आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रुग्णांची सुरक्षितता आणि माहितीची गुणवत्ता यांना प्राधान्य देण्यासाठी संशोधकांना सक्षम करणारे सुयोग्य वैद्यकीय आचरणाविषयीचे सखोल प्रशिक्षण एम्स नागपूरमध्ये आयोजित

Posted On: 02 NOV 2026 5:25PM by PIB Mumbai

‍नागपूर, 2 नोव्हेंबर  2026

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्स, नागपूर इथल्या औषधशास्त्र विभाग आणि संस्थात्मक नैतिकता समिती यांच्या वतीने 22 आणि 23 ऑक्टोबर रोजी दोन दिवसीय सखोल सुयोग्य वैद्यकीय आचरण अर्थात गुड क्लिनिकल प्रॅक्टिस (जीसीपी) प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआरच्या ‘इंडियन क्लिनिकल ट्रायल अँड एज्युकेशन नेटवर्क’ (इंटेंट) या कार्यक्रमांतर्गत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत संशोधनाचे प्रमुख संशोधक, नैतिकता समितीचे सदस्य आणि संशोधन समन्वयक अशा एकूण 46 प्रतिनिधींनी भाग घेतला.

एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. (डॉ.) प्रशांत पी. जोशी यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. त्यांनी 1947 च्या न्युरेम्बर्ग संहितेपासून, 1964 च्या हेलसिंकी घोषणापत्रापर्यंत आणि त्यानंतरच्या आंतरराष्ट्रीय सामंजस्य परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वांपर्यंत जीसीपीच्या झालेल्या विकासाचा आढावा घेतला. विश्वासार्ह माहिती आणि संशोधनात सहभागी व्यक्तींचे नैतिक संरक्षण हे जीसीपीचे दोन प्रमुख आधारस्तंभ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जीसीपीची मूलभूत तत्त्वे त्यांनी प्रतिनिधींना समजावून सांगितली. विज्ञान आणि समाजाचे हित हे वैद्यकीय चाचण्यांमध्ये सहभागी व्यक्तींच्या कल्याणापेक्षा कधीही महत्त्वाचे ठरू नये, यावर त्यांनी विशेष भर दिला.

कार्यशाळेतील सत्रांमध्ये आयसीएच-जीसीपी ई6 (आर 3), नवीन औषधे आणि वैद्यकीय चाचण्या नियम, 2019, संशोधनाच्या प्रमुख संशोधकांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या, माहितीपूर्ण संमतीची प्रक्रिया, एएलसीओए+ तत्त्वांनुसार मूळ दस्तऐवजांची नोंद, माहितीची गुणवत्ता आणि विश्वासार्हता, सुरक्षिततेविषयक अहवाल सादर करणे, लेखापरीक्षण आणि तपासणी या विषयांचा समावेश होता. याशिवाय प्रत्यक्ष प्रशिक्षण, भूमिकाभिनय आणि प्रश्नमंजुषा घेण्यात आली. प्रश्नमंजुषेत डॉ. निशांत परमेश्वरन यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

तांत्रिक सत्रांचे मार्गदर्शन नामवंत तज्ज्ञांनी केले. बाह्य तज्ज्ञांच्या पॅनेलमध्ये आयसीएमआरचे डॉ. गुंजन कुमार, बेळगाव इथल्या केएलई अकादमीच्या डॉ. सुचेता बॅनर्जी आणि एनआयआयटीचे वैभव त्यागी यांचा समावेश होता. नागपूर एम्स मधल्या डॉ. गणेश दाखले, डॉ. चैत्राली चिंधळोरे, डॉ. पूर्वाशा नारंग, डॉ. राजश्री खोत, डॉ. अनिता यादव, डॉ. अभिजित चौधरी आणि डॉ. अमोल दुबे यांनीही विविध सत्रांमध्ये मार्गदर्शन केले.

पीआयबी मुंबई | नितीन फुल्लुके/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2331683) अभ्यागत कक्ष : 18
Read this releasein: English