सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आणि परवडण्याजोगे, वाणी परिचय आणि सुधारणा तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी मुंबईतील एवायजेएनआयएसएचडी (डी) आणि पॅरास्पीक लॅब्स यांच्यात सामंजस्य करार

Posted On: 18 NOV 2026 5:53PM by PIB Mumbai

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागांतर्गत स्वायत्त संस्था असलेल्या मुंबईतील अली यावर जंग राष्ट्रीय वाणी आणि श्रवण दिव्यांग संस्था (दिव्यांगजन) [एवायजेएनआयएसएचडी(डी)] यांनी वाणीविषयक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींसाठी परवडणारे, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सहाय्यक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी, आणि त्याचे वैद्यकीय प्रमाणीकरण करण्यासाठी गुरुग्राम येथील पॅरास्पीक लॅब्स प्रायव्हेट लिमिटेडसोबत सामंजस्य करार केला आहे.

या सामंजस्य करारानुसार, वाणीविकार असलेल्या व्यक्तींच्या आवाजाचे नमुने संकलित करण्यासाठी एवायजेएनआयएसएचडी(डी) सहकार्य करेल. तसेच वैद्यकीय संशोधन आणि प्रमाणीकरणासाठीही मदत करेल. या सहकार्यामुळे हिंदी भाषेतील दोषयुक्त वाणीचा डेटासेट विकसित करण्यास मदत होईल. पॅरास्पीक या भारतात विकसित आणि पेटंट प्राप्त कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपकरणाचे प्रशिक्षण आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी या डेटासेटचा उपयोग केला जाईल. हे उपकरण डिसआर्थ्रिया या वाणीविकारामुळे अस्पष्ट झालेली वाणी प्रत्यक्ष वेळेत स्पष्ट आणि सहज समजण्याजोग्या भाषेत रूपांतरित करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. पॅरास्पीक हे उपकरण पॅरास्पीक लॅब्स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक प्रणेत खेतान यांनी विकसित केले आहे. ते पुरस्कारप्राप्त युवा नवोन्मेषक असून इयत्ता बारावीचे विद्यार्थी आहेत.

या सामंजस्य करारावर मुंबईतील एवायजेएनआयएसएचडी(डी)चे संचालक डॉ. सुमन कुमार आणि पॅरास्पीक लॅब्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक स्वाती खेतान यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

स्वदेशी, परवडण्याजोग्या आणि सर्वांना उपलब्ध होऊ शकणाऱ्या सहाय्यक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे, वैद्यकीय संशोधन अधिक बळकट करणे आणि वाणीविषयक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींसाठी संवादाच्या संधी वाढवणे, हे या भागीदारीचे उद्दिष्ट आहे. डिजिटल समावेशन, सर्वांना सुलभ आरोग्यसेवा आणि दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण या भारत सरकारच्या दृष्टिकोनाशी हा उपक्रम सुसंगत आहे.
 


***

Shailesh Patil / Surekha Joshi / Madhura Nerurkar
 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2338113) अभ्यागत कक्ष : 22
Read this releasein: English