गोवा, 20 नोव्हेंबर 2026
प्रकाशाच्या पहिल्या कवडशापासून ते पडद्यावरील पहिल्या फ्रेमपर्यंतच्या प्रवासात जगाला एकत्र येण्याचे काहीएक कारण नक्कीच सापडते. आणि आज गोवा अशाच प्रकारचे जग बनला आहे. अरबी समुद्रातल्या सोनेरी लाटांच्या पार्श्वभूमीवर गोव्याने पुन्हा एकदा एका जागतिक रंगमंचाचे रुप धारण केले आहे. या तोच रंगमंच आहे जिथे चित्रपटकर्मी, पडद्यावरील प्रख्यात कलाकार आणि चित्रपटप्रेमी एकत्र येतात, संस्कृतींचा संगम होतो आणि कल्पनाशक्तीला नवे पंख लाभतात.
,inthepresenceofMembersofParliament,seniorofficialsoftheMinistry_20261120213345_1f0f29.jpeg)
गोव्यातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आज 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा अर्थात इफ्फीचा (IFFI - International Film Festival of India) दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला, आणि कथानकांच्या विश्वाची दारे खुली झाली. यंदाच्या महोत्सवाच्या निमित्ताने चलचित्रपटांच्या अमर्याद जादूचा उत्सव साजरा करण्यासाठी 86 देश आणि 150 पेक्षा जास्त चित्रपट एकत्र आले आहेत. सीमाविरहित कथा ही संकल्पना इफ्फीच्या यंदाच्या आयोजनामागची प्रेरणा आहे. या प्रेरणेतूनच इफ्फीचे यंदाचे हे पर्व भौगोलिक सीमा ओलांडण्याची, सांस्कृतिक दरी मिटवण्याची आणि वैविध्यपूर्ण अभिव्यक्तिंना एका सामायिक अनुभवात परावर्तीत करण्याची सिनेमाच्या असाधारण क्षमतेचा सोहळा साजरा करणार आहे.
_20261120214738_37b6a0.jpeg)
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या उद्घाटन सोहळ्यात उपस्थितांशी संवाद साधला. गेली 22 वर्षांपेक्षा जास्त काळ गोव्याच्या सांस्कृतिक दिनदर्शिकेचा अविभाज्य भाग बनलेला हा महोत्सव, सिनेमांच्या सीमा ओलांडण्याच्या आणि संस्कृतींना एकत्र आणण्याच्या क्षमतेचा सोहळा साजरा करत आला आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यंदाच्या इफ्फीची संकल्पना ही भारताच्या वसुधैव कुटुम्बकम् अर्थात संपूर्ण जग हे एकच कुटुंब आहे या चिरंतन तत्त्वज्ञानाशी जुळणारी आहे असे ते म्हणाले. सिनेमा आपल्याला विविध संस्कृतींचा अनुभव घेण्याची आणि आपल्याला एकत्र जोडणाऱ्या सामायिक दुव्याचा शोध घेण्याची संधी देतो, असे त्यांनी सांगितले.
रामायण चित्रपटाचा ब्रिक्स चित्रपट विभागात झालेला समावेश हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे आसवे सांगत त्यांनी भारतीय चित्रपट सृष्टी, विशेषतः मराठी, कोंकणी आणि गोव्याच्या चित्रपटांची समृद्धता दाखवून देण्यात इफ्फीची भूमिका अधोरेखित केली. या मान्यतेमुळे अधिकाधिक तरुण गोवेकर चित्रपट निर्मितीकडे वळतील आणि त्यांच्या कथा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतील अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

गोव्याला चित्रपटनिर्मितीचे मोठे केंद्र बनवण्याच्या संकल्पनेची रूपरेषा मांडताना गोव्याच्या मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, “आम्हाला गोवा ही जेथे चित्रपट निर्मिती सुरु होईल आणि चित्रपट तयार होऊन पूर्ण होईल अशी जागा करायची आहे.” गोवा चित्रपट चित्रीकरण कायदा, 2021, ऑनलाईन एक खिडकी परवानगी प्रणाली तसेच चित्रपट निर्मात्यांसाठी वित्तीय मदत योजना हे गोवा राज्याची चित्रपट परिसंस्था बळकट करण्यासाठीचे महत्त्वाचे उपक्रम आहेत हे त्यांनी अधोरेखित केले. निर्मिती-पूर्व, निर्मिती-पश्चात, व्हीएफएक्स आणि चित्रपट प्रशिक्षण इत्यादी सुविधांनी सुसज्ज असलेली चित्रपट नागरी उभारण्याच्या संकल्पनेची घोषणा देखील त्यांनी केली.
