Posted On:
06 NOV 2026 8:12PM by PIB Mumbai
गोव्याच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ई पी एफ ओ) प्रादेशिक कार्यालयाने गोव्यातील निवृत्ती वेतन योजना, 1995 (ईपीएस ‘95) अंतर्गत येणाऱ्या सर्व निवृत्ती वेतन धारकांना 1 ते 30 नोव्हेंबर दरम्यान सुरु राहणाऱ्या राष्ट्रव्यापी डीएलसी मोहीम 5.0 अंतर्गत डिजिटल हयात दाखला (जीवन प्रमाण) सादर करण्याचे आवाहन केले आहे. ही मोहीम निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतन धारक कल्याण विभाग (डी ओ पी पी डब्लू) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबवली जात आहे.
निवृत्ती वेतन धारक खालीलपैकी कोणत्याही एका पद्धतीचा वापर करून आपले डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात:
1. उमंग ॲपच्या माध्यमातून फेस ऑथेंटिकेशन : निवृत्ती वेतन धारक आपल्या स्वतःच्या स्मार्टफोनवरून, आधारशी संलग्न असलेल्या चेहरा प्रमाणीकरण सुविधेद्वारे हे प्रमाणपत्र सादर करू शकतात.
2. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आय पी पी बी) द्वारे मोफत घरपोच सेवा: निवृत्ती वेतन धारक 033-22029000 या क्रमांकावर संपर्क साधून मोफत घरपोच सेवेचा लाभ घेऊ शकतात. या सुविधेअंतर्गत, पोस्टमन किंवा ग्रामीण डाक सेवक निवृत्ती वेतन धारकांच्या घरी येऊन, आयपीपीबीच्या डोअरस्टेप बँकिंग उपकरणाद्वारे त्यांचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करतील. नोव्हेंबर 2025 मध्ये ईपीएफओ आणि आयपीपीबी यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेषतः वृद्ध, आजारी, दिव्यांग निवृत्ती वेतन धारक आणि ज्यांचे राहण्याचे ठिकाण बँक शाखा किंवा ईपीएफओ कार्यालयापासून दूर आहे, अशा लोकांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त आहे. या प्रक्रियेचा संपूर्ण खर्च ईपीएफओद्वारे उचलला जातो.
3. प्रत्यक्ष भेट देऊन प्रमाणपत्र सादर करणे: पेन्शनधारक जवळच्या ईपीएफओ कार्यालयात किंवा सामायिक सेवा केंद्रात (सी एस सी) जाऊनही आपले प्रमाणपत्र सादर करू शकतात.
ईपीएफओ प्रादेशिक कार्यालय, गोवा येथील सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त, रजनीश दीक्षित यांनी गोव्यातील सर्व ईपीएस निवृत्ती वेतन धारकांना विनंती केली आहे की, निवृत्ती वेतन मिळणे अखंडित राहावे यासाठी त्यांनी वेळेत आपले डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करावे. मोफत घरपोच सेवा आणि ॲप-आधारित पर्यायांची उपलब्धता पाहता, प्रमाणपत्र सादर करण्यासाठी कोणत्याही निवृत्ती वेतन धारकाला घराबाहेर पडून प्रवास करण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवृत्तीवेतनात खंड पडू नये म्हणून, निवृत्ती वेतन धारकांनी त्यांचे पुढील डिजिटल जीवन प्रमाणपत्र शेवटचे प्रमाणपत्र सादर केल्याच्या बरोबर एक वर्षानंतर येणाऱ्या तारखेला किंवा त्यानंतर आणि लागू असलेल्या वार्षिक जीवन प्रमाणपत्र कालावधीच्या आत सादर करणे आवश्यक आहे असाही सल्ला त्यांनी निवृत्तीवेतनधारकांना दिला आहे.
***
Sushma Kane / Sandesh Naik / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai