संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सुकना येथील त्रिशक्ती कॉर्प्सला दिलेल्या भेटीदरम्यान संरक्षणमंत्र्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत सुरु असलेली पायाभूत सुविधा विकास कामे तसेच अत्याधुनिक लष्करी साधनांच्या वापराचा आढावा घेतला

Posted On: 07 NOV 2026 8:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली 07 नोव्हेंबर 2026

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज, दिनांक 07 नोव्हेंबर, 2026 रोजी पश्चिम बंगालमधील सुकना येथे तैनात त्रिशक्ती कॉर्प्सच्या परिचालनात्मक सज्जतेचा आढावा घेतला. यावेळी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत (एलएसी) सुरु असलेली पायाभूत सुविधा विकास कामे तसेच लष्कराच्या परिचालनात्मक क्षमता आणि युद्धसंबंधी परिणामकारकता सुधारण्यासाठी अत्याधुनिक लष्करी साधनांचा तसेच उदयोन्मुख तंत्रज्ञानांचा वापर याविषयी त्यांना माहिती देण्यात आली. संरक्षणमंत्र्यांनी कॉर्प्सच्या परिचालनात्मक सज्जतेबद्दल समाधान व्यक्त केले आणि स्थानिक समुदायांशी असलेले संबंध बळकट करण्याच्या उद्देशाने सीमावर्ती भागात पायाभूत सुविधा विकास तसेच समाज कल्याणविषयक उपक्रम यांच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीत कॉर्प्स देत असलेल्या योगदानाची प्रशंसा केली. यावेळी अनेक वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसह लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ; पूर्व कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ, लेफ्टनंट जनरल व्हीएमबी कृष्णन; तसेच 33 कॉर्प्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग, लेफ्टनंट जनरल मन राज सिंह मान उपस्थित होते.

त्यानंतर, दिवाळीच्या पूर्वसंध्येला आयोजित बाराखानादरम्यान उपस्थित सैनिकांना संबोधित करताना संरक्षणमंत्र्यांनी या सैनिकांचे धैर्य, व्यावसायिकता तसेच आव्हानात्मक परिचालन परिस्थितींमध्ये देशाच्या सीमांचे संरक्षण करण्याप्रती त्यांचे अढळ समर्पण यांची प्रशंसा केली. राष्ट्रीय सुरक्षेमध्ये लॉजिस्टिक्सचे महत्त्व अधोरेखित करत, त्यांनी सुकना आणि आसपासच्या प्रदेशाचे वर्णन, आघाडीवरच्या ठिकाणांपर्यंत आवश्यक वस्तूंचा पुरवठा, शस्त्रास्त्रे, अन्न, वैद्यकीय साहित्य आणि मनुष्यबळ पोहोचवण्यासाठीचे महत्त्वाचे केंद्र, असे केले. ते म्हणाले की, सुकना हा भाग पूर्व भारतातील सुरक्षा संरचनेतील महत्त्वाचा सेतू म्हणून काम करतो तर त्या भागाची भौगोलिक संवेदनशीलता अहोरात्र परिचालनात्मक सज्जतेची गरज अधोरेखित करते. ते पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार सातत्याने पुरवठा साखळ्या मजबूत करण्यासाठी आणि आघाडीवर तैनात असलेल्या सैनिकांना सर्व अत्यावश्यक साहित्य उपलब्ध होत राहील याची सुनिश्चिती करण्यासाठी सातत्याने काम करत आहे.

लष्कराच्या तुकड्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेला दुजोरा देत राजनाथ सिंह यांनी अधिकाऱ्यांना सैनिकांसोबत गुणवत्तापूर्ण काळ व्यतीत करण्याच्या सूचना केल्या. ते म्हणाले की अशा संवादांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आपलेपणाची दृढ भावना जोपासली जाईल आणि सरकार तसेच संपूर्ण देश त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा आहे असा त्यांचा आत्मविश्वास अधिक बळकट होईल.

संरक्षण दलाच्या कर्मचाऱ्यांमधील मानसिक आरोग्य आणि भावनिक स्वास्थ्याचे महत्त्व देखील संरक्षणमंत्र्यांनी अधोरेखित केले. सैनिकांना त्यांच्या कुटुंबांपासून दूर राहील्यामुळे तसेच त्यांच्या व्यावसायिक कर्तव्यांच्या मागण्यांमुळे तणाव जाणवू शकतो हे मान्य करत त्यांनी सैनिकांना त्यांच्या सहकाऱ्यांशी मोकळेपणाने संवाद साधण्यासाठी तसेच त्यांच्या भावना दडपून टाकण्यापेक्षा मदत मागण्यासाठी प्रोत्साहित केले.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांची सुरक्षा, प्रतिष्ठा तसेच कल्याणाप्रती सरकार सदैव बांधील राहील अशी ग्वाही दिली. बाराखाना हे एकजूट आणि समानतेच्या भावनेचे प्रतिबिंब आहे असे सांगून ते म्हणाले की, अशा प्रकारच्या मेळाव्यांमध्ये पद आणि श्रेणींच्या सीमा ओलांडून विविध प्रदेश, संस्कृती तसेच भाषिक पार्श्वभूमी असलेले कर्मचारी एका कुटुंबाप्रमाणे एकत्र येतात.

***

शैलेश पाटील/संजना चिटणीस/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2334054) अभ्यागत कक्ष : 10
Read this releasein: English , Urdu , Gujarati