अॅनिमेशन, कृत्रिम बुद्धीमत्ता, तसेच आभासी पद्धतीने निर्मिती या क्षेत्रांतील तांत्रिक प्रगतीमुळे उदयाला येणाऱ्या संधींवर अधिक भर देऊन ते म्हणाले की, यामुळे गीव्यातील तरुण सर्जनशील प्रतिभावंतांना सतत विकसित होणाऱ्या जागतिक चित्रपट उद्योगाचा भाग होण्यासाठी सुसज्ज करणे हे आमचे ध्येय आहे.

सीमा ओलांडणाऱ्या कथा या संकल्पनेविषयी बोलताना खासदार आणि प्रसिद्ध अभिनेते रवी किशन म्हणाले की ही संकल्पना त्यांच्या स्वतःच्या जीवनाशी अगदी जवळून निगडित असून आपण आपल्या कारकिर्दीत विविध भारतीय भाषांमधल्या आणि प्रदेशांमधल्या सुमारे 700 चित्रपटांमध्ये काम केले आहे. भाषा किंवा भौगोलिक सीमा कोणत्याही असोत प्रेक्षक देखील चित्रपटातील सत्य, भावना आणि प्रभावी कथानक या मूलभूत मूल्यांशी जोडले जातात. जगाच्या एका कोपऱ्यात जन्माला आलेले कथानक हजारो मैल दूर राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या मनातही आपले हक्काचे स्थान निर्माण करू शकते, हीच चित्रपटाची जादू आहे, असे सांगून सीमांच्या मर्यादा दूर करुन मानवी अनुभवांची जाणीव निर्माण करण्याचे चित्रपटांचे सामर्थ्य त्यांनी अधोरेखित केले. भारताच्या चैतन्यशील चित्रपट उद्योगाला आणखी मजबूत करण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाला देऊन भारत हा जगातील सर्वाधिक चित्रपटांची निर्मिती करणारा देश असल्याचे त्यांनी नमूद केले.

या वर्षीच्या महोत्सवाची पार्श्वभूमी तयार करत, इफ्फीचे महोत्सव संचालक आशुतोष गोवारीकर यांनी ज्या काळात अतिप्रमाणात संपर्कजोडणी उपलब्ध असूनही अनेकदा सांस्कृतिक विलगीकरण अनुभवायला मिळते अशा विरोधाभासी युगात चित्रपटांमध्ये असलेल्या एकीकरणाच्या सामर्थ्यावर प्रकाश टाकला. यावर्षीच्या महोत्सवाच्या ‘सीमाविरहित कथा’ या संकल्पनेमागील तत्वज्ञान स्पष्ट करताना त्यांनी प्रेक्षकांना आठवण करून दिली की विभाजन हे बहुतेकदा आपण स्वतःहूनच लादलेले असते.

चित्रपट कशा प्रकारे अडथळे दूर करतात यावर अधिक भर देत, जेव्हा दर्शक अनोळखी भाषेतील पात्रांशी एकरूप होतात तेव्हा लोकांमधील अंतर तात्काळ कमी होते असे निरीक्षण गोवारीकर यांनी नोंदवले. “चित्रपटाची कथा हे अशा काही मोजक्या बाबींपैकी आहे ज्या पारपत्राविना सीमा पार करू शकतात,” ते म्हणाले. हीच संकल्पना वास्तव जीवनात साकारण्यासाठी, इफ्फीच्या या वर्षीच्या कार्यक्रमात नऊ जागतिक चित्रपटांचे प्रीमियर्स, दोन आंतरराष्ट्रीय प्रीमियर्स, 24 आशियाई प्रीमियर्स आणि 116 भारतीय चित्रपटांचे प्रीमियर्स असा विस्तृत पट मांडण्यात येणार असून, हे देशांमधील सीमा, चित्रपटांची युगे, उदयोन्मुख आवाज आणि चैतन्यमय यजमान शहर यांच्यातील दरी ओलांडण्यासाठीचे खुले निमंत्रण ठरते.
_20261120215906_72bdec.jpeg)
या समारंभाला संबोधित करताना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी सीमा ओलांडून विविध संस्कृतींना तसेच वेगवेगळ्या दृष्टिकोनांना एका सूत्रात गुंफण्याचे चित्रपटांचे सामर्थ्य अधोरेखित केले. इफ्फी हा केवळ चित्रपटांचा उत्सव नसून विविध संस्कृती, नवनवीन कल्पना, आठवणी आणि मानवी अनुभवांना एकत्र आणणारा एक महत्वाचा मंच आहे, असे त्यांनी सांगितले.
सर्व दिशांकडून आपल्याकडे उद्दात्त विचारांचा प्रसार होऊ दे या ऋग्वेदातील वचनाचा दाखला देत सर्व जगासाठी मुक्त द्वार असल्याने भारताची सांस्कृतिक ओळख अधिकाधिक समृद्ध होत असल्याचे सांगितले. चित्रपट ही भारताच्या सॉफ्ट पॉवरची सर्वात सामर्थ्यशाली अभिव्यक्ती असून सांस्कृतिक देवाणघेवाणीची हा भावना इफ्फी 2026 मधील रशिया आणि स्पेनच्या विशेष चित्रपट प्रदर्शनांमधून तसेच ब्रिक्स देशांमधील 21 चित्रपटांमधून प्रतिबिंबित होत आहे, असे चंचल कुमार यांनी सांगितले.
यंदाच्या ‘सीमा ओलांडणाऱ्या कथा’ या संकल्पनेवर भाष्य करताना ते म्हणाले की जगाच्या एका कोपऱ्यातील कथा, भावना, कल्पनाशक्ती आणि मानवी अनुभवांच्या माध्यमातून जगाच्या दुसऱ्या भागातील लोकांपर्यंत पोहोचू शकते. याशिवाय 52 महिला चित्रपटनिर्मात्या आणि पदार्पणातील 62 चित्रपटनिर्मात्यांचा या महोत्सवातील सहभाग म्हणजे उदयोन्मुख कलाकारांना आणि सशक्त कथाकथनाला स्थान देण्याच्या इफ्फीच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे, असे ते म्हणाले.

या उद्घाटन सोहळ्याला राज्यसभेचे खासदार सदानंद म्हाळू शेट तानावडे, गोव्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू, शिवोलीचे आमदार आणि एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोव्याच्या उपाध्यक्ष डेलिला लोबो, भारतीय चित्रपट विकास महामंडळाचे अध्यक्ष जी. कृष्णकुमार, प्रसार भारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी, एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोव्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक बांदेकर आणि भारतीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धीरज सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक संधींशी जोडण्याची दोन दशके यशस्वीरीत्या पूर्ण केल्याचे साजरीकरण म्हणून 20 वा वेव्हज् फिल्म बझार 20 नोव्हेंबर 2026 रोजी गोवा इथे 57 व्या इफ्फी महोत्सवाबरोबर सुरू झाला. उद्घाटन सोहळ्यात विशेष दृकश्राव्य सादरीकरणाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. चित्रपटसृष्टीतील कार्तिक आर्यन, साई पल्लवी आणि यांसारख्या नामवंत कलाकारांच्या उपस्थितीने उद्घाटन सोहळ्याला विशेष झळाळी आली.

आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागाचे ज्युरी अध्यक्ष आनंद एल. राय आणि ज्युरी सदस्य बोगदान मुरेशानू, सोल बेरुएझो पिचॉन-रिव्हिएर, मारिया अलेजांद्रा रोजास आणि रत्चापूम बूनबुंचाचोक यांचा उद्घाटन समारंभात सत्कार करण्यात आला. तसेच, इंडियन पॅनोरमा फीचर फिल्म विभागाचे अध्यक्ष मधुर भांडारकर आणि नॉन-फीचर फिल्म विभागाचे अध्यक्ष हिमांशू शेखर खटुआ यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
जागतिक सांगितिक कार्यक्रमांनी उद्घाटन सोहळ्याची रंगत वाढवली
चित्रपट या वैश्विक भाषेचा उत्सव साजरा करणाऱ्या विविध संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी उद्घाटन सोहळ्यात पाहायला मिळाली. तीन वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेते संगीतकार रिकी केज यांच्या नेतृत्वाखालील सिंफनी ऑर्केस्ट्राने ‘संगीताच्या माध्यमातून चित्रपटांचे विश्व’ या संकल्पनेवर आधारित सादरीकरण केले. या सादरीकरणातून प्रेक्षकांना विविध संस्कृती आणि कथाकथनाच्या परंपरांचा सांगीतिक प्रवास अनुभवता आला. चित्रपट हे भाषिक आणि भौगोलिक सीमा ओलांडण्याचे सामर्थ्य कसे बाळगतात, हे या सादरीकरणातून अधोरेखित करण्यात आले.

उद्घाटनाच्या संध्याकाळी ‘म्युझिक विदाऊट बॉर्डर्स’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. विविध देशांतील संगीतकारांच्या सहभागातून साकारलेल्या या आंतरराष्ट्रीय सांगीतिक सहकार्याद्वारे संगीत परंपरा, सौहार्द आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचा उत्सव साजरा करण्यात आला. महोत्सवाचे वैशिष्ट्यपूर्ण मोराचे बोधचिन्ह ‘बियाँड द फ्रेम’ या विशेष नृत्य सादरीकरणातही साकारण्यात आले. नृत्याच्या हालचाली आणि कलात्मक अभिव्यक्तीच्या माध्यमातून इफ्फीचे बोधचिन्ह जिवंत केले.
वेव्हज् फिल्म बझारची गौरवशाली 20 वर्षे
वेव्हज् फिल्म बझारचा उल्लेखनीय प्रवास आणि चित्रपट व्यवसाय, सहनिर्मिती, वित्त पुरवठा, नेटवर्किंग तसेच जागतिक सहयोग यांमधील त्याचे योगदान यावर या समारंभात भर दिला होता. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ - एनएफडीसीद्वारा आयोजित वेव्हज् फिल्म बझारने 2007 मध्ये 18 देशांतील 204 प्रतिनिधींच्या सहभागापासून सुरुवात केली होती. आज त्याचे रूपांतर एका अग्रगण्य आंतरराष्ट्रीय व्यासपीठात झाले असून इथे 40 हून अधिक देशांतील 2,500 पेक्षा जास्त चित्रपट व्यावसायिक एकत्र येतात.
,inPanaji,GoaonNovem_20261120220427_894fee.jpeg)
सहनिर्मिती बाजारपेठ, पटकथा लेखकांसाठी प्रयोगशाळा, प्रगतीपथावरील चित्रपट प्रयोगशाळा आणि ज्ञान मालिका यांसारख्या प्रमुख उपक्रमांच्या माध्यमातून वेव्हज् फिल्म बझार उदयोन्मुख कलागुणांना प्रोत्साहन देते आणि चित्रपट निर्मितीच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर चित्रपटांना सहकार्य करते. या व्यासपीठाच्या डिजिटल बी2बी प्लॅटफॉर्मद्वारे चित्रपट, ओटीटी, ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स (व्हीएफएक्स), गेमिंग आणि संगीत या क्षेत्रांतील 12,500 हून अधिक खरेदीदार आणि विक्रेते कृत्रिम बुद्धिमत्ता - एआयवर आधारित प्रणालीच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले जातात. दोन दशकांचा प्रवास पूर्ण केल्यानंतरही वेव्हज् फिल्म बझारचे सर्जनशील कल्पनांचे जागतिक स्तरावरील सहकार्यामध्ये रूपांतर करण्याचे कार्य सुरू आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दृक्-श्राव्य उद्योगातील भारताचे स्थान अधिक बळकट होत आहे.
