Posted On:
02 NOV 2026 11:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर 2026
एप्रिल 2026 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा - I आणि संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड मंडळाने घेतलेल्या एसएसबी मुलाखतींच्या निकालाच्या आधारे घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. एकूण 243 उमेदवार विविध अभ्यासक्रमांसाठी गुणवत्ताक्रमानुसार पात्र ठरले आहेत. यामध्ये डेहराडून येथील भारतीय लष्करी अकादमीच्या 162 व्या अभ्यासक्रमासाठी 155 उमेदवार, केरळमधील एझिमाला येथील भारतीय नौदल अकादमीसाठी 63 उमेदवार आणि हैदराबाद येथील वायुसेना अकादमीच्या पूर्व-उड्डाण प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी 25 उमेदवारांचा समावेश आहे.
या तीनही अभ्यासक्रमांच्या गुणवत्ता याद्यांमध्ये काही उमेदवारांची नावे समान आहेत.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्करी अकादमीमध्ये 100 जागा रिक्त आहेत. यापैकी 13 जागा एनसीसीच्या 'सी' प्रमाणपत्रधारकांसाठी राखीव आहेत. केरळमधील एझिमाला येथील भारतीय नौदल अकादमीच्या कार्यकारी शाखा विभागात 26 जागा आहेत. त्यापैकी 6 जागा एनसीसीच्या 'सी' प्रमाणपत्रधारकांसाठी आणि 1 जागा हायड्रो विभागासाठी राखीव आहे. हैदराबाद येथील वायुसेना अकादमीमध्ये 32 जागा आहेत. त्यापैकी 3 जागा एनसीसी विशेष प्रवेश प्रक्रियेद्वारे एनसीसीच्या 'सी' प्रमाणपत्रधारकांसाठी राखीव आहेत. भारतीय लष्करी अकादमी, भारतीय नौदल अकादमी आणि वायुसेना अकादमीमध्ये प्रवेशासाठी झालेल्या लेखी परीक्षेत अनुक्रमे 2 हजार 601, सातशे 70 आणि सहाशे 40 उमेदवार पात्र ठरले होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाने या उमेदवारांची पुढील निवड प्रक्रियेसाठी शिफारस केली होती. लष्कर मुख्यालयामार्फत घेण्यात आलेल्या एसएसबी चाचणीनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांची संख्या निश्चित झाली आहे.
दरम्यान, या याद्या तयार करताना वैद्यकीय तपासणीचे निकाल विचारात घेतलेले नाहीत.
या उमेदवारांच्या जन्मतारखा आणि शैक्षणिक पात्रतेची पडताळणी लष्कर मुख्यालयाकडून अद्याप सुरू आहे. त्यामुळे या सर्व उमेदवारांची उमेदवारी तूर्तास तात्पुरती आहे. उमेदवारांनी जन्मतारीख आणि शैक्षणिक पात्रतेच्या पुराव्यासाठी मूळ प्रमाणपत्रे आणि त्या प्रमाणपत्रांच्या राजपत्रित अधिकाऱ्यांकडून प्रमाणित केलेल्या छायांकित प्रती, आपल्या पहिल्या पसंतीनुसार लष्कर मुख्यालय, नौदल मुख्यालय किंवा वायुसेना मुख्यालयाकडे पाठवाव्यात. पत्त्यात काही बदल झाला असल्यास, उमेदवारांनी त्याची माहिती संबंधित लष्कर मुख्यालय, नौदल मुख्यालय किंवा वायुसेना मुख्यालयाला तातडीने थेट कळवावी.
हे निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध असतील.
मात्र, संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा- I 2026 अंतर्गत अधिकारी प्रशिक्षण अकादमीच्या अभ्यासक्रमाचा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतरच उमेदवारांचे गुण या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. या परीक्षेसंबंधी माहिती किंवा काही स्पष्टीकरण हवे असल्यास, उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील सुविधा केंद्राशी प्रत्यक्ष संपर्क साधू शकतात. हे केंद्र कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरू असेल. तसेच, उमेदवार सर्व दिवशी सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत 011-24041001 आणि 011-40303444 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधू शकतात.
Click here to see the result:
शैलेश पाटील/राज दळेकर/प्रिती मालंडकर