था या क्षेत्रांतील वाढत्या सहकार्याला सांस्कृतिक संबंधांमुळे अधिक बळ मिळेल, असे त्यांनी नमूद केले. “आपले सामायिक नागरी संस्कृती विषयक अनुभव जगाला एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील,” असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

पुराना किल्ल्याच्या ऐतिहासिक महत्त्वाचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, या सांस्कृतिक वारसा स्थळाचा इतिहास सांगताना,  इतिहासातील  तज्‍ज्ञ, विद्वान मंडळी  महाभारत काळापर्यंत, म्हणजेच हजारो वर्षे आपल्याला  मागे नेतात. या प्राचीन स्थळी सादर करण्यात आलेल्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांमधून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडते. चैतन्यमय वैदिक मंत्रोच्चार, बौद्ध तत्त्वज्ञानाचे सादरीकरण आणि हनुमानजींच्या प्रवासाचे चित्रण यांतून प्रेम, एकता आणि मानवी कल्याणाचा वैश्विक संदेश देण्यात आला. हे संदेश भौगोलिक आणि राजकीय सीमा ओलांडणारे आहेत, असे त्यांनी नमूद केले. “आपण सर्वजण या कार्यक्रमाचा आनंद घ्याल आणि हा सोहळा ऐतिहासिक ठरवून एका नव्या परंपरेचा पाया रचण्‍याचे कार्य करणार आहे, याची मला खात्री आहे. भविष्यात अशी परंपरा निर्माण करण्‍यामध्‍ये तुम्ही दिलेल्या योगदानासाठी  तुम्हां  सर्वांचे स्मरण केले जाईल,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी सिंधू संस्कृती आणि मेसोपोटेमिया यांच्यात व्यापारी संबंध होते. पुढे भारत, चीन, मध्य आशिया आणि युरेशिया यांना जोडणाऱ्या रेशीम मार्गासह विविध व्यापारी मार्गांमुळे या प्रदेशांतील संपर्क वाढला. या मार्गांवरून व्यापारी, विद्वान, प्रवासी आणि बौद्ध भिक्खू यांची ये-जा होत असे. फाहियान, ह्युएन त्सांग, यिजिंग आणि कुचा येथे जन्मलेले कुमारजीव यांसारख्या बौद्ध भिक्खूंनी विचार, भाषा आणि बौद्ध ग्रंथांच्या देवाणघेवाणीत महत्त्वाचे योगदान दिले. नालंदा, कुचा आणि दुनहुआंग यांसारखी केंद्रे या सांस्कृतिक देवाणघेवाणीची महत्त्वाची ठिकाणे ठरली. या उदाहरणांचा संदर्भ देत पंतप्रधानांनी शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार्याचे आणि विविध देशांतील जनतेच्या परस्पर संबंधांचे महत्त्व अधोरेखित केले. सांस्कृतिक संवादाचे सामर्थ्य काळाच्या कसोटीवर टिकून राहिले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

“साम्राज्यांनी निश्चितच जगाचे नकाशे बदलले; मात्र संस्कृतींमधील संवादाने जगाच्या विचारविश्वात परिवर्तन घडवून आणले आणि ते अधिक समृद्ध केले,” असे प्रतिपादन मोदी यांनी केले.

ज्ञान एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात प्रवास करताना त्याच्या अभिव्यक्तीचे स्वरूप बदलू शकते; मात्र त्यातून मिळणारा प्रकाश कायमस्वरूपी असतो, असे नमूद करताना पंतप्रधानांनी भारतातील पंचतंत्राचे उदाहरण दिले. भारतातील पंचतंत्राचा प्रवास पर्शियन आणि अरबी भाषांमध्ये झाला; तिथे ‘कलिला वा दिमना’ या नावाने ते पुढील अनेक पिढ्यांसाठी अजरामर झाले. तसेच, रामायणाने आग्नेय आशियातील स्थानिक संस्कृती, सादरीकरण, कला आणि साहित्य समृद्ध केले. कंबोडियामध्ये त्याचे ‘रीमकर’ असे रूपांतर झाले. “ज्ञान कोणत्याही स्वरूपात असले; तरी ते नेहमी प्रकाशच देते,” असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

विज्ञान आणि गणिताच्या क्षेत्रातील सांस्कृतिक देवाणघेवाणीचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधानांनी भारतीय विद्वान ब्रह्मगुप्त यांच्या गणितीय संकल्पना बगदादपर्यंत पोहोचल्याचा उल्लेख केला. “तिथे अल्-ख्वारिझ्मी यांच्यासारख्या विद्वानांनी गणिताचे ज्ञान पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले,” असे मोदी यांनी नमूद केले.