इफ्फी-2026 ची ठळक वैशिष्ट्ये
57 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा चित्रपटसृष्टीचा एक भव्य उत्सव ठरेल. ‘स्टोरीज् विदाउट बॉर्डर्स’ या प्रेरणादायी संकल्पनेअंतर्गत 86 देशांतील 150 हून अधिक चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित केले जाणार आहेत. 137 देशांमधून प्राप्त झालेल्या 1,900 हून अधिक चित्रपटांच्या प्रवेशिकांमधून या महोत्सवासाठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. या महोत्सवात एक वेधक चित्रपट प्रवास अनुभवायला मिळणार आहे. फादरलँड हा उद्घाटनाचा चित्रपट, आय मॅटर हा महोत्सवाच्या मध्यावर प्रदर्शित होणारा चित्रपट, तर वी आर ऑल स्ट्रेंजर्स हा समारोपाचा चित्रपट असणार आहे.
_20261120221539_533cbf.jpeg)
चित्रपट महोत्सवाचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी यंदा ॲनिमेशन आणि चित्रपटांवर आधारित चित्रपट (अॅनिमेशन अँड फिल्म्स अबाउट फिल्म्स) असे दोन विशेष विभाग सादर करण्यात येत आहेत. यंदाच्या महोत्सवात स्पेन हा सन्माननीय देश म्हणून सहभागी होत आहे, तर रशिया हा भागीदार देश आहे. ब्रिक्स सिनेमा विभागात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांतील चित्रपटांचा समावेश आहे. या विभागातून जागतिक स्तरावर उदयास येत असलेल्या विविध कथांना आणि चित्रपट निर्मितीच्या वेगवेगळ्या शैलींना व्यासपीठ मिळणार आहे. भारतीय पॅनोरमा विभागात 18 भाषांमधील 76 चित्रपटांचा समावेश आहे. यातून भारतातील कथाकथन परंपरांचे वैविध्य आणि समृद्धता अधोरेखित होते.
नवीन प्रतिभेला प्रोत्साहन देणे आणि सर्वसमावेशकतेला चालना देणे, या उद्देशाने इफ्फी 2026 (भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026) मध्ये 52 महिला चित्रपट निर्मात्या आणि 62 पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकांच्या कार्यावर विशेष प्रकाश टाकण्यात आला आहे. ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो’ (उद्याची सर्जनशील मने) या उपक्रमाचे सहावे पर्व आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये 13 विविध कलाप्रकारांतील 100 युवा चित्रपट निर्मात्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. यातून चित्रपटसृष्टीतील नव्या पिढीतील सर्जनशील प्रतिभेला प्रोत्साहन मिळेल. याशिवाय, 14 मार्गदर्शन सत्रे (मास्टरक्लासेस) आणि परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून शिकणे, सहकार्य, संवाद आणि सर्जनशील विचारांची देवाणघेवाण यासाठी एक चैतन्याने सळसळते व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

इफ्फी 2026 (भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026) हा केवळ चित्रपटांचा उत्सव नाही, तर विविध संस्कृती, दृष्टिकोन आणि सर्जनशील विचारांचा संगम आहे. सीमा ओलांडून जगाला एकत्र आणण्याचे सामर्थ्य सिनेमामध्ये आहे, हे या महोत्सवातून पुन्हा अधोरेखित होते. त्याचबरोबर, चित्रपटाच्या भाषेला भौगोलिकतेच्या कोणत्याही सीमा नाहीत, ही भाषा सीमांच्या पलीकडच्याही कथा सांगते आणि विविध भावना व्यक्त करते. चित्रपटांच्या माध्यमातून नऊ दिवसांचा हा प्रवास उलगडत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती गोष्ट म्हणजे जग भौगोलिक सीमांनी विभागलेले असले, तरी चित्रपटगृहाच्या अंधारात आपण सर्वजण एकाच प्रकाशात स्वप्ने पाहत असतो.
Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | जयदेवी पुजारी स्वामी/हर्षल आकुडे/निलिमा चितळे/धनंजय वानखेडे/सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/संजना चिटणीस/भक्ती सोनटक्के/रेश्मा बेडेकर/आशुतोष सावे/दर्शना राणे