कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एकात्मिक कीड व्यवस्थापनाबाबतच्या पाच दिवसांच्या एचआरडी प्रशिक्षण कार्यक्रमाचे नागपूरमधील आरसीआयपीएमसी येथे उद्घाटन

Posted On: 18 NOV 2026 4:30PM by PIB Mumbai

एकात्मिक कीड व्यवस्थापन (आयपीएम) याविषयीच्या पाच दिवसांच्या मानव संसाधन विकास (एचआरडी) प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन 16 नोव्हेंबर 2026 रोजी नागपूरच्या एकात्मिक कीड व्यवस्थापन प्रादेशिक केंद्रात (आरसीआयपीएमसी) झाले.  आयपीएममधील सहभागींचे ज्ञान व तांत्रिक कौशल्य वाढविणे व शाश्वत पीक सुरक्षा पद्धतींना प्रोत्साहन देणे हे 16 ते 20 नोव्हेंबर दरम्यान होत असलेल्या या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

नागपूरचे कृषी सहसंचालक उमेश घाडगे उद्घाटनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी बायोकन्सोर्टिया ही कंपनी व शाश्वत कृषी प्रोत्साहनामधील तिची भूमिका यांचे महत्त्व अधोरेखित केले. नागपूर आरसीआयपीएमसीचे सहसंचालक (इ) व प्रभारी डॉ. डी. के. नागाराजू यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापनाची संकल्पना, तत्त्वे, विचार व भूमिका याविषयी सविस्तर माहिती दिली. रायपूर सीआयपीएमसीचे उपसंचालक (इ) व प्रभारी डॉ. ज्ञानेश्वर बंछोर या कार्यक्रमाला उपस्थित होते. या पाच दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी 43 जणांनी नावनोंदणी केली आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये विविध प्रकारच्या किडींचे सर्वेक्षण व त्यांची आयपीएममधील भूमिका, एनपीएसएस ऍप्लिकेशनद्वारे कीड नियंत्रण आणि महत्त्वाच्या पिकांवर परिणाम करणाऱ्या प्रमुख कीटकांचा व रोगांचा शोध आणि व्यवस्थापन यासह एकात्मिक कीड व्यवस्थापनाशी संबंधित विविध विषयांचा समावेश आहे.

या कार्यक्रमामध्ये ‘त्रिचोग्रामा’, ‘मेटाऱ्हिझियम’, ‘ब्युव्हेरिया’ व ‘स्युडोमोनाज’ यासारख्या जैवनियंत्रक घटकांचा मोठ्या प्रमाणात व्यवहार्य वापर करण्याबाबतच्या सत्रांचा देखील समावेश आहे.  याशिवाय जैवनियंत्रक तंत्रज्ञान, शेतातील कीड व्यवस्थापन आणि समूह उपक्रमाच्या व शिवार भेटीच्या माध्यमातून कृषी परिसंस्था विश्लेषण (एइएसए) तक्ते तयार करणे याविषयीचे प्रात्यक्षिक ज्ञान सहभागींना मिळणार आहे.

या प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून नागपूर येथील  मेसर्स युनिव्हर्सल फार्म, कलमेश्वर येथे विविध खरीप पिकांसाठीची शिवार भेट ते एईएसए प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले आहे. तंत्रज्ञानविषयक सत्रांमध्ये कापूस, द्राक्षे, डाळिंब, ऊस, मका, भात, डाळी, तेलबिया, फळे व भाजीपाला यावरील प्रमुख किडी व रोग यांचा शोध व व्यवस्थापन यांचा समावेश करण्यात आला आहे.

अन्य महत्त्वाच्या विषयांमध्ये कीटकनाशकांचा सुरक्षित व योग्य वापर, कीड व्यवस्थापनासाठी विविध प्रकारच्या सापळ्यांचा वापर, नैसर्गिक शेती आणि ताजी फळे व भाजीपाला निर्यातीमधील आयपीएमची भूमिका यांचा समावेश आहे.

20 नोव्हेंबर 2026 रोजी प्रशिक्षणार्थ्यांचे मूल्यमापन, अभिप्राय व समारोप समारंभ याद्वारे या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. या सर्वसमावेशक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून सहभागींची तांत्रिक क्षमता बळकट करणे, शेतमाल उत्पादन वाढीसाठी पर्यावरणपूरक, विज्ञानावर आधारित व शाश्वत कीड व्यवस्थापन पद्धतींना प्रोत्साहन देणे आणि पर्यावरण संरक्षण हे नागपूरच्या आरसीआयपीएमसीचे उद्दिष्ट आहे.

***

Shailesh Patil / Surekha Joshi / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2338151) अभ्यागत कक्ष : 29
Read this releasein: English