वास्तुकला आणि संगीताच्या क्षेत्रातील समान सांस्कृतिक वारशाकडे लक्ष वेधताना पंतप्रधानांनी मध्य आशियातील मकाम आणि भारतीय रागदारी संगीत यांच्यातील संबंध, भारतातील कव्वालीला समृद्ध करणारा सूफी प्रभाव, तसेच समरकंद आणि हेरात इथल्या मध्य आशियाई उद्यान परंपरांचा चारबाग शैलीच्या विकासावर पडलेला प्रभाव यांचा उल्लेख केला. मुक्त सांस्कृतिक देवाणघेवाण सातत्याने सुरू ठेवण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. “आजही ही देवाणघेवाण मुक्तपणे आणि अखंडपणे सुरू राहावी, यासाठी या शिखर परिषदेची आणि अशा उपक्रमांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते,” असे पंतप्रधान म्हणाले.

21व्या शतकातील तंत्रज्ञानामुळे सांस्कृतिक संपर्कासाठी अभूतपूर्व संधी उपलब्ध झाल्या आहेत, यावर भर देत पंतप्रधान म्हणाले की, ज्या प्रदेशांदरम्यान प्रवास करण्यासाठी पूर्वी अनेक महिने लागत असत, तिथले लोक आता काही सेकंदांत एकमेकांशी संपर्क साधू शकतात. तसेच, डिजिटल व्यासपीठांमुळे ज्ञानाची देवाणघेवाण, सांस्कृतिक आदानप्रदान आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक सुलभ झाले आहे. या तांत्रिक प्रगतीचा पुरेपूर उपयोग करण्याचे आवाहन त्यांनी केले. “एससीओ देशांनी या नव्या संधींचा पुरेपूर लाभ घ्यायला हवा,” असे त्यांनी सांगितले.

वस्तुसंग्रहालये, ग्रंथालये आणि पुरातनवस्तू अभिलेखागारांमधील प्राचीन हस्तलिखिते, दुर्मिळ ग्रंथ, ऐतिहासिक दस्तऐवज आणि कलाकृती यांसारखा हजारो वर्षांचा वारसा जपण्याविषयी आणि तो सर्वांपर्यंत पोहोचवण्याबाबत उपस्थितांना सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राचीन ग्रंथांचे डिजिटायझेशन आणि भाषांतर करण्यासाठी परस्पर सहकार्य करण्याचा प्रस्ताव मांडला. तसेच सामायिक इतिहासावरील संयुक्त संशोधन प्रकल्प राबवण्याची सूचना केली  यामुळे, जगाच्या कोणत्याही भागात बसलेला तरुण दुसऱ्या देशाचा सांस्कृतिक वारसा अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल, असे पंतप्रधान  म्हणाले. 

आज संसाधनांचा विस्तार झाला असला तरी अनेकदा महान साहित्य आणि बौद्धिक कलाकृती काही मर्यादित भाषांपुरतेच उपलब्ध असते असे त्यांनी सांगितले. याचा लाभ सर्वदूर पोहोचावा या दिशेने तांत्रिक उपकरणांचा उपयोग केला पाहिजे असे ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने त्यांच्या अनुवादाच्या कार्याला नवीन गती देता येईल, असे पंतप्रधान म्हणाले.

