ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनटीपीसीच्या 52 व्या स्थापना दिनानिमित्त एनटीपीसीच्या पश्चिम विभाग-1 (WR-I) मुख्यालयात उत्साहपूर्ण आणि अभिमानाचे वातावरण पाहायला मिळाले. भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील एनटीपीसीच्या पाच दशकांहून अधिक काळातील योगदानाचा गौरव यावेळी करण्यात आला.


प्रमुख पाहुणे एनटीपीसीचे अणुऊर्जा विभागाचे कार्यकारी संचालक निर्भय गुप्ता यांच्या हस्ते एनटीपीसी ध्वज फडकावून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर एनटीपीसी गीत सादर करण्यात आले.

Posted On: 07 NOV 2026 7:12PM by PIB Mumbai

उपस्थितांना संबोधित करताना गुप्ता यांनी 1975 मध्ये स्थापना झाल्यापासून एनटीपीसीने केलेल्या वाटचालीचा आणि देशाच्या ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाचा आढावा घेतला. एनटीपीसी समूहाची एकूण स्थापित वीजनिर्मिती क्षमता 91 गिगावॅटपेक्षा अधिक असल्याची माहिती त्यांनी दिली. आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या सहामाहीत एनटीपीसीच्या कोळसाधारित वीज केंद्रांनी 75.11 टक्के प्लांट लोड फॅक्टर (PLF) नोंदवला. देशातील इतर वीज केंद्रांचा हा दर 68.35 टक्के होता.

पश्चिम विभाग-1 च्या कामगिरीचा गुप्ता यांनी विशेष उल्लेख केला. आर्थिक वर्ष 2025-26 साठी निश्चित करण्यात आलेली वार्षिक कामगिरीची उद्दिष्टे साध्य करण्यात या विभागाने देशातील सर्व विभागांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. तसेच भांडवली खर्चासाठी (CAPEX) मंजूर करण्यात आलेल्या निधीचा 100 टक्क्यांहून अधिक विनियोग करण्यात विभागाला यश आल्याचे त्यांनी सांगितले.

कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (CSR) उपक्रमांच्या माध्यमातून समाजाच्या विकासासाठी विभागाने दिलेल्या योगदानावरही त्यांनी प्रकाश टाकला. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये पश्चिम विभाग-1 ने सुमारे 139 कोटी रुपयांची गुंतवणूक करून 59 सीएसआर प्रकल्प राबवले. तसेच 'गर्ल एम्पॉवरमेंट मिशन' (GEM) 2026 या उपक्रमाचा लाभ 243 मुलींना झाला. संस्थात्मक उत्कृष्टता साध्य करण्यासाठी सुरक्षितता, सचोटी, नावीन्यपूर्ण दृष्टिकोन आणि सांघिक कार्य यांचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

या सोहळ्याला एनटीपीसी पश्चिम विभाग-1 चे प्रादेशिक मनुष्यबळ विभागप्रमुख तसेच अणुऊर्जा विभागाचे महाव्यवस्थापक (एचआर) अनिल कुमार चावला यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि सखी महिला समितीच्या सदस्यांची उपस्थिती होती.

चावला यांनी आभार प्रदर्शन केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर नोएडा येथील एनर्जी ऑपरेशन सेंटर (EOC) मधून प्रसारित करण्यात आलेल्या एनटीपीसीच्या स्थापना दिन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण उपस्थितांनी पाहिले.

***

शैलेश पाटील/वैभवी जोशी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2334047) अभ्यागत कक्ष : 14
Read this releasein: English