शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हिंदी पत्रकारितेच्या 200 वर्षांनिमित्त वर्ध्यातील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात 4 नोव्हेंबरपासून राष्ट्रीय चर्चासत्र


ज्येष्ठ अभ्यासक आणि वरिष्ठ पत्रकार हिंदी पत्रकारितेचा वारसा, सामाजिक बांधिलकी आणि विकसित भारताच्या उभारणीतील तिची भूमिका यावर विचारमंथन करणार

Posted On: 03 NOV 2026 5:35PM by PIB Mumbai

नागपूर, 3 नोव्‍हेंबर 2026

 

वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या (MGAHV) जनसंवाद विभागातर्फे हिंदी पत्रकारितेच्या 200 वर्षांनिमित्त 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी दोन दिवसांच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.“हिंदी पत्रकारिता के दो सौ वर्षः विरासत, सरोकार और विकसित भारत का संकल्प" (हिंदी पत्रकारितेची 200 वर्षे : वारसा, सामाजिक बांधिलकी आणि विकसित भारताचा संकल्प) असे या चर्चासत्राचे शीर्षक आहे. यात हिंदी पत्रकारितेचा ऐतिहासिक प्रवास, तिचा समृद्ध वारसा, सामाजिक बांधिलकी आणि वर्तमान काळातील तिची प्रासंगिकता यांचा आढावा घेतला जाणार आहे. विकसित भारताच्या उभारणीत हिंदी पत्रकारितेची भूमिका तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) युगात पत्रकारितेसमोरील नैतिक प्रश्न, नव्या संधी आणि आव्हाने यांवरही या चर्चासत्रात विचारमंथन होणार आहे.

या चर्चासत्रात देशभरातील प्रमुख शैक्षणिक संस्था, माध्यम संस्था आणि साहित्यिक-सांस्कृतिक संस्थांशी संबंधित नामवंत विद्वान, अभ्यासक आणि वरिष्ठ पत्रकार एकत्र येणार आहेत.

या चर्चासत्रातील शैक्षणिक सत्रांमध्ये हिंदी पत्रकारितेचा समृद्ध वारसा, कृत्रिम बुद्धिमत्तेसंदर्भातील आव्हाने आणि  नैतिकता, विकसित भारताच्या उभारणीत भाषा आणि संस्कृतीचे महत्त्व, तसेच सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिर्मिती यांवर भर दिला जाणार आहे. हिंदी पत्रकारितेचे ऐतिहासिक योगदान आणि बदलत्या माध्यमविश्वातील तिची भूमिका यांचाही या चर्चेत आढावा घेतला जाणार आहे.

विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. कुमुद शर्मा या चर्चासत्राच्या मुख्य मार्गदर्शक असतील. जनसंवाद विभागाचे प्रमुख आणि सहप्राध्यापक डॉ. राजेश लेखापुरे यांचे मार्गदर्शन या चर्चासत्राला लाभणार आहे. विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. रेणू सिंग या कार्यक्रमाचे समन्वयन करतील. तर डॉ. संदीप कुमार वर्मा, डॉ. गीता साहू आणि विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी बुद्धदास मिर्गे हे सहसमन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळतील. लोकशाही मूल्यांचे जतन, सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे आणि विकसित भारताच्या संकल्पनेला हातभार लावणे, यामध्ये हिंदी पत्रकारितेची सध्याची जबाबदारी आणि भविष्यातील संधी यांवर अर्थपूर्ण चर्चा घडवून आणणे, हा या चर्चासत्राचा मुख्य उद्देश आहे.

 

* * *

पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/आशुतोष सावे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2332140) अभ्यागत कक्ष : 21
Read this releasein: English