माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'नक्षलमुक्त भारत' या विषयावर नागपूरच्या पत्र सूचना कार्यालयाकडून गडचिरोलीत 'वार्तालाप' या संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन; सुरक्षा, विकास आणि समुदायांना सहभागी करून घेण्यावर भर


सुरक्षा मोहिमा, विकासाचे उपक्रम आणि पुनर्वसन हीच नक्षलमुक्त भारताच्या निर्मितीची गुरुकिल्ली: संदीप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र

Posted On: 04 NOV 2026 8:27PM by PIB Mumbai

नागपूर/गडचिरोली, 4 नोव्‍हेंबर 2026

 

नागपूरच्या पत्र सूचना कार्यालयाने (पीआयबी) गडचिरोली पोलिसांच्या सहकार्याने 4 नोव्हेंबर 2026 रोजी गडचिरोली येथील पोलीस मुख्यालयातील एकलव्य सभागृहात "नक्षलमुक्त भारत" या संकल्पनेवर आधारित एकदिवसीय 'वार्तालाप' या प्रसार माध्यम कार्यशाळेचे आयोजन केले. या कार्यशाळेत गडचिरोली जिल्ह्यातील अनेक पत्रकार सहभागी झाले होते. या प्रसंगी वरिष्ठ पोलीस अधिकारी, विषय तज्ज्ञ आणि माध्यम प्रतिनिधी एकत्र आले आणि त्यांनी या भागातील बदलती सुरक्षा व विकासाची परिस्थिती तसेच नक्षलवादाचा (डाव्या कट्टरवादी विचारसरणीचा) सामना करण्यासाठी देशात सुरू असलेल्या प्रयत्नांवर विचारमंथन केले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने झाली, त्यानंतर नागपूर पत्र सूचना कार्यालयाचे माध्यम व संप्रेषण अधिकारी  सौरभ खेकडे यांनी प्रास्ताविक केले. शासन आणि माध्यम यांच्यातील संवादाचे व्यासपीठ म्हणून 'वार्तालाप'चे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी शासकीय उपक्रम आणि क्षेत्रातील विकासाची अचूक माहिती पोहोचवण्यात प्रादेशिक पत्रकारांच्या भूमिकेवर भर दिला.

नक्षलविरोधी अभियान (ANO), नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी उपस्थितांना आभासी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. 'शहरी नक्षलवाद' आणि त्याचे व्यापक परिणाम या विषयावर त्यांनी माहिती दिली.  सातत्यपूर्ण प्रयत्न, दृढ निर्धाराने राबवलेल्या सुरक्षा मोहिमा आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या अनेक कारवायांच्या माध्यमातून गडचिरोलीचा माओवादग्रस्त भागापासून नक्षलमुक्त जिल्हा म्हणून कसा कायापालट झाला, यावर त्यांनी प्रकाश टाकला. सुरक्षा दले, प्रभावी पोलीस व्यवस्था आणि विकास उपक्रम यांचा समावेश असलेला समन्वयी दृष्टिकोन कशा प्रकारे शाश्वत बदल घडवून आणू शकतो हे गडचिरोलीचा हा प्रवास दर्शवत आहे, असे ते म्हणाले. नक्षलमुक्त भारताच्या राष्ट्रीय प्रयत्नांमध्ये गडचिरोली आता एक आदर्श उदाहरण कसे ठरत आहे, हे देखील त्यांनी अधोरेखित केले.

संघटित माओवादी जाळ्यामुळे घटनात्मक लोकशाहीसमोर निर्माण होणाऱ्या आव्हानांना त्यांनी अधोरेखित केले आणि दुर्गम भागातील सशस्त्र कारवायांच्या पलीकडे माओवादी चळवळ कशा प्रकारे विस्तारलेली आहे हे स्पष्ट केले.

संघटनात्मक रचना, वैचारिक प्रभाव आणि संघर्षग्रस्त भागांच्या पलीकडे कार्यरत असलेल्या जाळ्यासह माओवादी आव्हानाच्या व्यापक आयामांवर त्यांनी चर्चा केली. विकास आणि सार्वजनिक जनजागृतीसोबत सुरक्षेच्या उपायांची सांगड घालणाऱ्या सर्वसमावेशक दृष्टिकोनातून या आव्हानाला तोंड देण्याच्या महत्त्वावरही त्यांनी भर दिला.

पाटील यांनी अधोरेखित केले की नक्षलवाद किंवा डाव्या विचारसरणीच्या कट्टरतावादाला दिले जाणारे उत्तर केवळ सुरक्षा मोहिमांपुरते मर्यादित असता कामा नये. त्यासाठी लोकशाही संस्था बळकट करणे, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे आणि सरकारी कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणेही तितकेच आवश्यक आहे. भारताच्या कल्याणाचा आणि परिवर्तनाचा खरा मार्ग हा देशाच्या संविधानातूनच जातो, असे नमूद करून त्यांनी आपले हे विचार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित केले.

धोरण विश्लेषक पी. वाय. रमणा यांनी 'माओवादी अर्थशास्त्र' या विषयावर सत्र घेतले. यामध्ये त्यांनी डाव्या कट्टरतावादाचे आर्थिक पैलू आणि त्याचा स्थानिक साधनसंपत्ती आणि आर्थिक उपक्रमांशी असलेला संबंध स्पष्ट केला. या चर्चेत खनिज संपत्ती, स्थानिक आर्थिक संरचना आणि माओवादी उपक्रमांशी जोडलेली आर्थिक जाळी यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

अशा उपक्रमांचा स्थानिक समुदाय आणि विकासावर होणारा परिणाम तपासतानाच, या संघर्षाचे आर्थिक पैलू समजून घेण्याचे महत्त्वही त्यांनी विशद केले. नक्षलवादाच्या आर्थिक पैलूंवर माहितीपूर्ण आणि संतुलित माध्यम वृत्तांकनाची गरज या सत्रात अधोरेखित करण्यात आली.

गडचिरोलीचा नक्षलवादाविरुद्धचा लढा आणि प्रवास

कार्यात्मक आढावा सादर करताना गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्याने केलेल्या प्रयत्नांचा आणि गेल्या काही वर्षांत बदललेल्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. सातत्याने राबवलेल्या सुरक्षा मोहिमा, अधिक प्रभावी गुप्तवार्ता संकलन आणि समन्वयाने केलेल्या कारवायांमुळे माओवादी कारवायांवर नियंत्रण मिळवण्यात आलेल्या प्रगतीची त्यांनी माहिती दिली. माओवादी कार्यकर्त्यांच्या फळीविरुद्ध राबवलेल्या मोठ्या मोहिमा आणि आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांची वाढती संख्या यांसारख्या अलीकडच्या काळातील महत्त्वपूर्ण घडामोडींचाही त्यांनी उल्लेख केला.

जिल्ह्यातील बदलत्या सुरक्षा परिस्थितीचे महत्त्व आणि सुरक्षा दलांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे झालेली प्रगती त्यांनी अधोरेखित केली. माओवादी संघटनांमध्ये नव्याने होणारी भर्ती रोखणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आत्मसमर्पण करून समाजाच्या मुख्य प्रवाहात परतण्यास प्रोत्साहित करणे, यावरही भर देण्यात आला.

कार्यवाहीविषयक चर्चेत बंडखोरीविरोधी कारवाईची क्षमता, आंतरराज्यीय समन्वय, सुरक्षा पायाभूत सुविधांचे बळकटीकरण तसेच गुप्तवार्ता आणि पाळत ठेवण्याच्या यंत्रणांमध्ये सुधारणा करण्याचे महत्त्व यांचा समावेश होता. माओवादी कारवायांना आळा घालण्यासाठी ‘सी-60’ सारख्या विशेष सुरक्षा दलांची भूमिका यावरही चर्चा झाली.

वरिष्ठ पत्रकार कार्तिक लोखंडे यांनी डाव्या विचारसरणीनंतरच्या परिस्थितीवर भाष्य करताना डाव्या कट्टरपंथी चळवळीच्या प्रभावित क्षेत्रांमधील बदलत्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली. अशा भागांमध्ये होत असलेल्या बदलांचे दस्तऐवजीकरण करणे आणि तिथे विकासाच्या अनुषंगाने होत असलेले बदल तसेच प्रत्यक्ष जमिनीवरचे वास्तव लोकांसमोर आणणे अत्यंत महत्त्वाचे असल्याची बाब या सत्रातील चर्चांमधून अधोरेखित झाली.

भारतीय पोलीस सेवेचे अधिकारी (आयपीएस) आणि नागपूर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक योगेश कुमार यांनी आभार प्रदर्शन केले. नक्षलग्रस्त जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोलीचे एक नक्षलमुक्त जिल्हा बनण्याच्या दिशेने कशा रितीने परिवर्तन झाले, या बाबतचे गेल्या एका दशकापेक्षा जास्त काळापासूनचे स्वानुभव त्यांनी मांडले. शासन आणि समाजाच्या मुख्य प्रवाहाबद्दल स्थानिक लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे हेच या संपूर्ण वाटचालीतले सर्वांत मोठे यश असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.  गडचिरोली नक्षलमुक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचे आणि कमांडोंचे समर्पण, शौर्य आणि सर्वोच्च बलिदानाचा गौरवपूर्ण उल्लेखही त्यांनी केला. व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कायम राखण्यालाच आपले सर्वोच्च प्राधान्य असेल अशी ग्वाही त्यांनी दिली.

या कार्यक्रमाला गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक (कार्यान्वयन) कार्तिक मधिरा आणि अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुळ राज जी. यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी विशेषत्वाने उपस्थित होते.

बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचे वृत्तांकन करणे तसेच, सुरक्षाविषयक कारवायांचा झालेला परिणाम आणि बाधित समुदायांचे पुनर्वसन या विषयांच्या बाबतीतील स्थानिक माध्यमांची जबाबदारी या विषयावर या वार्तालाप कार्यशाळेत भर देण्यात आला.  यासोबतच या भागातील आव्हाने आणि होत असलेली प्रगती अशा दोन्ही बाजू मांडणारे संतुलित तसेच तथ्यांवर आधारित वृत्तांकन करण्याची गरजही या कार्यशाळेतून अधोरेखित करण्यात आली.

वार्तालाप या कार्यशाळेच्या माध्यमातून पत्रकारांना नक्षलमुक्त भारत या उपक्रमाशी संबंधित सुरक्षा, आर्थिक आणि विकासात्मक पैलुंच्या मुद्यांवर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि विषय तज्ञांशी संवाद साधण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले होते. दीर्घकालीन शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरक्षा, प्रशासन, पायाभूत सुविधांचा विकास, कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी, पुनर्वसन आणि लोकसहभाग यांचा अंतर्भाव असलेल्या सर्वसमावेषक  दृष्टिकोनाचे महत्त्व या कार्यशाळेच्या निमित्ताने अधोरेखित झाले. या उपक्रमाच्या माध्यमातून  माध्यम प्रतिनिधींना शासकीय धोरणे, कार्यक्रम आणि यश याबद्दलची माहिती पोहोचवण्यात पत्र सूचना कार्यालयाची (PIB) भूमिका काय असते, याबद्दलही समजून घेता आले. यासोबतच माहितीपूर्ण, अचूक आणि जबाबदार वृत्तांकनाचे महत्त्वही या कार्यशाळेतून अधोरेखित केले गेले. सहभागी झालेल्या पत्रकारांचा अभिप्राय आणि त्यांच्याशी झालेल्या संवादाने कार्यशाळेची सांगता झाली. 

 

* * *

पीआयबी मुंबई | माधुरी पांगे/राधिका अघोर/शैलेश पाटील/आशुतोष सावे/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2332781) अभ्यागत कक्ष : 15
Read this releasein: English