Posted On:
05 NOV 2026 6:08PM by PIB Mumbai
जनगणना 2027 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी आयोजित करण्यात आलेला चार दिवसांचा निवासी प्रशिक्षण कार्यक्रम आज पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) इथे संपन्न झाला. महाराष्ट्रातल्या सहा महसूल विभागांमधले एकूण 120 मुख्य प्रशिक्षक आणि महाराष्ट्र जनगणना संचालनालयाचे 28 अधिकारी या प्रशिक्षणात सहभागी झाले होते. प्रत्येकी दोन तुकड्यांच्या दोन सत्रांमध्ये हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. पहिले सत्र 28 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत झाले, त्यात पहिली आणि दुसरी तुकडी सहभागी झाली. दुसरे सत्र 2 ते 5 नोव्हेंबर 2026 या कालावधीत झाले, त्यात तिसरी आणि चौथी तुकडी सहभागी झाली.

महाराष्ट्र शासनाकडून नामनिर्देशित करण्यात आलेल्या मुख्य प्रशिक्षकांची निवड राज्याचे जनगणना नोडल अधिकारी तसेच शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे प्रधान सचिव यांनी केली होती. यामध्ये महसूल प्रशासन, महानगरपालिका आणि नगरपालिका, शिक्षण व प्रशिक्षण संस्था तसेच तांत्रिक संस्थांमधल्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. महाराष्ट्र जनगणना संचालनालयाच्या राष्ट्रीय प्रशिक्षकांनी या मुख्य प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले.
या प्रशिक्षणात सैद्धांतिक माहिती, प्रात्यक्षिके आणि सराव यांचा समावेश होता. जनगणनेच्या संकल्पना, जनगणनेतील प्रश्न क्रमांक 1 ते 40, जनगणनेसाठीचे मोबाइल ॲप, स्व-गणना आणि गणना गटांच्या रचनेचे नकाशे या विषयांचा त्यात समावेश होता. सूक्ष्म अध्यापन, ‘प्रमाण’ कार्यचौकटीवर आधारित भूमिकाभिनय आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटीद्वारे माहिती संकलन यांचाही सराव प्रशिक्षणार्थींनी केला.
प्रशिक्षणार्थींना संबोधित करताना भारत सरकारच्या संयुक्त सचिव तथा महाराष्ट्राच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा जे. डांगे यांनी आगामी जनगणनेत मुख्य प्रशिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले. प्रत्यक्ष क्षेत्रीय कामकाज पूर्ण होईपर्यंत प्रशासकीय आणि तांत्रिक सहाय्य सुरू राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या, “जनगणनेचा पहिला टप्पा म्हणजेच ‘घरांची यादी आणि घरगणना’ हा संपूर्ण राज्यात अत्यंत यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. आता दुसरा टप्पा म्हणजे ‘लोकसंख्या गणना’ सुरू होणार आहे. या टप्प्यात नागरिकांची प्रत्यक्ष माहिती संकलित केली जाणार आहे. मुख्य प्रशिक्षकांची जबाबदारी केवळ वर्गात प्रशिक्षण देण्यापुरती मर्यादित नाही. फेरतपासणी फेरीच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्रत्यक्ष क्षेत्रीय कामकाजाला सहाय्य करत त्यांनी संपूर्ण प्रक्रियेशी सातत्याने जोडलेले राहणे आवश्यक आहे.”
की, प्रशिक्षित मुख्य प्रशिक्षक राज्यभरातल्या क्षेत्रीय प्रशिक्षकांना मार्गदर्शन करतील असे डांगे यांनी सांगितले. हे क्षेत्रीय प्रशिक्षक पुढे घरोघरी जाऊन माहिती संकलित करणाऱ्या सुमारे 2.82 लाख कर्मचाऱ्यांना, म्हणजेच प्रगणक आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षण आणि सहाय्य देतील.
मुख्य प्रशिक्षकांची प्रमुख पर्यवेक्षकीय जबाबदारी म्हणजे क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना भक्कम सहाय्य पुरवणे, मोबाइल ॲप वापरताना येणाऱ्या अडचणी सोडवणे, त्यांच्या शंकांचे निरसन करणे आणि ‘प्रमाण’ या कार्यसंस्कृतीचे पालन करून प्रगणकांनी अचूक आणि त्रुटीविरहित माहिती नोंदवली जाईल याची खातरजमा करणे, यावरही महाराष्ट्राच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकाऱ्यांनी भर दिला.
केंद्र सरकारने 30 ऑक्टोबर 2026 रोजी जारी केलेल्या एस.ओ. 5913(ई) या अधिसूचनेनुसार, जनगणना 2027 च्या दुसऱ्या टप्प्यातली लोकसंख्या गणना महाराष्ट्रात 25 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2027 या कालावधीत होणार आहे. त्यानंतर 1 ते 5 मार्च 2027 या कालावधीत फेरतपासणी फेरी आयोजित केली जाईल. घरोघरी जाऊन गणना सुरू होण्यापूर्वी 10 ते 24 जानेवारी 2027 या कालावधीत स्व-गणना प्रक्रिया पार पडेल. या जनगणनेसाठीची संदर्भ वेळ 1 मार्च 2027 रोजी मध्यरात्री 12 वाजता निश्चित करण्यात आली आहे.
***
Nitin Fulluke / Nikhilesh Chitre / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai