संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय हवाई दल 21–22 नोव्हेंबर 2026 रोजी नागपूरमधील वायुसेना नगर येथे 'एअर फेस्टिव्हल' चे करणार आयोजन

Posted On: 18 NOV 2026 12:17PM by PIB Mumbai

भारतीय हवाई दलाचे मुख्यालय देखभाल कमांड 21 आणि 22 नोव्हेंबर 2026 रोजी नागपूरमधील वायुसेना नगर येथे दोन दिवसीय 'एअर फेस्टिव्हल'चे आयोजन करणार आहे. हा महोत्सव भारतीय हवाई दलाचे कौशल्य, अचूकता आणि परिचालन क्षमता अनुभवण्याची एक उत्तम संधी उपलब्ध करून देत  आहे.

प्रसिद्ध 'सूर्य किरण ॲरोबॅटिक टीम' आणि 'सारंग हेलिकॉप्टर डिस्प्ले टीम' ची नेत्रदीपक हवाई प्रात्यक्षिके या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहे. तसेच 'आकाश गंगा स्कायडायव्हिंग टीम'द्वारे थरारक सादरीकरण देखील पाहायला मिळतील. या कार्यक्रमात 'गरुड स्पेशल फोर्सेस'ची व्यावसायिकता आणि कार्यक्षमता, 'एअर वॉरियर ड्रिल टीम'ची अचूकता आणि समन्वय, आणि आघाडीची लढाऊ विमाने 'Su-30 MKI चे प्रदर्शन देखील  समाविष्ट आहे.

या कार्यक्रमाचा उद्देश लष्करी हवाई क्षेत्राला सर्वसामान्यांच्या जवळ आणणे, युवा पिढीला प्रेरित करणे आणि भारतीय हवाई दलाची क्षमता व विविध पैलूंची ओळख करून देणे हा आहे. तसेच, भारतीय हवाई दलाची ओळख असलेली उत्कृष्टता, व्यावसायिकता, समर्पण आणि आत्मनिर्भरता ही मूळ मूल्ये अधोरेखित करणे हा देखील यामागचा उद्देश आहे.

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी  22 नोव्हेंबर 2026 रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला 'सन्माननीय अतिथी' म्हणून उपस्थित राहण्यास सहमती दर्शवली आहे.

सुरक्षेच्या अनिवार्य गरजा आणि परिचालन  नियमावली लक्षात घेत, हा 'एअर फेस्टिव्हल' वायुसेना नगरच्या सुरक्षित परिसरात आयोजित केला जात आहे. या कार्यक्रमाच्या ठिकाणी  केवळ निमंत्रित व्यक्तींनाच प्रवेश असेल. नागपूरमधील विविध शाळा, महाविद्यालये, एनसीसी कॅडेट्स आणि नागरी संस्थांना निमंत्रणे पाठवण्यात आली असून, दोन दिवसांच्या या कार्यक्रमात सुमारे 5,000 प्रेक्षक उपस्थित राहतील अशी  अपेक्षा आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पडावे यासाठी नागरी प्रशासन आणि नागपूर पोलिसांच्या निकट समन्वयातून व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे. या 'एअर फेस्टिव्हल'च्या माध्यमातून भारतीय हवाई दल  जनतेशी, विशेषतः युवकांशी आपला संवाद अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर, भारतीय हवाई दलातील  निळ्या गणवेशातले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची  जिद्द, तंत्रज्ञान कौशल्य आणि राष्ट्राप्रती असलेली अतूट निष्ठा यांचे दर्शन या कार्यक्रमाद्वारे घडणार आहे.

***

NitinFulluke / SushamaKane / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2337801) अभ्यागत कक्ष : 36
Read this releasein: English