खाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

खाण मंत्रालयाने महत्त्वपूर्ण खनिज ब्लॉक लिलावाचा नववा टप्पा आणि अन्वेषण परवाना लिलावाचा तिसरा टप्पा सुरू केला; महत्त्वपूर्ण सुधारणांची केली घोषणा

Posted On: 05 NOV 2026 4:45PM by PIB Mumbai

खाण  मंत्रालयाने आज महत्वपूर्ण आणि धोरणात्मक खनिज ब्लॉक्सच्या ई-लिलावाचा नववा टप्पा, तसेच अन्वेषण परवाना ब्लॉक्स प्रदान करण्याच्या लिलावाचा तिसरा टप्पा सुरू केला. केंद्रीय  कोळसा आणि खाण  मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर भारत सरकारचे कोळसा आणि खाण  राज्यमंत्री सतीश चंद्र दुबे यांचीही विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाला केंद्र  सरकारचे वरिष्ठ अधिकारी, राज्य सरकारांचे प्रतिनिधी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे प्रतिनिधी आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

महत्वपूर्ण आणि धोरणात्मक खनिज ब्लॉक्सच्या लिलावाचा नववा टप्पा सुरू:

या टप्प्यात, 'खनिज (लिलाव) नियमां'च्या तरतुदींअंतर्गत  एकूण 20 महत्त्वपूर्ण आणि धोरणात्मक खनिज ब्लॉक लिलावासाठी ठेवण्यात आले आहेत. यापूर्वीच्या आठ टप्प्यांमध्ये, 100 महत्त्वपूर्ण आणि धोरणात्मक खनिज ब्लॉक लिलावासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते, ज्यापैकी  64 ब्लॉकचा  यशस्वीपणे लिलाव करण्यात आला , या यशाचे प्रमाण 64% इतके आहे.

लिलावासाठी ठेवण्यात आलेल्या ब्लॉक्सचा  तपशील:

राज्ये

ब्लॉक्सची संख्या

खनिजे

आंध्र प्रदेश

1

ग्रॅफाइट 

बिहार

1

ग्लॉकोनाइट

छत्तीसगड

5

फॉस्फोराइट-लाइमस्टोन, व्हॅनेडियम, गॅलियम, टायटॅनियम, दुर्मिळ मूलद्रव्ये (REE), बॉक्साइट, ॲल्युमिनस लॅटेराइट, ग्लौकोनाइट

मध्य प्रदेश

2

व्हॅनेडियम, गॅलियम, टायटॅनियम, बॉक्साईट, ॲल्युमिनस लॅटेराईट

महाराष्ट्र

2

दुर्मिळ मूलद्रव्ये , दुर्मिळ धातू, व्हॅनेडियम, गॅलियम, टायटॅनियम, बॉक्साईट, ॲल्युमिनस लॅटेराईट

राजस्थान

3

पोटॅश आणि हॅलाईट, टंगस्टन

तेलंगणा

 

 

3

टायटॅनियम, व्हॅनेडियम, स्कँडियम, गॅलियम, ॲल्युमिनस लॅटेराईट

पश्चिम बंगाल

 

 

 

 

3

ग्रॅफाइट, दुर्मिळ  मूलद्रव्ये (REE), दुर्मिळ धातू

प्रस्तावित खनिज ब्लॉकमध्ये धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या खनिजांचा वैविध्यपूर्ण संच समाविष्ट आहे. ही खनिजे स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान, ई-मोबिलिटी, प्रगत उत्पादन, खते, संरक्षण, एरोस्पेस, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर धोरणात्मक उद्योगांसारख्या क्षेत्रांसाठी अत्यंत महत्वपूर्ण  आहेत. यामुळे भारताची खनिज सुरक्षा अधिक बळकट होईल आणि देशाच्या ऊर्जा संक्रमणाला बळ  मिळेल.

अन्वेषण परवाना (Exploration Licence - EL) लिलावाचा तिसरा टप्पाही सुरू

नवव्या टप्प्यासोबतच, मंत्रालयाने अन्वेषण परवाना प्रदान करण्यासाठी लिलावाचा तिसरा टप्पाही सुरू केला आहे. एमएमडीआर कायद्याच्या कलम 10BA द्वारे सुरू करण्यात आलेले हे अन्वेषण परवाने, कायद्याच्या सातव्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या 29 महत्त्वपूर्ण आणि खोलवरील  खनिजांच्या शोधकार्यामध्ये खाजगी गुंतवणुक सक्षम करतात. यामुळे खाणकाम सुरू होण्यापूर्वीच खाजगी क्षेत्रासाठी अन्वेषणाची दारे खुली झाली आहेत. आतापर्यंत, दोन टप्प्यांत एकूण 11 अन्वेषण परवाना  ब्लॉक्‍सचा यशस्वी लिलाव करण्यात आला आहे.

तिसऱ्या टप्प्यांतर्गत लिलाव करण्यात येत असलेल्या अन्वेषण परवाना ब्लॉक्सचा तपशील:

राज्ये

ब्लॉक्सची संख्या

खनिजे

मध्य प्रदेश

1

  तांबे

महाराष्ट्र

1

व्हॅनेडियम

 

 

पश्चिम बंगाल

1

दुर्मिळ  मूलद्रव्ये (REE),

राजस्थान

 

4

पोटॅश आणि हॅलाईट, दुर्मिळ मूलद्रव्ये (REE) आणि संबंधित खनिजीकरण

तेलंगणा

3

दुर्मिळ मूलद्रव्ये (REE)

गुजरात

1

व्हॅनेडियम आणि संबंधित खनिजीकरण

लिलाव  प्रक्रिया सुधारण्यासाठी सुधारणा

सरकारने 16  ऑक्टोबर 2026 रोजी खनिज (लिलाव) तिसरी सुधारणा नियम, 2026 अधिसूचित केले आहेत, ज्याअंतर्गत 'भाग डी' खनिजांसाठी दुसऱ्या फेरीकरिता आवश्यक असलेल्या तांत्रिकदृष्ट्या पात्र बोलीदारांची किमान संख्या तीनवरून दोनपर्यंत कमी करण्यात आली आहे. दोन्ही टप्प्यांच्या निविदा दस्तऐवजांमध्ये समाविष्ट असलेला हा बदल, ब्लॉक्स विकले न  जाण्यामागील एका प्रमुख कारणावर भर देतो . आता आशयपत्रे  युनिफाइड मायनिंग पोर्टलद्वारे स्वयंचलितपणे जारी केली जातील. या सुधारणा, व्यवसाय सुलभता आणि गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास सुधारण्याच्या उद्देशाने केलेल्या खनिज (लिलाव) दुसरी सुधारणा नियम, 2025 आणि विमा हमीपत्रे यांसारख्या पूर्वीच्या सुधारणांवर आधारित आहेत.

दोन्ही लिलाव प्रक्रियांसाठी निविदा दस्तऐवजांची विक्री गुरुवार, 5,  नोव्हेंबर 2026 पासून सुरू झाली आहे. निविदा दस्तऐवज खरेदी करण्याची अंतिम तारीख शुक्रवार,  01, जानेवारी 2027 (भारतीय प्रमाणवेळेनुसार 17:00 वाजेपर्यंत) अशी आहे, तर निविदा (तांत्रिक निविदा आणि प्रारंभिक किंमत प्रस्ताव) सादर करण्याची अंतिम तारीख गुरुवार, 7,जानेवारी 2027  (भारतीय प्रमाणवेळेनुसार 17:00 वाजेपर्यंत) अशी आहे.

महत्त्वपूर्ण खनिज ब्लॉक्स (संयुक्त  परवाना आणि खाणकाम भाडेपट्टा) एका पारदर्शक दोन टप्प्यातील  फॉरवर्ड लिलावाद्वारे ऑनलाइन विकले जातील, ज्यात महसुलातील सर्वाधिक टक्केवारीचा वाटा देणारा बोलीदार जिंकेल. अन्वेषण परवाना ब्लॉक्स एका पारदर्शक दोन टप्प्यातील डिसेंडिंग  रिव्हर्स लिलावाद्वारे ऑनलाइन विकले जातील, ज्यात भविष्यातील भाडेपट्टेदाराच्या महसुलातील सर्वात कमी टक्केवारीचा वाटा देणारा बोलीदार जिंकेल. अधिक तपशील MSTC ई-लिलाव प्लॅटफॉर्मवर येथे उपलब्ध आहे:

https://www.mstcecommerce.com/auctionhome/mlcln/

या उपक्रमांद्वारे आणि सुधारणांद्वारे, सरकार महत्त्वपूर्ण आणि सामरिक खनिजांची देशांतर्गत उपलब्धता मजबूत करणे, खाजगी क्षेत्राच्या सहभागास प्रोत्साहन देणे, अन्वेषण आणि जबाबदार खाणकामास चालना देणे, आणि भारतात एक लवचिक, आत्मनिर्भर व जागतिक स्तरावर स्पर्धात्मक खनिज परिसंस्था निर्माण करण्याच्या दिशेने प्रयत्नांना गती देत  आहे.

***

Ambadas Yadav / Sushama Kane / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2333347) अभ्यागत कक्ष : 7