अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

प्रकल्पातील अवशेषांमधून कोबाल्ट आणि निकेलच्या पुनर्निर्मितीसाठी बीएआरसी, एचडब्ल्यूबी आणि एमआयडीएचएएनआय यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी

Posted On: 03 NOV 2026 6:10PM by PIB Mumbai

मुंबई, 3 नोव्‍हेंबर 2026

 

अणुऊर्जा विभागाच्या (डीएई) हेवी वॉटर बोर्ड (एचडब्ल्यूबी) ने अणुऊर्जा विभागाच्या भाभा अणु संशोधन केंद्र (बीएआरसी), मुंबई आणि संरक्षण मंत्रालयाच्या मिश्र धातू निगम लिमिटेड (एमआयडीएचएएनआय), हैदराबाद बरोबर प्लांटमधील (प्रकल्पातील) अवशेषांमधून कोबाल्ट आणि निकेलची पुनर्प्राप्ती आणि उत्पादनात सहकार्य करण्याबाबतच्या एक त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

प्लांटमधील पुनर्प्राप्त करण्यायोग्य अवशेषातून मौल्यवान कोबाल्ट आणि निकेल मिळवण्यासाठी कार्यक्षम आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य प्रक्रिया विकसित करणे, हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट असून, यामुळे या धातूंचा औद्योगिक आणि धोरणात्मक प्रयोगासाठी पुन्हा वापर करता येईल. या सहयोगामुळे एचडब्ल्यूबीचे तांत्रिक कौशल्य, बीएआरसीची वैज्ञानिक आणि संशोधन क्षमता आणि एमआयडीएचएएनआय चा औद्योगिक अनुभव यांची सांगड घालून योग्य प्रक्रिया विकसित केल्या जातील आणि दुय्यम संसाधनांच्या कार्यक्षम वापराला प्रोत्साहन मिळेल.

https://indianmasterminds.com/wp-content/uploads/2026/10/mou-6.jpg

कोबाल्ट आणि निकेल हे अत्यंत महत्त्वाचे धातू आहेत, ज्यांचा वापर प्रगत बॅटरी तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही), स्टेनलेस स्टील उत्पादन, एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्र आणि उच्च-कार्यक्षमता असलेल्या 'सुपरअलॉय' निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. प्लांट रिव्हर्ट्स, अर्थात प्रकल्पातील अवशेषांमधून पुनर्प्राप्ती, औद्योगिक अवशेषांना मौल्यवान संसाधनांमध्ये रूपांतरित करण्याची, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्याची आणि प्राथमिक खनिज उत्खनन आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याची महत्वाची क्षमता प्रदान करेल.

हेवी वॉटर बोर्डचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. व्ही. एस. ए. प्रसाद, मिधानी (एमआयडीएचएएनआय) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. एस. व्ही. एस. नारायण मूर्ती, आणि मटेरियल्स ग्रुप, बीएआरसी चे सहयोगी संचालक आणि डॉ. आलोक अवस्थी यांनी 27 ऑक्टोबर 2026 रोजी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. मिधानीचे संचालक (वित्त) के. मधुबाला आणि एचडब्ल्यूबीचे कार्यकारी संचालक संदीप वाधवा यांच्यासह सहभागी संस्थांचे इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

हा सहयोगात्मक उपक्रम दुय्यम औद्योगिक स्रोतांपासून धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या धातूंच्या पुनर्प्राप्तीसाठी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. या भागीदारीच्या माध्यमातून संशोधन, तंत्रज्ञान विकास आणि औद्योगिक उत्पादन क्षेत्रातील कौशल्ये एकत्र आणून, महत्त्वपूर्ण धातूंच्या पुनर्प्राप्तीचे व्यवहार्य मार्ग प्रस्थापित करण्याचा आणि देशांतर्गत त्यांची उपलब्धता वाढवण्याचा प्रयत्न आहे.

हा उपक्रम आत्मनिर्भर भारत, संसाधन संवर्धन, चक्राकार अर्थव्यवस्था आणि धोरणात्मक स्वावलंबन, या राष्ट्रीय प्राधान्यक्रमांशी सुसंगत आहे. यामुळे भारताच्या महत्त्वाच्या कच्च्या मालाची देशांतर्गत पुरवठा साखळी मजबूत करायला आणि संरक्षण, प्रगत उत्पादन, इलेक्ट्रिक वाहतूक आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्राच्या वाढत्या गरजांची पूर्तता करायला पाठबळ मिळेल, अशी अपेक्षा आहे.

या भागीदारीद्वारे, एचडब्ल्यूबी, बीएआरसी आणि एमआयडीएचएएनआय यांनी, संसाधनांचा शाश्वत वापर करण्यासाठी आणि भारताच्या औद्योगिक आणि धोरणात्मक हितसंबंधांना चालना देण्यासाठी, स्वदेशी वैज्ञानिक आणि तांत्रिक क्षमतांचा उपयोग करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे.

 

* * *

पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2332187) अभ्यागत कक्ष : 16
Read this releasein: English