युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘एक देश, एक निवडणूक’ या विषयावर गोव्यात माय भारततर्फे युवा संसद आयोजित, 300 विद्यार्थ्यांचा सहभाग

Posted On: 04 NOV 2026 9:05PM by PIB Mumbai

गोवा, 4 नोव्‍हेंबर 2026

 

भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयांतर्गत मेरा युवा भारत (माय भारत), गोवा यांच्यातर्फे आज बांबोळी येथील इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनमध्ये ‘एक देश, एक निवडणूक’ या विषयावर विकसित भारत युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे हे या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी लोकशाही प्रक्रियेत युवकांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच, विद्यार्थ्यांनी लोकशाही संस्था, निवडणूक सुधारणा आणि जागरूक नागरिक म्हणून आपल्या जबाबदाऱ्या समजून घेण्याचे आवाहन केले.

इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनचे प्राचार्य डॉ. विल्सन एन. फर्नांडिस यांनीही सहभागी विद्यार्थ्यांना संबोधित केले आणि या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी ज्ञान, आत्मविश्वास आणि नेतृत्व कौशल्ये वाढवण्यासाठी अशा व्यासपीठांचा सर्वोत्तम उपयोग करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

माय भारत, उत्तर गोवा येथील जिल्हा युवा अधिकारी सम्यक मेश्राम यांनी माय भारतची दृष्टी आणि उद्दिष्टे अधोरेखित केली. विशेषतः युवकांचा सहभाग, नेतृत्व विकास आणि राष्ट्रनिर्मिती यांसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.

श्रीमती दान यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

वादविवाद स्पर्धेचे परीक्षण पाच सदस्यांच्या परीक्षक मंडळाने केले. या मंडळात सरकारी पॉलिटेक्निकचे निवृत्त विभागप्रमुख आत्माराम व्ही. गावकर, दामोदर कॉलेज ऑफ कॉमर्सच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. सोन्या अँगल, कार्मेल कॉलेज, नुवेम येथील अर्थशास्त्राच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. ग्लेनिस मेंडोंका, गोवा कॉलेज ऑफ आर्टचे निवृत्त प्राचार्य विल्फ्रेड गोएस आणि इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन, बांबोळी येथील प्राध्यापक मार्ले डी जीझस यांचा समावेश होता.

मनुएला हिने प्रथम क्रमांक पटकावला. स्वानंदी चारी हिने द्वितीय, तर शर्मत गोलिएकर हिने तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.

विजेते आता राज्यस्तरीय विकसित भारत युवा संसद स्पर्धेत सहभागी होतील. या स्पर्धेत निवड झालेल्या सहभागींना नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

या कार्यक्रमाने सहभागी तरुणांना निवडणूक सुधारणांवरील आपले विचार मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्याचबरोबर लोकशाहीविषयक जागरूकता, चिकित्सक विचार, वक्तृत्व आणि नेतृत्वगुणांना प्रोत्साहन मिळाले.

या कार्यक्रमात सुमारे 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

 

* * *

पीआयबी मुंबई | माधुरी पांगे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2332807) अभ्यागत कक्ष : 7
Read this releasein: English