Posted On:
02 NOV 2026 7:19PM by PIB Mumbai
मुंबई, 2 नोव्हेंबर 2026
महाराष्ट्र टपाल मंडळातर्फे शुक्रवार 6 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 11.45 वाजता पहिला मासिक अदालत दिवस आयोजित करण्यात येणार आहे. मुंबईतले मुख्य पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जीपीओ इमारत, दुसरा मजला, जीपीओ संकुल, मुंबई 400001 इथे ही अदालत होणार आहे.
तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी आणि तक्रारींच्या निवारणासाठी सर्वांना सहज उपलब्ध होईल असे समान व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी, दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी मासिक अदालत दिवस आयोजित करण्याचा निर्णय टपाल विभागाने घेतला आहे. या दिवशी मंडळ प्रादेशिक आणि विभागीय स्तरांवर, लागू असेल त्या ठिकाणी, कर्मचारी अदालत, ग्रामीण डाक सेवक अदालत, निवृत्तिवेतन अदालत आणि टपाल अदालत अशा चार अदालती एकाच वेळी आयोजित केल्या जातील.
टपाल सेवा, कर्मचारी, ग्रामीण डाक सेवक आणि निवृत्तिवेतनधारक यांच्याशी संबंधित तक्रारींचे प्रभावी आणि वेळेत निवारण करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ग्राहक, कर्मचारी आणि अन्य संबंधित घटकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करण्याबरोबरच कार्यक्षम, विश्वासार्ह आणि ग्राहकस्नेही सेवा देण्याच्या टपाल विभागाच्या बांधिलकीचेही हे प्रतिबिंब आहे.
महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र टपाल मंडळाच्या कार्यक्षेत्रातल्या कर्मचारीविषयक बाबी, ग्रामीण डाक सेवक, निवृत्तिवेतन आणि टपाल सेवा यांच्याशी संबंधित तक्रारी संबंधित गट अधिकाऱ्यांकडे 4 नोव्हेंबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी सादर करता येतील. या तक्रारींचा संबंधित अदालतींमध्ये विचार केला जाईल.
अर्जामध्ये तक्रारीचा संपूर्ण तपशील, त्यासंबंधीची आवश्यक कागदपत्रे आणि यापूर्वी ही बाब ज्या कार्यालयाकडे किंवा प्राधिकरणाकडे पाठवण्यात आली होती, त्याचा तपशील, लागू असेल तिथे नमूद करणे आवश्यक आहे. इच्छुक व्यक्तींनी मासिक अदालत दिवसाच्या वेळी आपल्या तक्रारी विहित प्रक्रियेनुसार संबंधित अदालतीचे कामकाज पाहणाऱ्या प्राधिकरणाकडे विचारार्थ सादर कराव्यात.
मासिक अदालत दिवसाच्या संस्थात्मक आयोजनामुळे तक्रार निवारण प्रक्रियेत पारदर्शकता, सुलभता येईल आणि जबाबदारी वाढायला मदत होईल. तसेच, नागरिककेंद्रित आणि तत्पर सेवा देण्याच्या टपाल विभागाच्या बांधिलकीला यामुळे अधिक बळ मिळेल.
पीआयबी मुंबई | निलीमा चितळे/ निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर