Posted On:
20 NOV 2026 8:00PM by PIB Mumbai
मुंबई, 20 नोव्हेंबर 2026
भारताची आण्विक सुरक्षा नियामक संस्था असलेल्या अणुऊर्जा नियामक मंडळाने 19 नोव्हेंबर 2026, रोजी राजस्थान अणुऊर्जा प्रकल्प युनिट 8 मध्ये आवश्यक सुरक्षा निकषांच्या पूर्ततेचे समाधानकारक पालन होत असल्याची खात्री करुन अणुऊर्जा निर्मिती प्रक्रियेतील ‘फर्स्ट अप्रोच टू क्रिटिकॅलिटी’ हा एक महत्त्वाचा टप्पा सुरू करण्यासाठी मंजुरी दिली.
अणुऊर्जा नियामक मंडळाने ही परवानगी देण्यापूर्वी अणुसंयंत्रांची रचना, बांधकाम, कार्यान्वयन चाचणीचे निकाल आणि परिचालन सज्जता या सर्व गोष्टींचा सर्वसमावेशक सुरक्षाविषयक आढावा घेतला. या नियामक पुनरावलोकन प्रक्रियेअंतर्गत अणुऊर्जा नियामक मंडळ आणि त्याच्या सुरक्षा पुनरावलोकन समित्यांनी केलेले सविस्तर मूल्यांकन, नियामक तपासण्या आणि अणुऊर्जा नियामक मंडळाच्या संचालक मंडळाने केलेला विचारविनिमय यांचा समावेश होता.
फर्स्ट अप्रोच टू क्रिटिकॅलिटी हा राजस्थान अणुऊर्जा प्रकल्प युनिट 8 च्या कार्यान्वयनातील एक महत्त्वाचा टप्पा असून त्यामुळे विहित चाचण्यांची समाधानकारक पूर्तता आणि आवश्यक नियामक परवानग्यांच्या अधीन राहून या प्रकल्पातून व्यावसायिक कारणासाठी वीजनिर्मितीसाठी आवश्यक पुढील कार्यान्वयन टप्प्यांचा मार्ग मोकळा होतो.
अणुऊर्जा नियामक मंडळ पुढील कार्यान्वयन प्रक्रियेवर आपले नियामक नियंत्रण आणि देखरेख सुरू ठेवणार असून प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांतील सुरक्षिततेचे नियमित परीक्षण, सुरक्षा तपासणी आणि प्रकल्पस्थळी तैनात असलेल्या निरीक्षक पथकाद्वारे सातत्याने देखरेख ठेवली जाईल.
राजस्थान अणुऊर्जा प्रकल्प-8 हे भारतात स्वदेशी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विकसित केलेले आणि बांधलेले 700 मेगावॅट क्षमतेच्या दाबयुक्त जड पाणी अणुभट्टी मालिकेतील चौथे युनिट आहे. गुजरात मधील काकरापार अणुऊर्जा केंद्र येथे युनिट क्रमांक 3 आणि युनिट क्रमांक 4 असून राजस्थान मध्ये राजस्थान अणुऊर्जा प्रकल्प येथे युनिट क्रमांक 7 कार्यरत आहे.
राजस्थान अणुऊर्जा प्रकल्प-8 हे राजस्थानच्या चित्तोडगड जिल्ह्यातील रावतभाटा अणुऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी स्थित आहे. या ठिकाणी सध्या अणुऊर्जा प्रकल्पाची आठ युनिट्स आहेत.
सुवर्णा बेडेकर/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai