रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सिंदी रेल्वे येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बहुउद्देशीय लॉजिस्टिक पार्कचे भूमीपूजन.


निर्यात, वाहतुकीच्या खर्चात घट आणि स्थानिक रहिवाशांसाठी रोजगार संधी निर्माण करण्यास प्रकल्पामुळे प्रोत्साहन मिळणार.

Posted On: 01 NOV 2026 6:09PM by PIB Mumbai

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी, सिंदी रेल्वे येथे उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय पार्कमुळे जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाद्वारे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत थेट निर्यात करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे आणि स्थानिक रहिवाशांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणार आहे असे प्रतिपादन केले.

हा प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग वाहतूक व्यवस्थापन मर्यादित (एनएचएलएमएल)संस्थेकडून विकसित करण्यात येत असून, ही संस्था भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत(एनएचएआय), एका विशिष्ट उद्देशासाठी स्थापन करण्यात आलेली संस्था आहे. अमारा ट्रान्झ सोल्युशन मार्फत त्याचे परिचालन होणार आहे. सिंदी रेल्वे येथे या प्रकल्पाचा भूमीपूजन समारंभ पार पडला. यावेळी पालकमंत्री  डॉ. पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, जिल्हाधिकारी वनमती सी, माजी खासदार रामदास तडस आणि सिंदी रेल्वे नगर परिषदेच्या अध्यक्ष राणी कालोडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी गडकरी म्हणाले की बहुउद्देशीय लॉजिस्टिक पार्कमुळे, जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणामार्फत विदर्भातील, कापूस, कापसाचे धागे, कापड, संत्री आणि भाजीपाला थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात करणे सुलभ होणार आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातून मुंबई-कोलंबो-ढाका मार्गे होणाऱ्या मालवाहतुकीचा वेळ कमी होईल. ते असेही म्हणाले की प्रकल्पातून मारुती कार वाहून नेणाऱ्या पहिल्या रेकचे काम सुरू झाले आहे.

राष्ट्रीय महामार्ग वाहतूक व्यवस्थापन मर्यादित आणि जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण यांच्या सहकार्यातून सिंदी रेल्वे स्थानकाजवळील 150 एकर जमिनीवर हा प्रकल्प विकसित केला जात आहे. सिंदी रेल्वे येथील भूबंदराच्या माध्यमातून विदर्भातील कापूस, कापसाचे धागे, कापड आणि संत्री मुंबईला न पाठवता कोलकातामधील हल्दियामार्गे बांग्लादेशात पाठवता येतील. त्यामुळे प्रति कंटेनर वाहतूक खर्च ₹1.5 लाखांवरून ₹1लाख इतका कमी होण्याची अपेक्षा आहे, त्याचा फायदा विदर्भातील शेतकऱ्यांना होणार आहे.

नागपूर- वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर, केंद्र आणि राज्य सरकारच्या अर्थसाहाय्यातून विकसित केला जाणारा बहुउद्देशीय लॉजिस्टिक पार्क सिंदी रेल्वे येथील भूबंदराशी जोडला जाणार आहे. शीतगृह आणि गोदामांसारख्या सुविधा येथे उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे  नागपूर आणि वर्धा क्षेत्रातील प्रमुख उद्योगांना एकाच ठिकाणी एकत्रित करणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर निर्यातदारांचे समूहदेखील येथे विकसित केले जाणार आहेत.

सिंदी रेल्वे येथे सीमाशुल्क कार्यालय स्थापन करण्यात येणार असून, त्याद्वारे देश-परदेशातून येणाऱ्या कंटेनर्सची हाताळणी केली जाईल. त्यामुळे परिसरातील दळणवळण व्यवस्था आणि निर्यात पायाभूत सुविधा अधिक बळकट होणार आहेत.

***

शैलेश पाटील/विजयलक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2331349) अभ्यागत कक्ष : 10
Read this releasein: English