संग्रहालये आणि सांस्कृतिक संस्थांची संयुक्त प्रदर्शनांचे आयोजन, विद्यापीठांमधील विद्वान आणि संशोधकांची देवाणघेवाण, सिल्क रूट आणि बौद्ध वारसा स्थळांना जोडणारे हेरिटेज सर्किट्स आणि सांस्कृतिक मार्ग, सांस्कृतिक पर्यटन, संयुक्त सांस्कृतिक महोत्सवाला प्रोत्साहन आणि कलाकारांची देवाणघेवाण   अशा उपक्रमांच्या सकारात्मक मानवी परिणामांविषयी  पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला. अशा प्रयत्नांमुळे आपल्या नागरिकांना एकमेकांच्या संस्कृतीला अधिक जवळून जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळेल,  असे त्यांनी  सांगितले.

आजच्या काळातील नागरी संस्कृतीच्या या संवादाला आगामी दशकांमध्ये नव्या उंचीवर नेण्याची जबाबदारी ही तंत्रज्ञानस्नेही आणि जगाला समजून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या युवा पिढीवर असल्याची बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली. स्थानिक कलाकार आणि कारागीरांना सोबत घेऊन युवा वर्गाला विविध भाषा, साहित्य आणि सांस्कृतिक परंपरांशी जोडून घेता यावे याकरता अधिक संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात असे आवाहन त्यांनी केले. आपले युवा कलाकार, लेखक आणि चित्रपटकर्मी डिजिटल माध्यमे आणि इतर सर्जनशील व्यासपीठांच्या माध्यमातून आपला सामायिक वारसा भावी पिढीपर्यंत पोहोचवू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारतीय धार्मिक विधींच्या समारोपावेळी केल्या जाणाऱ्या प्रार्थनांमधून सर्व प्राणिमात्रांमध्ये सद्भावना असावी आणि संपूर्ण जगाला एकच कुटुंब मानण्याच्या वसुधैव कुटुम्बकम् या तत्वाशी जोडलेल्या संपूर्ण जगाच्या कल्याणाचीच इच्छा व्यक्त केली जाते याचे स्मरण त्यांनी करून दिले. याच संदर्भाने वैयक्तिक आणि राष्ट्रीय कल्याण हे जागतिक सौहार्दाशी जोडलेले असल्याचे ते म्हणाले. आपण परस्पर सद्भावनेलाच जागतिक कल्याणाचा पाया मानतो, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

परस्पर सामायिक समान घटकांच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या परस्पर विश्वासावरच परस्पर सद्भावनाही अवलंबून असते असे मत त्यांनी व्यक्त केले. या मंचाचा प्रारंभ करतांना ऐकवल्या गेलेल्या वैदिक मंत्रोच्चारणाचा संदर्भ त्यांनी मांडला. या मंत्रोच्चारणातूनच प्रेरणा घेत, विविध भाषा, जीवनशैली आणि परंपरांमधील वैविध्याचा स्वीकार करत, आणि याच वैविध्याचा उत्सव साजरा करत, वैविध्यातूनच एकतेचे ध्येय साध्य करण्याचा अनुभव भारताने दिला असल्याचे ते म्हणाले. जेव्हा आपण या उदार दृष्टिकोनाचा अंगिकार करतो, त्यावेळी आपले हे वैविध्यच आपल्या एकतेचा आधार बनते, असे ते म्हणाले.

आपल्या संबोधनाच्या समारोपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, संगच्छध्वं संवदध्वं सं वो मनांसि जानताम् या वैदिक सुभाषिताचा संदर्भ दिला. एकत्र चालू या, एकत्र संवाद साधू या आणि आपल्या विचारांमधील सलोख्याचे ध्येय साध्य करू या असा या सुभाषिताचा अर्थ आहे.  यासोबतच पहिल्या शांघाय सहकार्य संघटना संस्कृती संवाद मंचाच्या आयोजनाबद्दल त्यांनी शुभेच्छाही दिल्या, तसेच यातून फलदायी विचारमंथन व्हावे यासाठी सदिच्छाही व्यक्त केली.

 
सुवर्णा बेडेकर/निलीमा चितळे/संजना चिटणीस/आशुतोष सावे/रेश्मा बेडेकर/भक्‍ती सोनटक्के/तुषार पवार/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2339402) अभ्यागत कक्ष : 6
Read this releasein: English