जलशक्ती मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

“देशाची जलसुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी सर्व जलाशयांचे एकात्मिक व्यवस्थापनाची आवश्यकता” – केंद्रीय मंत्री सी.आर.पाटील


केंद्रीय मंत्री सी.आर.पाटील यांच्या हस्ते पुण्याच्‍या ‘सीडब्ल्यूपीआरएस’मध्‍ये 'एकात्मिक नदी, जलाशय आणि धरण प्रणाली' विषयावरील दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

Posted On: 19 NOV 2026 8:33PM by PIB Mumbai

पुणे, 19 नोव्हेंबर 2026

‘इंडियन सोसायटी फॉर हायड्रॉलिक्स’ या भारतीय जलविद्युत शास्त्र संस्थेच्या सहकार्याने खडकवासला येथील केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्रात (सीडब्ल्यूपीआरएस) ‘एकात्मिक नदी, जलाशय आणि धरण प्रणाली’ या विषयावर दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जलशक्ती राज्यमंत्री डॉ. राज भूषण चौधरी, जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा विभागाचे सचिव अशोक के. के. मीना, राष्ट्रीय जल अभियानाचे अतिरिक्त सचिव पियुष सिंह आणि केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एम. सेल्वा बालन हे मान्यवर उपस्थित होते.

“देशाची जलसुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी सर्व जलाशयांचे एकात्मिक व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे,” असे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी यावेळी सांगितले. “जलसंकटावर मात करणे ही सरकारइतकीच प्रत्येक जागरूक नागरिकाचीही जबाबदारी आहे. त्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करून दैनंदिन जीवनात पाण्याची बचत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे,” असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांच्या हस्ते जलसंपदा, धरण व्यवस्थापन, नदीप्रणाली आणि जलसुरक्षा यांसारख्या विषयांवरील महत्त्वपूर्ण संशोधनपर अहवाल आणि तांत्रिक साहित्याचे अनावरण करण्यात आले. तसेच भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम ), पुणे, भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळ (बीबीएमबी) आणि ईशान्य जलविद्युत व संलग्न संशोधन संस्था (एनईएचएआरआय) यांच्यासोबत तांत्रिक सहकार्यासाठी सामंजस्य करारांची  देवाणघेवाण करण्यात आली. परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये तांत्रिक सहकार्य वाढवणे, ज्ञानाची देवाणघेवाण करणे आणि संयुक्त संशोधनाला प्रोत्साहन देणे, हा या करारांचा मुख्य उद्देश असल्याचे केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एम. सेल्वा बालन यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांच्या हस्ते अरुणाचल प्रदेशातील दिबांग बहुउद्देशीय धरण प्रकल्पाच्या प्रतिकृतींचे अनावरण करण्यात आले. तसेच परिषदस्थळी आयोजित ‘तंत्रज्ञान आणि नवोन्मेष प्रदर्शनाचे’ उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून देशभरातून आलेल्या 300 हून अधिक प्रतिनिधींना जलसंपदा क्षेत्रातील विविध तांत्रिक प्रगती आणि आधुनिक उपाययोजनांची माहिती घेण्याची संधी मिळाली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दृकश्राव्य संवाद

याशिवाय, जलसंपदा प्रकल्पांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ‘जल संचय जन भागीदारी : कॅच द रेन’ (सीटीआर – पावसाचे पाणी साठवा) या उपक्रमाचा ऑनलाइन आढावा घेण्यात आला. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

दोन दिवसांचा कार्यक्रम

या परिषदेत पूर्ण सत्रे, बीजभाषणे, तज्ज्ञांची व्याख्याने आणि सहा प्रमुख विषयांवरील चर्चासत्रांचा समावेश आहे. यामध्ये एकात्मिक नदी खोरे आणि जलाशय प्रणाली, हवामान बदलांशी जुळवून घेण्याची क्षमता आणि अतिवृष्टीसारख्या तीव्र हवामान घटना, धरणांची स्थिती व सुरक्षितता आणि सक्षम पायाभूत सुविधा, जलाशयांमधील गाळाचे एकात्मिक व्यवस्थापन, प्रगत सर्वेक्षण आणि डिजिटल तंत्रज्ञान, तसेच जलविद्युत संरचना आणि सांडवे या विषयांचा समावेश आहे.

पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर /आशुतोष सावे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2338764) अभ्यागत कक्ष : 23
Read this releasein: Gujarati , English