कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयसीएआर-सीसीएआरआय, गोवा द्वारे ग्रामीण भागातील महिलांसाठी शास्त्रीय वराहपालन या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

Posted On: 09 NOV 2026 9:50PM by PIB Mumbai

पणजी, 9 नोव्हेंबर 2026

आयसीएआर, केंद्रीय किनारी कृषी संशोधन संस्था, गोवा यांनी 5 ते 6 नोव्हेंबर 2026 या कालावधीत शास्त्रीय वराहपालन विषयावर एका प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम एआयसीआरपी ऑन पिग अंतर्गत, गोवा राज्य ग्रामीण उपजीविका मिशन  आणि गोवा सरकारच्या ग्रामीण विकास विभागाच्या सहकार्याने राबवण्यात आला. याचा उद्देश शास्त्रीय वराहपालनाला प्रोत्साहन देणे, उद्योजकता विकसित करणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देणे हा होता.

उद्घाटन सत्रात, आयसीएआर-सीसीएआरआय, गोवाचे संचालक डॉ. परवीन कुमार यांनी, कमी खर्चातील उत्पादन तंत्रज्ञान, सुधारित व्यवस्थापन पद्धती आणि एकात्मिक कृषी  प्रणालीद्वारे वराहपालनातील आर्थिक क्षमतेवर प्रकाश टाकला.

एआयसीआरपी ऑन पिग  चे प्रधान  अन्वेषक  डॉ. अमिया रंजन साहू यांनी शेतीतील नफा वाढवण्यासाठी वैज्ञानिक प्रजनन, डुकरांच्या सुधारित जाती, शाश्वत उत्पादन पद्धतींचे महत्त्व अधोरेखित केले.

कुर्ती, फोंडा येथील स्टॉकमन ट्रेनिंग सेंटरच्या सहाय्यक संचालक डॉ. रमा परब यांनी, गोवा सरकारच्या पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा विभागांतर्गत वराहपालन व इतर पशुधन व्यवसायांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सरकारी योजना आणि अनुदानांविषयी उपस्थितांना माहिती दिली.

तांत्रिक सत्रांमध्ये डुकरांच्या विविध जाती आणि प्रजनन धोरणे, निवारा व आहार व्यवस्थापन, नवजात पिल्लांची काळजी, पुनरुत्पादन व्यवस्थापन, कृत्रिम रेतन, रोग प्रतिबंधक उपाय आणि डुक्कर-मत्स्य एकात्मिक शेती प्रणाली यांसारख्या विषयांचा समावेश होता. यामध्ये दैनंदिन शेती कामे, चारा तयार करणे, लसीकरण, वीर्य संकलन आणि कृत्रिम रेतन यांसारख्या गोष्टींचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तसेच, करमाळी येथील एका प्रस्थापित व्यावसायिक वराहपालन केंद्राला भेट देऊन, शास्त्रीय पद्धतीने डुकरांचे व्यवस्थापन कसे करावे आणि उद्योजकतेच्या संधी कशा शोधाव्यात, याचे व्यावहारिक ज्ञान उपस्थितांना मिळाले.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण महिलांचे तांत्रिक कौशल्य बळकट करणे आणि वराहपालनाला एक सक्षम उपजीविका व्यवसाय म्हणून प्रोत्साहन देणे हा होता, जेणेकरून त्यांचे उत्पन्न वाढेल आणि सामाजिक-आर्थिक सक्षमीकरण होईल. कार्यक्रमाच्या शेवटी एक संवाद सत्र आयोजित करण्यात आले आणि सहभागी महिलांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

पीआयबी मुंबई | निलीमा चितळे/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 


(Release ID: 2334493) अभ्यागत कक्ष : 17
Read this releasein: English