Posted On:
12 NOV 2026 4:30PM by PIB Mumbai
मुंबई, 12 नोव्हेंबर 2026
न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (एनपीसीआयएल) एनपीसी कर्मचारी क्लबतर्फे अणुऊर्जा आणि भारताच्या शाश्वत विकासातील तिची भूमिका याबाबत जनजागृती करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून 21 नोव्हेंबर 2026 रोजी पहिली दुचाकी अणुऊर्जा जनजागृती रॅली आयोजित करण्यात येणार आहे.
60 किलोमीटरच्या या रॅलीला मुंबईतील अणुशक्ती नगर येथून अणुऊर्जा विभाग (डीएई), एनपीसीआयएल आणि भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी) यांचे वरिष्ठ अधिकारी हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. विविध घटक संस्थांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही रॅली पार पडणार आहे. एनपीसीआयएलचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय या रॅलीत सहभागी होणार असून, सर्वसामान्य जनतेपर्यंत अणुऊर्जेविषयी वस्तुनिष्ठ माहिती पोहोचवण्यासाठी ते माहितीपर संदेश घेऊन जाणार आहेत. ही रॅली खोपोलीपर्यंत जाणार आहे.

अणुऊर्जेची सुरक्षितता, विश्वासार्हता, पर्यावरणीय फायदे आणि दीर्घकालीन शाश्वतता याविषयी नागरिकांना माहिती देऊन जागरूक समाज निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. वस्तुनिष्ठ माहिती आणि लोकसहभागाच्या माध्यमातून अणुऊर्जेविषयी अधिक चांगली समज निर्माण करण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न आहे.
एनपीसी कर्मचारी क्लब हे क्रीडा, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन व प्रोत्साहन देण्यासाठी तसेच एनपीसीआयएलचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून कार्यरत आहे. या क्लबने कर्मचारी कल्याणासाठीही अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. व्यापक जनसंपर्क उपक्रमांचा एक भाग म्हणून या क्लबने अणुऊर्जा आणि तिच्या विविध पैलूंबाबत जनजागृती करण्याचा संकल्प केला आहे.
एनपीसीआयएल आणि त्याच्या घटक संस्था देशभरातील लाखो भागधारकांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वसमावेशक आणि बहुआयामी जनसंपर्क कार्यक्रम राबवत आहेत. या उपक्रमांमध्ये अणुऊर्जा दालने, लघु अणुऊर्जा दालने, जिल्हा विज्ञान केंद्रांमधील अणुऊर्जा प्रकल्पांची कार्यरत प्रारूपे, प्रदर्शनांमध्ये फिरत्या प्रदर्शनांचाही समावेश, जनजागृती कक्ष, अणुऊर्जा प्रकल्पांना भेटी, व्याख्याने, परिसंवाद आणि समाजमाध्यमांवरील मोहिमा अशा कायमस्वरूपी सुविधांचा आणि विविध उपक्रमांचा समावेश आहे.
विकसित भारताच्या संकल्पनेशी सुसंगत राहून 2047 पर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जा स्थापित क्षमता साध्य करण्याचे भारताचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विज्ञानाधिष्ठित समाज हा प्रमुख आधारस्तंभांपैकी एक आहे. पहिली दुचाकी अणुऊर्जा जनजागृती रॅली हा अणुऊर्जेविषयीची सार्वजनिक समज आणि जागरूकता अधिक दृढ करण्याच्या तसेच भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणातील तिचे योगदान अधोरेखित करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
* * *
पीआयबी मुंबई | सुषमा काणे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai