गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जनगणना 2027 साठी गोवा सज्ज; 16 नोव्हेंबरपासून स्व-गणना सुरू होणार

गोवा जनगणना संचालनालयाच्या संचालिका चेष्टा यादव यांचे नागरिकांना सहभागाचे आणि अचूक माहिती देण्याचे आवाहन

आमची जनगणना, आमचो विकास हे मोहिमेचे ब्रीदवाक्य

Posted On: 13 NOV 2026 2:39PM by PIB Mumbai

जनगणना 2027 च्या दुसऱ्या टप्प्याबद्दल, म्हणजेच लोकसंख्या गणना प्रक्रियेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि नागरिकांना यात सक्रिय सहभाग घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी, गोवा जनगणना संचालनालयाने आज 13 नोव्हेंबर रोजी सचिवालयामध्ये पोरवोरीम, गोवा येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

पत्रकारांशी संवाद साधताना, गोवा जनगणना संचालनालयाच्या संचालिका चेष्टा यादव यांनी राज्यातील जनगणना प्रक्रियेचे वेळापत्रक आणि त्यासंबंधीच्या विविध नियोजनांची माहिती दिली. ही पत्रकार परिषद नियोजन, सांख्यिकी आणि मूल्यमापन विभाग, जो या प्रक्रियेसाठी राज्य नोडल विभाग आहे - तसेच  पत्रसूचना कार्यालय आणि गोवा सरकारच्या माहिती व प्रसिद्धी संचालनालयाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. यावेळी जनगणना संचालनालयाच्या उपसंचालिका श्वेता नंदवाना देखील उपस्थित होत्या.

चेष्टा यादव यांनी सांगितले की, स्व-गणना प्रक्रिया 16 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत पार पडेल, तर प्रत्यक्ष लोकसंख्या गणना 1 डिसेंबर 2026 ते 4 जानेवारी 2027 या दरम्यान होईल. त्यानंतर 5 जानेवारी ते 9 जानेवारी 2027 या कालावधीत पुनरावलोकन फेरी राबवली जाईल.

गोव्यातील जनगणना 2027 साठी 5 जानेवारी 2027 रोजीची मध्यरात्र (00.00 वाजता) ही संदर्भ तारीख  निश्चित करण्यात आली आहे. गोव्यासाठीची जनगणना आकडेवारी, जेव्हा कधी जाहीर केली जाईल, ती याच संदर्भ तारखेवर आधारित असेल.

स्व-गणना सुविधेबद्दल अधिक माहिती देताना चेष्टा यादव यांनी सांगितले की, नागरिक 16 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या 15 दिवसांच्या कालावधीत अधिकृत वेबसाइट http://se.census.gov.in वर जाऊन आपल्या कुटुंबाची माहिती ऑनलाइन भरू शकतात. या सुविधेमुळे रहिवाशांना घरोघरी जाऊन होणारी प्रत्यक्ष गणना सुरू होण्यापूर्वी, कुठूनही सोयीस्करपणे आपल्या कुटुंबाचा तपशील नोंदवता येईल. जनगणेच्या काळात, जनगणना कर्मचारी घरोघरी जाऊन मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे माहिती गोळा करतील. या प्रक्रियेत लोकसंख्याशास्त्रीय, सामाजिक-आर्थिक, शैक्षणिक, भाषिक, स्थलांतर, प्रजननक्षमता आणि इतर तपशीलांशी संबंधित 40 प्रश्नांचा समावेश असेल.

जे लोक स्व-गणना पूर्ण करतील, त्यांना एक स्व-गणना आयडी  मिळेल. हा आयडी ते जनगणना कर्मचारी घरी आल्यावर त्यांना देऊ शकतात. जर संपूर्ण कुटुंब मोजणीच्या कालावधीत सुट्टीनिमित्त बाहेरगावी असेल, तर हा स्व-गणना आयडी एका कागदावर लिहून घराच्या मुख्य दरवाजावर लावता येईल. ज्यांनी स्व-गणना पूर्ण केलेली नाही, त्यांना आवश्यक ती सर्व माहिती थेट जनगणना कर्मचाऱ्याला द्यावी लागेल.

संचालक यादव यांनी जनगणना कर्मचारी आणि पर्यवेक्षकांच्या भूमिका स्पष्ट केल्या आणि नागरिकांनी अचूक व पूर्ण माहिती देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, जनगणना कायदा,1948  अंतर्गत गोळा केलेली सर्व माहिती गोपनीय ठेवली जाईल. तसेच, या कायद्यानुसार जनगणनासाठी माहिती देणे अनिवार्य आहे, याचीही त्यांनी आठवण करून दिली.

गोव्यातील जनतेला जनगणना अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करत, यादव यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना विनंती केली की, त्यांनी वर्तमानपत्रे, दूरदर्शन, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि इतर संवाद माध्यमांद्वारे जनगणनेचे वेळापत्रक आणि स्व-गणना सुविधेबाबत जनजागृती करावी.

जनगणना जनजागृती मोहीम ‘आमची जनगणना, आमचो विकास’ या घोषणेखाली राबवली जाईल. ही मोहीम राज्याच्या भविष्यासाठी विकास कार्यक्रम आखताना आणि धोरणे निश्चित करताना जनगणना डेटाचे महत्त्व अधोरेखित करते.

अधिक माहितीसाठी आणि पत्रकार परिषदेचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा:

https://drive.google.com/file/d/1703RTMwRvGSwypcB-_lerM2eQEKk93cN/view?usp=sharing &

https://drive.google.com/file/d/1kouNJUpXnOuCOFmrD_I_cL_Q0jVM2bC/view?usp=drive_link


***

Radhika Aghor / Ashutosh Save / Nikhilesh Chitre / Madhura Nerurkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2335909) अभ्यागत कक्ष : 27
Read this releasein: English