Posted On:
05 NOV 2026 4:26PM by PIB Mumbai
प्राणिजन्य आजारांविरोधात भारताची देखरेख आणि सज्जता अधिक मजबूत करण्यासाठी राजीव गांधी प्राणीसंग्रहालय आणि वन्यजीव संशोधन केंद्र (पुणे), भारती विद्यापीठ (डीयू) मेडिकल कॉलेज (पुणे), आयसीएमआर-राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर वन हेल्थ, नागपूर आणि इतर भागीदार संस्थांद्वारे नुकतेच संयुक्तपणे एका कार्यशाळेचे येथे आयोजन करण्यात आले.
प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांमध्ये प्राणिजन्य आजारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यावर या कार्यशाळेत भर देण्यात आला, तसेच 05 नोव्हेंबर 2026 रोजी भारती विद्यापीठ (डीयू) मेडिकल कॉलेज, पुणे येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. 'राष्ट्रीय वन हेल्थ मिशन' अंतर्गत निधी प्राप्त झालेला हा उपक्रम भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) अंतर्गत "भारतातील निवडक प्राणीसंग्रहालयांमध्ये मानव आणि प्राणी यांच्यात सर्वाधिक संपर्क होत असलेल्या वातावरणात वन हेल्थ संरक्षक देखरेख प्रणाली स्थापन करणे" या नावाचा पहिलाच देशव्यापी अभ्यास आहे.

सहभागींचे स्वागत करताना, पुण्याच्या भारती विद्यापीठ (डीयू) मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. मंदार करमरकर यांनी या कार्यशाळेसाठी विविध संस्थांमधील भागधारकांना एकत्र आणण्याच्या आणि 'वन हेल्थ' सर्वेक्षणासाठी सहकार्यात्मक दृष्टिकोन बळकट करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला.
'वन हेल्थ' या संकल्पनेचा उगम आणि महत्त्व याविषयी बोलताना भारती विद्यापीठ (डीयू) च्या 'इंटरॲक्टिव्ह रिसर्च स्कूल फॉर हेल्थ अफेअर्स' (IRSHA) चे संचालक तसेच आयसीएमआर-एनआयव्हीचे माजी संचालक डॉ.ए.सी. मिश्रा यांनी प्राणीसंग्रहालयाचे एक परिसंस्था म्हणून महत्त्व अधोरेखित केले. प्राणीसंग्रहालय ही स्वतःच एक अशी परिसंस्था आहे जिथे मानवी, प्राणिजन्य आणि पर्यावरणीय आरोग्य एकत्र येते; ज्यामुळे प्राण्यांकडून मानवामध्ये संक्रमित होणाऱ्या आजारांचे धोके समजून घेण्यासाठी आणि त्यांचे निवारण करण्यासाठी ते एक महत्त्वाचे ठिकाण ठरते, असे त्यांनी सांगितले.
_20261105162921_fbfc01.jpeg)
सक्रिय पद्धतीने रोगावरील देखरेख मजबूत करणे, प्राण्यांकडून मानवामध्ये संक्रमित होणाऱ्या संभाव्य संसर्गाचा इशारा आधीपासूनच देण्याची व्यवस्था भक्कम करणे, आजाराच्या उद्रेकाला समन्वित पद्धतीने तोंड देणे आणि प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांमध्ये प्रचलित असलेल्या आजारांचा पद्धतशीर डेटा तयार करून संभाव्य व्यावसायिक आरोग्य धोके ओळखणे हा या अभ्यासाचा उद्देश आहे.
राजीव गांधी प्राणीसंग्रहालय आणि वन्यजीव संशोधन केंद्र (पुणे) चे संचालक डॉ. राजकुमार जाधव यांनी वन्यजीव संवर्धनात प्राणीसंग्रहालयांच्या महत्त्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला आणि या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीस सहकार्य करण्याच्या प्राणीसंग्रहालयाच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला.

सर्वेक्षणात सक्रिय सहभागाच्या महत्त्वावर भर देत, आयसीएमआर-एनआयव्ही (पुणे) च्या वैज्ञानिक-(ई) डॉ. राजलक्ष्मी विश्वनाथन यांनी कार्यशाळेतील सहभागाबद्दल प्राणीसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले आणि या प्रकल्पांतर्गत सर्वेक्षण उपक्रमांसाठी आयसीएमआर-एनआयव्ही (पुणे) कडून निरंतर सहकार्याचे आश्वासन दिले.
तांत्रिक सत्रांमध्ये प्राणिजन्य आजारांचे धोके आणि 'वन हेल्थ' दृष्टिकोन समाविष्ट होता. एनआयओएच (नागपूर) चे वैज्ञानिक-(डी) आणि मुख्य संशोधक डॉ. दीपक वाय. पाटील यांनी "वन हेल्थ अँड झुनोसिस: व्हाय झू वर्कर्स आर ऑन द फ्रंट लाईन?" या विषयावर आपले विचार व्यक्त केले; तर एनआयओएच (नागपूर) चे वैज्ञानिक-सी डॉ. सतीश गायकवाड यांनी 'वन हेल्थ झू सर्व्हेलन्स प्रोजेक्ट'ची ओळख करून दिली. भारती विद्यापीठ (डीयू) मेडिकल कॉलेजच्या मुख्य संशोधक डॉ. सोनाली पालकर यांनी लक्षण-आधारित सर्वेक्षण आणि लक्षणांची स्वतःची माहिती वेळेवर देणे यावर एक परस्परसंवादात्मक सत्र घेतले. तसेच डॉ. राजलक्ष्मी विश्वनाथन यांनी 'वन हेल्थ' सर्वेक्षणातील प्रयोगशाळा तपासणीवर भाष्य करताना नैतिक आणि जबाबदार नमुना संकलनाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला.
या एकात्मिक सर्वेक्षण दृष्टिकोनामुळे पुराव्यावर आधारित रोग प्रतिबंध आणि वेळेवर दिलेल्या प्रतिसादाद्वारे नवीन उद्भवणाऱ्या प्राणिजन्य व इतर सार्वजनिक आरोग्य धोक्यांविरोधात भारताची सज्जता मजबूत होईल, तसेच वन्यजीव आरोग्य आणि जैवविविधता संवर्धनात योगदान मिळेल अशी अपेक्षा आहे.
***
Nitin Fulluke / Shailesh Patil / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai