कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नागपूरमध्ये निवृत्तीवेतनधारकांसाठी हयातीच्या डिजिटल दाखल्यासंदर्भातील महाशिबिर यशस्वीरित्या संपन्न


फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाद्वारे घरबसल्या हयातीचा दाखला सादर करण्याबाबत तज्ञांनी केले निवृत्तीवेतनधारकांना मार्गदर्शन

Posted On: 20 NOV 2026 8:05PM by PIB Mumbai

नागपूर, 20 नोव्हेंबर 2026

निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या सोयीस्करपणे हयातीचा दाखला सादर करता यावा, यासाठी आज नागपूरमध्ये एका डिजिटल महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भारत सरकारचा निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागांतर्गत मुंबई येथील लेखा आणि कोषागार संचालनालय, तसेच नागपूर जिल्हा कोषागार कार्यालय यांनी संयुक्तपणे या शिबिराचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम नागपूरच्या सदर परिसरातील नियोजन भवनात झाला.

निवृत्तीवेतनधारकांमध्ये फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आणि त्याचा व्यापक अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी, देशव्यापी डिजिटल हयातीचा दाखला मोहीम 5.0 अंतर्गत या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाचे संचालक डॉ. प्रमोद कुमार यांनी निवृत्तीवेतनधारकांना मार्गदर्शन केले. निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी आता बँका किंवा कोषागार कार्यालयांमध्ये लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही, हे त्यांनी स्पष्ट केले. गुगल प्ले स्टोअरवरून 'आधारफेसआरडी' (AadhaarFaceRD) आणि ‘हयातीचा दाखला’ (Jeevan Pramaan) हे दोन ॲप्लिकेशन्स आपल्या स्मार्टफोनवर डाउनलोड करून, निवृत्तीवेतनधारक घरबसल्या चेहऱ्याच्या प्रमाणीकरणाद्वारे (face authentication) आपला डिजिटल हयातीचा दाखला सादर करू शकतात, हे त्यांनी अधोरेखित केले.

डॉ.प्रमोद कुमार यांनी सहभागींनी विचारलेल्या तांत्रिक प्रश्नांना उत्तरे दिली आणि ॲप्लिकेशन्सच्या वापरासंबंधीच्या त्यांच्या शंकांचे निरसन केले. तसेच, त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आणि जिल्हा प्रमुख बँकेच्या प्रादेशिक व्यवस्थापकांना निवृत्तीवेतनधारकांना जास्तीत जास्त सहकार्य करण्याचे आणि या तंत्रज्ञानाच्या व्यापक वापराला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नागपूर येथील लेखा आणि कोषागार संचालनालयाच्या सहसंचालक ज्योती भोंडे यांनी भूषवले. भोंडे यांनी या मोहिमेचे महत्त्व अधोरेखित केले आणि निवृत्तीवेतनधारकांमध्ये डिजिटल सुविधेबाबत अधिक जागरूकता निर्माण करण्याच्या गरजेवर भर दिला.

याप्रसंगी नागपूरचे उपमहालेखापाल (लेखा आणि हक्कदारी-2) नागराजन हे देखील उपस्थित होते.

वरिष्ठ कोषागार अधिकारी अमित मेश्राम यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात, महाशिबिराचा उद्देश आणि महत्त्व स्पष्ट केले. अतिरिक्त कोषागार अधिकारी शुभांगी धुर्वे यांनी मोबाईल ॲप्लिकेशन्सचा वापर आणि चेहरा प्रमाणीकरणाद्वारे डिजिटल हयातीचा दाखला सादर करण्याच्या प्रक्रियेचे एक प्रात्यक्षिक आणि सादरीकरण केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोषागार अधिकारी मोनाली भोयर यांनी केले, तर सहायक संचालक शैलेश कोठे यांनी आभार प्रदर्शन केले.

 

पीआयबी मुंबई | निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2339310) अभ्यागत कक्ष : 10
Read this releasein: English