माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नागपूर इथल्या ​पत्र सूचना कार्यालयाच्या वतीने​गडचिरोलीत नक्षलमुक्त भारत या विषयावर उद्या वार्तालाप

Posted On: 03 NOV 2026 7:53PM by PIB Mumbai

नागपूर, 3 नोव्‍हेंबर 2026

 

नागपूर इथल्या ​पत्र सूचना कार्यालयाच्या (पीआयबी) वतीने गडचिरोली पोलिसांच्या सहकार्याने गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांसाठी 04 नोव्हेंबर 2026 रोजी वार्तालाप या माध्यम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. गडचिरोलीतील पोलीस मुख्यालयाच्या एकलव्य सभागृहात ही कार्यशाळा होईल. नक्षलमुक्त भारत ही या कार्यशाळेची मुख्य संकल्पना आहे.

​गडचिरोली पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि जिल्ह्यातील इतर प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या उद्घाटन सत्र होईल.

​नक्षलमुक्त भारताच्या जडणघडणीसाठी केंद्र सरकार करत असलेले असलेले प्रयत्न, डाव्या कट्टरतावादाच्या आव्हानाचा बिमोड  करताना झालेली प्रगती आणि नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी राबवले जात असलेले उपक्रम याविषयी माध्यम प्रतिनिधींमध्ये जाणिवा निर्माण करणे, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे. यासोबतच अचूक माहिती पोहोचवणे, चुकीच्या माहितीचे खंडन करणे आणि या भागातील विकासकामे तसेच संधींबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या प्रक्रियेत स्थानिक माध्यमांची भूमिका कशी महत्वाची असते ही बाबही कार्यशाळेतून अधोरेखित केली जाणार आहे.

​या कार्यशाळेअंतर्गत होणार असलेल्या तांत्रिक सत्रांमध्ये नक्षलमुक्त भारत उपक्रमाच्या विविध पैलूंवर भर दिला जाणार आहे. यात सुरक्षाविषयक उपाययोजना, विकासाच्या अनुषंगाने केल्या जात असलेल्या उपाययोजना, समर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचे पुनर्वसन, पायाभूत सुविधांचा विकास, कल्याणकारी योजना आणि प्रभावित भागांचा सामाजिक आर्थिक कायापालट या मुद्यांचा समावेश असेल.

या कार्यक्रमाअंतर्गत शासकीय धोरणे, कार्यक्रम, उपक्रम आणि यशाबद्दल मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांपर्यंत माहिती पोहोचवण्यात पत्र सूचना कार्यालयाची भूमिका, पत्रकार कल्याण विषयक योजना आणि पीआयबी फॅक्ट चेक या विषयावरील एका विशेष सत्राचेही ​आयोजन करण्यात आले आहे.

​मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यम जगतातील प्रतिनिधींच्या अनुषंगानेच या वार्तालाप कार्यशाळेची आखणी केली गेली आहे. या माध्यम कार्यशाळेच्या माध्यमातून पत्रकारांमधील परस्पर संवाद, ज्ञानाची देवाणघेवाण आणि क्षमता बांधणीला चालना मिळेल. हा कार्यक्रमामुळे माध्यम प्रतिनिधींना विषय तज्ञ आणि शासकीय अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यामुळे नक्षलमुक्त भारताच्या जडणघडणीसाठी होत असलेल्या  प्रयत्नांबद्दल माहितीपूर्ण, अचूक आणि जबाबदारपूर्वक वार्तांकनाला अधिक बळ मिळू शकणार आहे.

 

* * *

पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2332253) अभ्यागत कक्ष : 25
Read this releasein: English