Posted On:
05 NOV 2026 3:55PM by PIB Mumbai
क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या 'मेरा युवा भारत' पुणे च्या वतीने 30 ऑक्टोबर 2026 रोजी आबासाहेब गरवारे महाविद्यालयात 'नो युवर वोट’ या विषयावर 'युवा संवाद'चे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचा उद्देश तरुणांमध्ये मतदानाचे महत्त्व, निवडणूक प्रक्रियेतील सहभाग आणि लोकशाही प्रक्रिया बळकट करण्यात त्यांची भूमिका यांविषयी जागरूकता निर्माण करणे हा होता. या कार्यक्रमात 150 हून अधिक विद्यार्थी आणि तरुण नागरिक सहभागी झाले होते.

26 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2026 या कालावधीत देशभरातील 500 विद्यापीठे, महाविद्यालये आणि संस्थांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या 'विकसित भारत युवा संवाद' या उपक्रमाचाच हा एक भाग होता. या कार्यक्रमाला 'युथ आयकॉन' सृष्टी जगताप यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीमुळे सार्वजनिक नेतृत्व आणि युवकांच्या आकांक्षा या विषयांवर विविध दृष्टिकोन समोर आले.
आबासाहेब गरवारे महाविद्यालयात युवकांना संबोधित करताना, 'माय भारत' पुणेचे जिल्हा युवा अधिकारी आशिष शेटे यांनी राष्ट्र उभारणीतील युवकांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले आणि विद्यार्थ्यांना 'विकसित भारत'च्या ध्येयासाठी सक्रिय योगदान देण्यास प्रोत्साहित केले. विद्यार्थी आणि 'युथ आयकॉन' सृष्टी जगताप यांच्यातील परस्पर संवाद हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. युवा सहभागींना आपली मते मांडण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी आणि भारताचे भविष्य घडवण्यात आपली भूमिका काय असावी, यावर चर्चा करण्यासाठी यामुळे एक व्यासपीठ उपलब्ध झाले.

सहभागी विद्यार्थ्यांनी प्रशासनातील युवकांचा सहभाग, नागरिकांची जबाबदारी आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांची भूमिका या विषयांवर प्रश्न विचारले आणि आपली मते मांडली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना, युथ आयकॉन सृष्टी जगताप यांनी तरुणांना त्यांचे लोकशाही अधिकार जबाबदारीने बजावण्याचे, सार्वजनिक घडामोडींबाबत जागरूक राहण्याचे आणि राष्ट्र उभारणीत सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले.
लोकतांत्रिक प्रतिज्ञेने कार्यक्रमाची सांगता झाली; याद्वारे उपस्थितांनी लोकशाही मूल्ये, सजग सहभाग आणि जबाबदार नागरिकत्वाप्रती आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे प्राचार्य डॉ. विलास उगले यांनी आभार प्रदर्शन केले. 'युवा संवाद' उपक्रमाद्वारे तरुणांना लोकशाही संस्थांशी अधिक जवळून जोडले जात असून याचा उद्देश अशी पिढी घडवणे हा आहे, जी केवळ देशाच्या प्रगतीबद्दल जागरूकच नसेल, तर त्यात सक्रिय योगदानही देईल. हा उपक्रम 'युवा शक्ती'ला राष्ट्र- निर्मितीच्या केंद्रस्थानी ठेवतो आणि युवा नागरिकांना त्यांच्या कल्पना, आकांक्षा व जबाबदारीच्या भावनेचे रूपांतर 'विकसित भारत @ 2047च्या दिशेने अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी प्रोत्साहित करतो.
***
Nitin Fulluke / Sushma Kane / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai