कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मृदा आरोग्य सुधारण्यासाठी पीक अवशेषांचे व्यवस्थापन आणि सेंद्रिय कचऱ्याच्या पुनर्वापराबाबत उत्तर गोव्यातील ICAR-कृषी विज्ञान केंद्रातर्फे प्रशिक्षण कार्यक्रम

Posted On: 09 NOV 2026 8:53PM by PIB Mumbai

पणजी, 9 नोव्हेंबर 2026

भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) अंतर्गत गोवा येथील केंद्रीय किनारी कृषी संशोधन संस्थेच्या (ICAR–CCARI) अखत्यारीतील उत्तर गोव्यातील कृषी विज्ञान केंद्रातर्फे ‘खेत बचाओ अभियान’ (KBA–रब्बी 2026) अंतर्गत पीक अवशेषांचे व्यवस्थापन आणि मृदा आरोग्य सुधारण्यासाठी सेंद्रिय कचऱ्याचा पुनर्वापर या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2026 रोजी उत्तर गोव्यातील डिचोली तालुक्यातील पिळगाव ग्रामपंचायतीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. गोवा शासनाचा कृषी संचालनालय, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (ATMA), उत्तर गोवा आणि गोवा राज्य सहकारी बँक, डिचोली यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमाचा उद्देश पीक अवशेषांचे शाश्वत व्यवस्थापन तसेच शेतातील आणि घरगुती सेंद्रिय कचऱ्याचा प्रभावी पुनर्वापर याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा होता.

उत्तर गोव्याच्या ICAR-कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ. एन. बोम्मयासामी यांनी यावेळी बोलताना, मृदा आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी पीक अवशेषांचे योग्य व्यवस्थापन आवश्यक असल्याचे सांगितले. यामुळे जमिनीची रचना सुधारण्यास, ओलावा टिकवून ठेवण्यास, पोषकद्रव्यांचे चक्र सुरळीत राहण्यास, सूक्ष्मजीवांची सक्रियता वाढण्यास आणि जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण टिकवून ठेवण्यास मदत होते, असे त्यांनी स्पष्ट केले. पीक अवशेष जाळण्याची पद्धत टाळून त्यांचा आच्छादनासाठी वापर, पशुधनासाठी अंथरूण म्हणून वापर, कंपोस्ट किंवा गांडूळखत निर्मिती, जैवकोळसा (बायोचार) तयार करणे, मशरूम उत्पादन आणि योग्यतेनुसार जमिनीत मिसळणे अशा पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. पीक अवशेषांचे प्रभावी पुनर्वापर केल्यास कृषी कचऱ्याचे मौल्यवान शेती संसाधनांमध्ये रूपांतर करता येते. तसेच बाह्य निविष्ठांवरील अवलंबित्व कमी होते, हरितगृह वायूंचे उत्सर्जन घटते आणि जमिनीची सुपीकता, कार्बन साठवणूक तसेच हवामान बदलांना तोंड देऊ शकणाऱ्या शेती पद्धतींना प्रोत्साहन मिळते, असेही त्यांनी नमूद केले.

डिचोलीचे सहाय्यक कृषी अधिकारी दत्तप्रसाद जोग यांनी शेतकऱ्यांनी शासनाच्या कृषीविषयक सेवा आणि योजनांचा प्रभावी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यामध्ये किसान क्रेडिट कार्ड (KCC) आणि मृदा आरोग्य पत्रिका (Soil Health Card) यांचा समावेश आहे. याशिवाय जीवामृत, दशपर्णी अर्क, ब्रह्मास्त्र आणि अग्निअस्त्र यांसारखी वनस्पती व सूक्ष्मजीवांवर आधारित शेतीसाठीची निविष्ठा स्थानिक पातळीवर कशी तयार करावी आणि त्यांचा योग्य वापर कसा करावा, याची माहिती त्यांनी दिली. एकात्मिक पीक आणि मृदा व्यवस्थापनाचा भाग म्हणून या निविष्ठांचा गरजेनुसार आणि योग्य प्रमाणात वापर करण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

गोवा राज्य सहकारी बँक, डिचोलीचे शाखा व्यवस्थापक दीपक एस. मलिक यांनी किसान क्रेडिट कार्ड, अटल पेन्शन योजना (APY) आणि प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान (PM-KUSUM) या योजनांचे फायदे आणि त्यासाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेची माहिती दिली. शेतकरी आणि ग्रामीण कुटुंबांसाठी उपयुक्त असलेल्या विविध योजनांची पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि आर्थिक लाभ यांची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

या प्रशिक्षण कार्यक्रमात 16 पुरुष आणि 20 महिला अशा एकूण 36 शेतकऱ्यांनी, तसेच ATMA, कृषी संचालनालय आणि गोवा राज्य सहकारी बँकेच्या सहा अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.


माधुरी पांगे/वैभवी जोशी/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 


(Release ID: 2334472) अभ्यागत कक्ष : 18
Read this releasein: English